गोव्यातील मराठीचा इतिहास हा केवळ भाषेचा इतिहास नाही, तर तो सांस्कृतिक संघर्षाचा ज्वलंत दस्तऐवज! हाती राजदंड, पण पाय डळमळीत

Marathi Language Goa: गोव्याने मराठी केवळ जपलीच नाही, तर आपल्या संत साहित्याने आणि बा. भ. बोरकरांसारख्या महनीय साहित्यिकांनी या भाषेत मोलाची भर घातली आहे.
Marathi Language Goa
Marathi Language GoaDainik Gomantak
Published on
Updated on

आमोद कुलकर्णी

मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळाला, ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण हा सन्मान मिळत असतानाच, गोव्यात मराठी शाळांची दारे कायमची बंद होणे हा एक क्रूर विरोधाभास आहे.

आपण एका बाजूला मराठीच्या प्राचीनतेचा उत्सव साजरा करत आहोत आणि दुसऱ्या बाजूला तिच्या भविष्याचा गळा घोटत आहोत. राजदंड हाती आला खरा, पण ज्या पायावर हा डोलारा उभा आहे, तो पायाच आज भुसभुशीत झाला आहे. ही मराठीची ‘नैसर्गिक निवृत्ती’ नव्हे, तर आपल्या सर्वांच्या हाताने झालेली ही ‘सामूहिक हत्या’ आहे!

गोव्यातील मराठीचा इतिहास हा केवळ भाषेचा इतिहास नाही, तर तो सांस्कृतिक संघर्षाचा ज्वलंत दस्तऐवज आहे. सोळाव्या शतकात थॉमस स्टिफन्सने

जैसी पुस्पांमाजि पुस्पमोगरी।

तैसी भासांमाजि भासा मराठी

असे म्हणत या भाषेचा गौरव केला. महाराष्ट्रात जेवढी मराठी जपली गेली, तेवढीच ती गोव्यानेही आजवर प्राणपणाने जपली आहे.

गोव्याने मराठी केवळ जपलीच नाही, तर आपल्या संत साहित्याने आणि बा. भ. बोरकरांसारख्या महनीय साहित्यिकांनी या भाषेत मोलाची भर घातली आहे. परकीय आक्रमणात जेव्हा मराठी ग्रंथ जाळले जात होते, तेव्हा इथल्या पूर्वजांनी ते मुखोद्गत करून जतन केले. आज त्याच भाषेच्या शाळांना टाळे लागणे हा त्या पूर्वजांच्या रक्ताचा आणि संघर्षाचा अपमान आहे.

केवळ भावनिक साद म्हणून नव्हे, तर विज्ञानाच्या कसोटीवरही मातृभाषेतून शिक्षण हेच सर्वोत्तम मानले गेले आहे. नामवंत शिक्षणतज्ज्ञ आणि बालमानसशास्त्रज्ञांच्या मते, मुलाची प्राथमिक समज त्याच्या घरातील भाषेशी जोडलेली असते.

प्रख्यात मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे (गशरप झळरसशीं) यांच्या सिद्धांतानुसार, मूल जेव्हा त्याच्या परिचयाच्या भाषेत (मातृभाषेत) शिकते, तेव्हा त्याचे संपूर्ण लक्ष विषयातील ‘आशयावर’ असते. याउलट, परकीय भाषेत शिकताना त्याचे अर्धे लक्ष शब्दांचा अर्थ लावण्यात खर्च होते,

ज्यामुळे पाया कच्चा राहतो. मातृभाषा ही विचारांची भाषा आहे. जेव्हा शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असते, तेव्हा मुलाची कल्पनाशक्ती विस्तारते. इंग्रजीच्या अट्टहासापोटी आपण आज मुलांमधील ‘मूळ विचार’ करण्याची क्षमताच नष्ट करत आहोत का? हा प्रश्न पालकांनी स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.

आजच्या परिस्थितीचा सर्वात भीषण पैलू म्हणजे मराठी आणि कोकणी यांच्यातील विनाकारण संघर्ष. आपण या दोन भाषांच्या वादात इतके गुंतलो गेलो आहोत की, या दोघांच्या भांडणात इंग्रजी बाजी मारून जातेय, हे आपल्या लक्षातही येत नाही.

हा केवळ भाषेचा वाद नाही, तर हा भाषिक आत्मघात आहे. मराठी आणि कोकणी या दोन्ही भाषांनी आता वादाचे कोतेपण सोडून आपले समृद्ध साहित्य शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांतून ताकदीने पुढे आणले पाहिजे. आजचा विद्यार्थी यामुळेच ‘भाषिक त्रिशंकू’ झाला आहे; तो ना धड मराठी बोलू शकतो, ना धड कोकणी, ना धड इंग्रजी!

मराठी टिकवण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही, ती तितकीच आपल्या ज्येष्ठ साहित्यिकांची आणि बुद्धिजीवींचीसुद्धा आहे. पण आपले साहित्यिक केवळ पुरस्कारांच्या राजकारणात मग्न आहेत.

गोव्यातील शैक्षणिक मराठी पुस्तके वर्षानुवर्षे तीच रटाळ साचेबद्धता ओढत आहेत. त्यात आधुनिक जगाशी स्पर्धा करणारी वैचारिकतेची ठिणगी टाकण्यात आपले ‘बुद्धिजीवी’ अपयशी ठरले आहेत.

Marathi Language Goa
Marathi Official Language: "मराठी राजभाषा झालीच पाहिजे"! डिचोलीत महिलांचा जयजयकार; धालो, फुगडी, दिंडीतून व्यक्त केला निर्धार

पाठ्यपुस्तकांमधील हा रटाळ दर्जा विद्यार्थ्यांमध्ये भाषेबद्दल अनास्था निर्माण करत आहे. जेव्हा जबाबदारी घेण्याची वेळ येते, तेव्हा प्रत्येक घटक आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून ‘इदं न मम’ म्हणत नामानिराळा होत आहे.

आता केवळ मलमपट्टी करून चालणार नाही. पाठ्यपुस्तकांचे आधुनिक जगाशी सुसंगत असे ‘स्मार्ट’ नूतनीकरण करणे आवश्यक आहे. शाळांमध्ये ‘द्विभाषिक शिक्षण’ पद्धती राबवून मातृभाषा आणि इंग्रजी यांचा योग्य समतोल साधला पाहिजे.

Marathi Language Goa
Goa Marathi Natyaspardha: '..असे प्रकार घडत राहिले तर मात्र सगळ्या नाट्यस्पर्धांवरच पडदा पडेल'; निकालांवरच प्रश्नचिन्ह?

मातृभाषेतून शिकणाऱ्यांना सरकारी नोकऱ्यांत प्राधान्य किंवा आरक्षण देण्यासारखे धाडसी निर्णय हवेत. साहित्याचा आधुनिक चेहरा आणि पोटाची भाषा यांची सांगड घातली, तरच मराठी शाळा पुन्हा गजबजतील.

मराठी शाळा स्वतःहून बंद पडत नाहीत, त्या आपल्या मौनाच्या संमतीने बंद केल्या जातात. जर आज आपण ही मातृभाषेची ज्योत विझू दिली, तर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. जिथे शाळांची घंटा थांबते, तिथे संस्कृतीचा श्वास गुदमरतो; आणि जिथे भाषा मरते, तिथे इतिहास मुका होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com