Baina Robbery Case: पोलिसांच्या अकार्यक्षमतेची लक्तरे, 6 दिवस उलटूनही बायणा येथील सशस्त्र दरोड्याचा तपास लागेना
वास्को: बायणा येथील सागर नायक यांच्या फ्लॅटवर सशस्त्र दरोडा घालून ३५ लाखांचा ऐवज लंपास केलेल्या घटनेला सहा दिवस उलटून गेले आहेत. तथापि, पोलिसांकडून तपासकामांच्या प्रगतीची वाच्यता होत नसल्याने वास्कोवासीयांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहेत. पोलिसांचा तपास थंडावला, की दरोडेखोरांना अटक करून लोकांना धक्का देणार आहे, हे समजण्यास मार्ग नाही.
चामुंडा आर्केडमध्ये सहाव्या मजल्यावर राहणारे सागर नायक यांच्या फ्लॅटवर दरोडा घालून दरोडेखोरांनी सागर नायक, त्यांची पत्नी हर्षा, मुलगी नक्षत्रा यांना मारहाण केली होती. त्यामध्ये सागर गंभीर जखमी झाले होते. दरोडा घातल्यावर पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये माहिती दिली.
त्यामुळे पोलिसांनी नाकाबंदी करण्याची व गस्त घालून त्या दरोडेखोरांचा शोध घेण्याची गरज होती. मात्र, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून पोलिस सीसीटीव्हीमध्ये काही मिळते काय, ते पाहात बसले. मात्र, तेथून बिनधास्तपणे चालत गेलेल्या दरोडेखोरांमुळे पोलिसांच्या एकंदर कामाची पद्धत चव्हाट्यावर आली.
या दरोड्याच्या तपासात कोणती प्रगती झाली आहे, यासंबंधी पोलिस अधिकारी तोंड उघडण्यास तयार नाहीत. त्यामुळे तपासाच्या प्रगतीबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. भर वस्तीतील दरोड्यामुळे पोलिसांची कार्यक्षमता लोकांसमोर आली. पोलिसांबद्दल विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरोडेखोरांचे आव्हान पोलिस पेलणार काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती सुरू
या दरोड्यामुळे लोक पुरते घाबरले आहेत. त्यामुळे ते आपल्या परीने खबरदारी घेत आहेत. काही हाऊसिंग सोसायट्यांमध्ये नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तर काहीजणांनी नव्याने सीसीटीव्ही लावण्याचा विचार चालविला आहे.
पोलिसांनी लोकांमध्ये निर्माण झालेली घबराट दूर करण्याची गरज आहे. लोकांशी संवाद साधण्याची गरज आहे. लोकांमध्ये पोलिसांच्या कर्तबगारीबद्दल विश्र्वास तयार करण्याची गरज आहे. जेणेकरून लोकही पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पुढे येतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

