मोरजी: मोपा लिंक रोडची सुनावणी सोमवार, 4 एप्रिल रोजी होणार आहे. या रस्त्यासाठी जमीन संपादनास स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविलेला आहे. या पार्श्वभूमीवर हा निवाडा कोणाच्या बाजूने लागतो, याकडे स्थानिक रहिवाशांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मोपा लिंक रस्त्याचे काम सध्या धारगळ सुकेकुळण ते मोपा विमानतळापर्यंत जोरात सुरू आहे. उड्डाण पुलासाठी मोठे खांब उभारण्यासाठी जमिनीची चाचणी झाल्यानंतर आता खोदकाम केले जात आहे. हे प्रकरण न्यायालयात असतानाही कंपनीने काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे हे काम बंद ठेवावे, अशी नोटीस वारखंड पंचायतीने अशोका बिल्डर्स कंपनीला दिली होती. परंतु कंपनीने पंचायत संचालनालयाकडे धाव घेत या नोटिसीला आव्हान दिले होते. त्यानुसार न्यायालय सुनावणी सुरू आहे. पंचायतीच्या वतीने वकील प्रसाद शहापूरकर यांनी बाजू मांडली आहे.
धारगळ-सुकेकुळण राष्ट्रीय महामार्ग-66 ते मोपा विमानतळापर्यंतचा साडेसहा किलोमीटर लांबीचा हा रस्ता, बाराशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार आहे.
माहिती का लपवता? : मोपा विमानतळ आपल्यासाठी शाप की वरदान, हे स्थानिक रहिवाशांना समजेना झाले आहे. विमानतळावर जी बांधकामे सुरू आहेत, त्याची माहिती स्थानिक पंचायत वा स्थानिक आमदारांना दिलेली नाही. पंचायतीमार्फत रहिवासी आवाज उठवतात, लेखी पत्रे देतात, मोपा विमानतळावरील बांधकामांची पाहणी करावी, अशी मागणी केली जाते; परंतु मोपा पठारावर नेमकं काय चाललंय, कोणत्या प्रकारची बांधकामे उभारली जात आहेत, याची माहिती संबंधित पंचायतीला आजपर्यंत सरकारने आणि कंपनीने देण्याचे सौजन्य दाखवलेले नाही.
झाडे गाडताना अश्रू अनावर
पीडित शेतकऱ्यांनी न्याय्य मागण्यांसाठी एक दिवसाचे रास्ता रोको आंदोलन केले. हे आंदोलनही चिरडून टाकण्याचा सरकारी यंत्रणेने प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्यांची एकजूट पाहता हे आंदोलन यशस्वी ठरले. पण आंदोलन केल्यानंतर मोपा लिंक रस्त्याचे काम काही काळापुरते बंद राहील, अशी रहिवाशांसह आंदोलनकर्त्यांची अपेक्षा होती. परंतु तीही फोल ठरली आहे. शेतकऱ्यांनी डोंगर माळरानावर लावलेली काजू-आंब्याची झाडे सरकार मुळासकट जमिनीत घालते, ते पाहून त्यांना अश्रू अनावर होत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.