पणजी: हडफडे येथील अग्नितांडव प्रशासनाच्या गळ्याशी येऊ लागल्यानंतर सरकारचे शुल्क थकवणाऱ्या दोन कॅसिनोंचे परवाने रद्द केले आहेत. तर वागातोर येथील रोमिओ लेन शॅकच्या बेकायदा विस्तारावर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पर्यटन खात्याने हातोडा मारला. क्लबमालक लुथरा बंधूंविरोधात ‘ब्ल्यू कॉर्नर’ नोटीस जारी करण्यात आली आहे.
हफडफे क्लबच्या अनुषंगाने नवनवे खुलासे समोर येत आहेत. पंचायत सरपंच अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. आज निलंबित दोन अधिकारी शमिला मोन्तेरो व सिद्धी हळर्णकर यांची हणजूण पोलिसांनी बराच काळ चौकशी केली. मात्र, पंचायत सचिव बागकर यांनी चौकशी आदेशाला वाकुल्या दाखवल्या. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर संशयितांना पकडण्यासाठी पोलिस पथके काम करताहेत. बर्च बाय रोमिओ लेन येथील क्लब संबंधित कागदपत्रे मिळविण्यासाठी विविध पथके तयार करून ती विविध सरकारी कार्यालयात बिग बी लीझरला १५ जुलै २०२५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यास उत्तर न आल्याने त्यांचा परवाना तत्काळ स्थगित करण्यात आला आहे.
मॅचोस एंटरटेनमेंट प्रा. लि. या दुसऱ्या कंपनीकडून कळंगुट येथील ॲव्हेन्यू ग्रॅण्ड येथे कसिनो चालवण्यासाठीचे १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीतील २२ कोटी रुपये शुल्क बाकी असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. हे शुल्क न भरता परवाना अटींचे उल्लंघन केल्याने १४ जानेवारी २०२५ रोजी जारी करण्यात आलेला त्यांचा कॅसिनो परवाना देखील तात्काळ परिणामाने निलंबित करण्यात आला आहे.
सरकारच्या (Government) आदेशानुसार मॅचोस एंटरटेनमेंट प्रा. लि. यांना कॅसिनोचे संचालन त्वरित थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच थकीत २२ कोटी रुपये आणि विलंब व्याज (वार्षिक १८ टक्के) सात दिवसांच्या आत महसुल खात्यात भरायला सांगण्यात आले आहे. अन्यथा, संबंधित रक्कम जमीन महसूल थकबाकीप्रमाणे वसूल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, हडफडे येथे क्लबला आग लागल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारी यंत्रणेने शुल्क न भरल्याने दोन कसिनोंचे कामकाज बंद करणारे दोन वेगवेगळे आदेश आज जारी केले. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिस महासंचालकांवर दिली आहे. गृह खात्याचे अवर सचिव (१) मंथन नाईक यांच्या स्वाक्षरीने हे आदेश आज जारी करण्यात आले आहेत.
बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमधील अग्नितांडवाला जबाबदार क्लब मालकांविरुद्ध गोवा पोलिसांनी इंटरपोलमार्फत (दी इंटरनॅशल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन) ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. वरील भीषण दुर्घटनेच्या दोन दिवसांत संशयित आरोपींविरुद्ध ही नोटीस जारी झाली आहे. साधारणपणे, या प्रक्रियेला आठवडा किंवा त्याहून अधिक वेळ लागतो. मात्र, या नोटीसीमुळे आरोपींना शोधण्यास मदत होईल. तसेच संशयितांना सध्याच्या ठावठिकाणाहून इतर कोणत्याही देशात स्थलांतरित होण्यापासून त्यांना नोटीसीमुळे रोखले जाईल.
बर्च क्लब दुर्घटनेप्रकरणी, हणजूण पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली आहे. ज्यामध्ये राजीव मोडक (४९), प्रियांशू ठाकूर (३२), राजवीर सिंघानिया (३२), विवेक सिंग (२७) या बर्च क्लबच्या व्यवस्थापकांना अटक झाली आहे. हे चौघेही संशयित सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत आहेत. तर, पाचवा संशयित भरत कोहली याला गोवा पोलिसांनी दिल्लीतून ट्रान्झिट रिमांडवर मंगळवारी हणजूण पोलीस स्थानकावर आणले. त्याचप्रमाणे, एफएसएल पथकाने बर्च या दुर्घटनाग्रस्त क्लबस्थळी सखोल तपासणी केली. तसेच पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी गुन्ह्याच्या ठिकाणाहून आवश्यक असलेले साहित्य गोळा केलेत.
पोलिसांनी गौरव लुथरा (४४), सौरभ लुथरा (४०), अजय गुप्ता यांच्या विरुद्ध अटक वारंट जारी केले आहे. तसेच, गौरव लुथरा, सौरभ लुथरा, अजय गुप्ता व सुरिंदर कुमार खोसला (ब्रिटीश नॅशनल) यांच्याविरुद्ध एलओसी म्हणजे लुक-आऊट सर्क्युलर जारी केले आहे.
‘बर्च बाय रोमियो लेन’ क्लबमधील दुर्घटनेच्या चौकशीसाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ डिसेंबर २०२५ रोजी उच्च न्यायालयात होणार आहे. ऐश्वर्या साळगावकर यांनी दाखल केलेल्या या याचिकेत, हडफडे येथील जीवघेण्या दुर्घटनेसाठी प्रशासनाचे धोरणात्मक अपयश आणि कथित भ्रष्टाचार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. बेकायदेशीर बांधकामे आणि परवाना देण्यात झालेल्या गंभीर त्रुटींमुळेच क्लबला कार्यरत राहण्याची परवानगी मिळाली आणि मोठी हानी झाली, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.