

पणजी: पतीसह तीन बहिणींना गमावण्याचा आघात सहन करणाऱ्या भावना जोशी यांच्या आयुष्यावर हडफडेतील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबमधील भीषण आग कायमची ओरखडे उमटवून गेली आहे. उत्तर प्रदेशातील गझियाबाद येथून गोव्याला सहलीसाठी आलेल्या या कुटुंबावर आनंदाच्या प्रवासातच काळाने घाला घातला.
भावना जोशी या पती विनोद कुमार आणि तीन बहिणी – अनिता, सरोज व कमला यांच्यासह ४ डिसेंबर रोजी गोव्यात दाखल झाल्या होत्या. बागा येथील हॉटेलमध्ये त्यांनी निवासाची व्यवस्था केली होती. समाजमाध्यमांतून पाहिलेल्या नाईट लाईफचा अनुभव घेण्यासाठी हे कुटुंब हडफडेतील प्रसिद्ध ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबमध्ये गेले होते. बागापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर हा क्लब आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भावना व त्यांचे पती उत्तर प्रदेशात राहत होते, तर तिन्ही बहिणी दिल्लीतील रहिवासी होत्या. या कुटुंबाने क्लबमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांतच आगीचा भडका उडाला. आग पसरताच सर्वजण बाहेर पळण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी विनोद कुमार यांनी भावना यांना मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर ढकलून त्यांचा जीव वाचवला. तसेच आत अडकलेल्या तिघींना परत क्लबमध्ये जाऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून चौघांचाही मृत्यू झाला.
या भीषण आगीची बातमी रविवारी सकाळपासून राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर झळकत होती. दिल्लीतील जोशी कुटुंबीयांना या दुर्घटनेची माहिती मिळताच ते तातडीने गोव्याच्या दिशेने रवाना झाले. त्यांची मुले आणि नातेवाईकही चिंतेत आहेत. ‘‘आम्ही सध्या कुटुंबातील सदस्यांना केवळ दोन बहिणींबाबतची माहिती दिली आहे, इतर बेपत्ता असल्याचेच सांगितले आहे. आम्हाला मृतदेह गोव्याहून दिल्लीला न्यायचे आहेत’’ अशी वेदनादायक प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
भावना जोशी क्लबच्या बाहेर उभ्या राहून पती व बहिणींची वाट पाहत होत्या. जेथे मुक्काम केला होता, त्या हॉटेलमध्ये फोन करून त्यांनी मदतीची याचना केली. मात्र तोवर सर्व काही संपले होते. क्लबबाहेर गोंगाट, लोकांची धावपळ आणि आगीच्या ज्वाळांमध्ये जळणारा क्लब पाहून त्यांच्या मानसिक अवस्थेचे वर्णन शब्दांत करणे अशक्य आहे. त्या सतत पतीला फोन करत होत्या, फोन वाजत होता, पण कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.
शेवटी जेव्हा क्लबमधून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, तेव्हा भावनांच्या उरल्यासुरल्या आशाही संपल्या. क्लब परिसरात एकट्या पडलेल्या भावनांना त्यांच्या हॉटेलचे कर्मचारी घटनास्थळी येऊन धीर देत होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.