Ponda Municipal Elections Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipal Elections 2023: शह-काटशहाच्या राजकारणाला ऊत; 3 प्रभागांमध्ये ‘कांटे की टक्कर’

प्रचाराचा ‘पारा’ वाढला : माजी नगराध्यक्ष व दोन नगरसेवकांचे राजकीय भवितव्य टांगणीला

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Municipal Elections 2023: फोंडा नगरपालिका निवडणुकीचा दिवस जसाजसा जवळ येत चाललाय, तसतशी प्रचाराला धार चढू लागली आहे. शह-काटशहाच्या राजकारणाला ऊत यायला लागला आहे.

प्रभाग क्रमांक 2, 9 व 15 मध्ये ‘वन टू वन’ लढती असल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. या तिन्‍ही प्रभागांमध्‍ये रंगतदार लढती होण्‍याची चिन्‍हे दिसू लागली आहेत.

प्रभाग 2 हा शांतीनगरमधला भाग. शहरातला एक ‘पॉश’ भाग म्हणून तो ओळखला जातो. या प्रभागात विद्यमान नगरसेवक वीरेंद्र ढवळीकर हे भाजप पॅनलतर्फे रिंगणात असून त्यांना ‘रायझिंग फोंडा’च्या राजेश तळावलीकर यांच्याशी सामना करावा लागत आहे.

उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या दोन दिवसांपर्यंत ढवळीकर हे बिनविरोध निवडून येणार अशी चर्चा होती. पण शेवटच्या क्षणी प्रभाग १५च्या नगरसेविका तथा माजी नगराध्यक्ष गीताली तळावलीकर यांचे पती राजेश तळावलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून स्पर्धा निर्माण केली आहे.

कुडतरकरनगरी हा प्रभाग २चा महत्त्वाचा भाग. तेथील जवळजवळ 490 मते या प्रभागात आहेत. त्यामुळे ही नगरीच उमेदवाराचे भवितव्य ठरविणार हे निश्चित.

ढवळीकर हे दुसऱ्यांदा रिंगणात उतरत असून गेल्या वेळी त्यांनी ‘रायझिंग फोंडा’तर्फे काँग्रेस पॅनलच्या रुपक देसाई यांचा 60 मतांनी पराभव केला होता.

पण आता दोघेही भाजपमध्ये असून रुपक हे प्रभाग ९मधून निवडणूक लढवत आहेत. गेल्या वेळी या प्रभागात चौरंगी लढत झाली होती.

प्रभाग दोनमध्ये एकूण 827 मतदार असून हा प्रभाग फोंडा पालिका कक्षेतील सर्वांत छोटा प्रभाग आहे. सध्या दोन्ही उमेदवार प्रचाराची धूळ उडवत आहेत. तसेच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

प्रभाग ९ मध्येही रंगतदार लढत असून दोन वेळा निवडून आलेले माजी नगरसेवक व्‍हिन्सेंट फर्नांडिस यांना गेल्या वेळी प्रभाग 2 मधून पराभूत झालेले रुपक देसाई यांना तोंड द्यावे लागत आहे. व्‍हिन्सेंट हे 2008 व 2013 साली या प्रभागातून सलग दोन वेळा निवडून आले होते.

पण गेल्या वेळी हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांनी आपली पत्नी सीमा यांना रिंगणात उतरविले होते. त्यावेळी झालेल्या चौरंगी लढतीत त्या चांगल्या मताधिक्‍क्यांनी विजयी झाल्या होत्या.

आता परत हा प्रभाग खुला झाला असल्यामुळे व्‍हिन्सेंट हे पुन्‍हा एकदा मैदानात उतरले आहेत. या प्रभागाचे अनुभवी नगरसेवक म्हणून ते गणले जात असले तरी यावेळी परिस्थिती वेगळी आहे.

प्रभाग 9 ची रचना पूर्णपणे बदललेली आहे. केवळ कुडतरकर आर्केड एवढाच पूर्वीचा भाग या प्रभागात शिल्लक राहिला आहे. कुडतरकरनगरीतील पूर्वीच्या प्रभाग दोन व तीनमधील अर्ध्याहून अधिक मते आता प्रभाग 9 मध्ये आणल्यामुळे व्‍हिन्सेंट हे काही प्रमाणात बॅकफूटवर गेल्यासारखे वाटत आहेत.

उलट रुपक देसाई हे कुडतरकरनगरीचे रहिवासी असल्यामुळे त्यांचे काम काही प्रमाणात का होईना, सोपे झाल्यासारखे वाटत आहे. आता व्‍हिन्सेंट यांचा पालिकेतील प्रदीर्घ राजकीय अनुभव या परिस्थितीवर मात करतो काय, हे पाहावे लागेल.

सध्या दोन्ही उमेदवार जीवतोड मेहनत घेत आहेत. मात्र कोणाला यशाची फळे चाखायला मिळतात याचे उत्तर 7 मे रोजी मिळणार आहे. पण सध्या तरी हा प्रभाग पुनर्रचनेमुळे जास्त गाजत आहे एवढे मात्र खरे.

प्रभाग 15 ही नवीन रचनेमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. हा प्रभाग कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो, हेच सांगणे कठीण. यात फक्त 30 टक्के पूर्वीचा भाग असून 70 टक्के भाग हा पुनर्मुद्रित केलेला आहे.

या प्रभागाच्या विद्यमान नगरसेविका तथा माजी नगराध्यक्ष गीताली तळवलीकर पुन्‍हा एकदा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. गेल्या वेळी हा प्रभाग खुला होता. यावेळी तो महिलांसाठी आरक्षित आहे.

गीताली यांना यावेळी नवा चेहरा संपदा नाईक यांच्याशी लढत द्यावी लागत आहे. संपदा या राजकारणात नवीन असल्या तरी त्या माजी नगराध्यक्ष किशोर नाईक यांच्या कन्या असल्यामुळे त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो.

तिन्‍ही प्रभागांत काँग्रेस नाहीच

2, 9 आणि 15 या तीन प्रभागांतील सर्वांत आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तेथे काँग्रेसचा एकही उमेदवार नाही. गेल्या वेळी या तिन्‍ही प्रभागांत काँग्रेसचे उमेदवार रिंगणात होते व तिघांनाही पराभवाचे तोंड पहावे लागले होते.

परंतु गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राजेश वेरेकर यांना या तीन प्रभागांतून चांगली मते मिळाली होती. असे असूनही पालिका निवडणुकीत काँग्रेस पॅनलचा उमेदवार नसावा याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरात सर्वत्र तीच चर्चा सुरू आहे.

रवी नाईक, केतन भाटीकर सक्रीय : फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर हे फोंडा पालिका निवडणुकीच्‍या घडामोडींवर लक्ष ठेवून असून त्याप्रमाणे आपली रणनीती बदलताना दिसत आहेत.

त्यांना प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट शेट तानावडे यांची साथ लाभत आहे. दुसरीकडे ‘रायझिंग फोंडा’चे प्रमुख डॉ. केतन भाटीकर हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत प्रचारासाठी घाम गाळताना दिसत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तप्त झालेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cruise Tourism: क्रूझवरुन गोव्यात 67,594 प्रवासी, 9 महिन्यांत कमावलं 4.82 कोटींचं उत्पन्न; मुरगाव बंदर बनलं क्रूझ पर्यटनाचं केंद्र

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

The Hundred League: 13 चेंडूत 50 धावा...! ‘द हंड्रेड’मध्ये आरसीबीच्या खेळाडूंचा धमाका; जेकब बेथेलने मोडला 136 वर्ष जुना रेकॉर्ड

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

SCROLL FOR NEXT