

फोंडा: राज्याच्या पर्यटनात वाढ व्हावी आणि शहरीवासीयांना शिमग्याची ओळख होण्यासाठी फोंड्याचे दिवंगत नेते तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी शिमगोत्सव सरकार पातळीवर नेला आणि सर्वांना सहभागी करून घेतले. आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून फोंडा तालुका शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक हे जबाबदारीने काम करीत आहेत, यामुळे त्यांचे अभिनंदन करणे क्रमप्राप्त आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
फोंड्यातील राज्यस्तरीय शिमगोत्सव शोभायात्रेला गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महादेवाला श्रीफळ अर्पण करून तिस्क - फोंडा येथे प्रारंभ करण्यात आला. फोंडा
तालुका अंत्रुज शिमगोत्सव समितीतर्फे हा शिमगोत्सव राज्य सरकारच्या पर्यटन खात्याच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, खासदार सदानंद तानावडे, माजी खासदार विनय तेंडुलकर, फोंडा नगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर, फोंडा शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष रितेश नाईक,
उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर, नगरसेवक रॉय नाईक, आनंद नाईक, रूपक देसाई, विद्या पुनाळेकर, ज्योती नाईक, सरपंच नावेद तहसीलदार, फोंडा भाजप मंडळ अध्यक्ष हरेश नाईक तसेच इतर नगरसेवक व पंचसदस्य उपस्थित होते
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, स्वच्छ गोवा, सुंदर गोवा ठेवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा. स्वर्गीय रवी नाईक यांनी स्वच्छ आणि सुंदर फोंड्यावर भर दिला होता. त्यांचे हे काम पूर्ण करण्यासाठी सर्वांनी संघटीत प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक तसेच पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीही फोंडा शिमगोत्सवाला शुभेच्छा देताना गोमंतकीय संस्कृती टिकवून ठेवा आणि पुढील पिढीपर्यंत पोचवा असे आवाहन केले. सूत्रसंचालन नीतिन कोलवेकर यांनी केले.
यंदा प्रथमच लोकविश्वास प्रतिष्ठानच्या विशेष मुलांनी शोभायात्रेत भाग घेतला. उत्कृष्ट रोमटामेळ सादर करताना त्यांनी ढोल ताशाच्या गजरात सुरेख पावलीही मारली आणि उपस्थितांची मने जिंकून घेतली. मुख्यमंत्री तसेच इतरांनीही त्यांचे कौतुक केले.
दरवर्षी या ना त्या कारणाने शिमगोत्सव शोभायात्रेला जरा उशीर व्हायचा, पण यंदा वेळेवर शिमगोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. आयोजन समितीच्या धोरणानुसार शिमगोत्सवाची आखणी करण्यात आली होती. शिमगोत्सवाचे उद्घाटन ठरल्यानुसार वेळेवर मुख्यमंत्र्यांनी केले आणि त्यानंतर दिमाखात शोभायात्रेला प्रारंभ झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.