पणजी : पत्रकारांवर हल्ला होऊन 48 तास उलटल्यानंतर हणजूण पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही तपासात उघड झालं आहे. आरोपींनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ तक्रारीवेळीच सादर करुनही पोलिसांना त्यांची नावं शोधायला 48 तास कसे काय लागले अशी चर्चाही सध्या हणजुण परिसरात सुरु आहे.
हणजूण पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंतोनिओ मेनिनो फर्नांडिस आणि आलेक्स केविन फर्नांडिस, दोघेही राहणार हणजूण आणि नॉर्मन ओस्विन पिंटो राहणार म्हापसा यांनी पत्रकारांना मारहाण केल्याची माहिती आहे. दरम्यान मुख्य आरोपी अंतोनिओ मेनिनो फर्नांडिस याने अटकपूर्व (Arrest) जामिनासाठी म्हापशातील विशेष सेशन कोर्टात अर्ज केला आहे.
शनिवारी संध्याकाळी 6.20 मिनिटांच्या सुमारास 'गोंयकारपण'चे दोन पत्रकार हणजूणमध्ये सेंट अँथनी प्राएस वाडो येथे नागरिकांशी बोलण्यासाठी गेले होते. मात्र ते घरी परतत असताना तीन आरोपींना त्यांची वाट अडवली आणि त्यांना हॉटेल आणि बारचे फोटो का काढले यावरुन जाब विचारला. तसंच घरी येऊन धडा शिकवण्याची धमकीही आरोपींनी पत्रकारांना दिली होती. यावेळी हेराल्ड या वृत्तसंस्थेची महिला पत्रकार हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत असल्याचं पाहून आरोपींनी आपला मोर्चा तिच्याकडे वळवला आणि तिच्याशी गैरवर्तन करत धमकावलं. यातील दोन पत्रकारांनी लगेच हणजूण पोलीस (Police) स्टेशन गाठत पुराव्यानिशी या प्रकरणी तक्रार दाखल केली.
हणजूण पोलिसांनी व्हिडीओतील चेहरे पाहूनही अज्ञातांविरोधात तक्रार नोंद केली. आरोपींपैकी एका आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून सध्या तो जामिनावर (Bail) बाहेर असल्याची माहिती आहे. ज्यावेळी हे पत्रकार बार आणि रेस्टॉरन्टमध्ये बातमी कव्हर करत होते. त्यावेळी तिनही आरोपी हॉटेलच्या दरवाज्यात त्यांची वाट पाहात होते. ते बाहेर पडताच धमकावण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी तीन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.