Purvaja Verlekar: गोव्याच्या 'पूर्वजा'ने घडवला इतिहास! आंतरविभागीय स्पर्धेत ठोकले शतक; बनली पहिली महिला क्रिकेटपटू
पणजी: गोव्याची आक्रमक शैलीची महिला बॅटर पूर्वजा वेर्लेकर आंतरविभागीय एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेत शतक करणारी राज्याची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. तिच्या नाबाद १०३ धावांच्या झंझावाती फलंदाजीमुळे दक्षिण विभागाने उत्तर विभागाला आठ विकेट राखून लीलया हरविले. स्पर्धेतील सामना बंगळूर येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स मैदान क्रमांक १ येथे गुरुवारी झाला.
उत्तर विभागाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद १९९ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या पूर्वजा हिच्या नाबाद शतकामुळे दक्षिण विभागाने सामना ३६.१ षटकांत जिंकताना २ बाद २०० धावा केल्या.
पूर्वजा हिने १०४ चेंडूंचा सामना करताना सहा चौकार व चार षटकार मारले. पूर्वजा हिने एस. शुभा (४६) हिच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची, तर कर्णधार हेन्रिता परेरा (नाबाद ४२) हिच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची अभेद्य भागीदारी केली.
कारकिर्दीतील दुसरे शतक
पूर्वजा वेर्लेकर हिने गुरुवारी ९९ चेंडूंत शतक साजरे केले. तिचे हे एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले. पूर्वजा हिने यावर्षी आठ फेब्रुवारी रोजी रांची येथे हैदराबादविरुद्ध सीनियर महिला एकदिवसीय करंडक एलिट क्रिकेट सामन्यात नाबाद १६६ धावा केल्या होत्या.
त्या स्पर्धेतील सात डावांत तिने ७४.३३च्या सरासरीने एक शतक व तीन अर्धशतकांसह ४४६ धावा केल्या होत्या. त्या कामगिरीच्या आधारे तिची विभागीय स्पर्धेसाठी दक्षिण विभाग स्पर्धेसाठी निवड झाली होती.
गोवा क्रिकेट संघटनेकडून अभिनंदन
दक्षिण विभाग संघातर्फे नाबाद शतक केलेल्या पूर्वजा वेर्लेकरचे गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेश देसाई, सचिव तुळशीदास शेट्ये यांनी अभिनंदन केले आहे. “राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत नाबाद शतक नोंदविणे ही निश्चितच कौतुकास्पद कामगिरी आहे. आम्हाला पूर्वजाचा अत्यंत अभिमान वाटतो. तिची ही खेळी राज्यातील युवा क्रिकेटपटूंना प्रेरणा देईल,” असे असे महेश यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

