कायदा धाब्यावर बसवून आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर पाडण्यात आल्याप्रकरणी विरोधक आक्रमक बनले आहेत. समाजमाध्यमांवरही सरकारवर तुफान टीका होत आहे.
गोव्यात गोमंतकीयच असुरक्षित बनले असून सरकारी यंत्रणा परप्रांतीयांच्या तालावर नाचत असल्याचा उघड आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे या विषयावरून सरकारला आता एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे. कधी नव्हे ते विरोधक एकत्र आले आहेत.
आपल्याच गुर्मीत विरोधकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारने आता या प्रकरणी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी घटनास्थळी भेट देत आयपीएस अधिकाऱ्यानेच पोलिसांना गुंड म्हणून पाठवल्याचा जाहीर आरोप केला आहे.
यामुळे तूर्त तरी सरकारला बोटचेपी भूमिका घ्यावी लागली आहे. विरोधकांच्या माऱ्याला कसे तोंड द्यावे, असा प्रश्न सरकारला सतावू लागला आहे. पर्वरी येथे मुख्यमंत्र्यांना या घटनेबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, पोलिसांनी कारवाई सुरू केली असून काहींना अटकही केली आहे.
त्यावर, या प्रकरणातील छोट्या व्यक्तींना अटक करून पोलिस कारवाईचे नाटक करत आहेत, मुख्य सूत्रधार आणि बोलवता धनी अद्याप मोकळाच असल्याचे पत्रकारांनी लक्षात आणून देताच, सरकार कोणालाच पाठीशी घालणार नाही, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आज मंगळवारी सायंकाळी काँग्रेसच्या नेत्यांनी आगरवाडेकर कुटुंबीयांची भेट घेऊन गोमंतकीयांना संरक्षण पुरविण्यात सरकारला आलेल्या अपयशाबद्दल टीका केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. तानावडे यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यभरातील नजरा आसगावातील या घटनेकडे लागल्या आहेत.
सरकारने याची दखल घेतली असून, ज्या कोणाच्या सूचनेवरून हा सर्व प्रकार घडला आहे त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून सरकारला घेरण्यासाठी विरोधक एकत्र येऊ लागले आहेत. काँग्रेसने तर लोकवर्गणीतून आम्ही हे घर पुन्हा बांधून देऊ अशी घोषणा केली आहे.
लोकांना मूर्खात काढण्यासाठी सरकारने एका एजंटला अटक केली. यातून बळीचा बकरा करण्याची ही धडपड दिसते. मुळात, पूजा शर्मा ज्या सदर मालमत्ता आपली असल्याचा दावा करताहेत, त्यांचे पती हे आयपीएस अधिकारी आहेत.
त्या आयपीएस अधिकाऱ्यानेच गोवा डीजीपीला सांगून या ठिकाणी पोलिसांनाच गुंड म्हणून पाठविले आणि पोलिस संरक्षणात या घरावर जेसीबी चालविला, असा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.
त्यामुळे सरकारने आधी पूजा शर्माचा पती नक्की कोण आहे, ते स्पष्ट करावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
संशयित पूजा शर्माला हिला ताबडतोब अटक करावी. तसेच गोवा डीजीपीवर कारवाई करून सेवेतून काढून टाकावे. कारण पोलिस संरक्षणातच हे कटकारस्थान अमलात आणले गेले, असा आरोप अमित पाटकर यांनी केला.
दोषींवर योग्य कारवाई न केल्यास विद्यमान सरकार हे जनविरोधी असल्यावर शिक्कामोर्तब होईल. आम्ही उद्या बुधवारपर्यंत (ता. २५) पूजा शर्माला अटक करण्याची सरकारला मुदत देत आहोत, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आसगावमधील या प्रकरणाची स्वेच्छा दखल घ्यावी. २४ वर्षे कायद्याने वास्तव्य करणाऱ्या स्थानिक कुटुंबाचे घर दिवसाढवळ्या पाडले जाते. ही दुर्दैवी व संतापजनक घटना आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो.
येत्या पंधरा दिवसांत आगरवाडेकर कुटुंबीयांच्या घराची पुनर्बांधणी सरकारने करून द्यावी. सरकारला जमत नसल्यास ती आम्ही लोकनिधीतून करून देऊ. तसेच जुने गोवे येथील बेकायदा बंगला सरकारने मोडून दाखविल्यास आम्ही सरकारला सलाम करू.
पीडित महिला पोलिसांच्या १०० या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करते तेव्हा तिला पोलिस स्थानकावर येऊन लेखी तक्रार करण्यास सांगणे यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. हीच महिलांची सुरक्षितता का? या पोलिस कर्मचाऱ्यास त्वरित निलंबित करावे.
पोलिसांच्या संगनमताशिवाय हे कारस्थान घडूच शकत नाही. जे पोलिस या कटात सहभागी आहेत, त्यांना ताबडतोब निलंबित करावे. सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी करावी. या विषयावर विधानसभेत आवाज उठवू.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.