वाळपई: निलंबित पोलिस शिपाई तथा वाहनचालक गौरेश नाईक यांच्या नाणूस-बेतकेकरवाडा येथील बंगल्यावर शुक्रवारी दक्षता संचालनालयाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकला. सकाळी सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अधिकाऱ्यांच्या पथकाने बंगल्यासह त्यांच्या मालकीच्या वाहनांची आणि अन्य मालमत्तेची तपासणी केली. या कारवाईमुळे सत्तरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाईक यांच्या मालमत्तेसंदर्भात दाखल झालेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली. वाळपई पोलिस स्थानकात वाहनचालक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या विरोधात आर्थिक व्यवहार आणि कथित वसुलीबाबत तक्रारी झाल्या होत्या.
या कथित वसुलीतून त्यांनी मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमा केल्याचा आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणी वाळपईतील एका व्यक्तीने दक्षता खात्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारीसोबत बंगल्याची, वाहनांची छायाचित्रे तसेच अन्य पुरावे सादर केल्याचे समजते. त्यानंतर आता दक्षता खात्याने थेट त्यांच्या बंगल्यावर तपासणी सुरू केली आहे.
विधानसभेतही गाजला होता विषय
गौरेश नाईक यांच्या कथित आर्थिक व्यवहारांचा आणि मालमत्तेचा विषय यापूर्वी विधानसभेतही उपस्थित झाला होता. हळदोणाचे काँग्रेस आमदार कार्लुस फरेरा यांनी गेल्या वर्षी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पावसाळी अधिवेशनातही हा विषय चर्चेत आला. या प्रकरणावरून सरकारवर दबाव वाढल्यानंतर नाईक यांना निलंबित करण्यात आले होते. निलंबनाच्या वेळी ते पर्वरी पोलीस स्थानकात कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांची वाळपईहून पर्वरी येथे बदली झाली होती.
बदलीवेळी फोडले होते फटाके
वाळपई पोलिस स्थानकातील त्यांच्या कार्यपद्धतीवर स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याची चर्चा होती. बदलीसाठी राजकीय दबाव असल्याचेही स्थानिक पातळीवर बोलले जात होते. त्यांच्या बदलीनंतर वाळपईतील काही नागरिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केल्याचा व्हिडीओही समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या कारवाईत दक्षता अधिकाऱ्यांना नेमके काय आढळले, याची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती. तपासणीचा कालावधी आणि पुढील कारवाईबाबतही स्पष्टता नव्हती. त्यामुळे या चौकशीतून कोणती माहिती समोर येते, याकडे सत्तरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.