पणजी: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याची राजकीय कुंडलीच काल सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आमदार मायकल लोबो यांच्यासमोर मांडली. शहा यांना गोव्यातील घडामोडींची खडान्खडा माहिती असल्याचे पाहून अवाक् होण्याची वेळ या दोन्ही नेत्यांवर आली.
नवी दिल्लीत काल सोमवारी झालेल्या या बैठकीत फक्त पंधरा मिनिटे चर्चा झाली असली तरी त्यातून शहा यांना गोव्यातील प्रत्येक हालचालींचे तपशीलवार ज्ञान असल्याचे स्पष्ट झाले. कोण कोणाशी बोलतो आहे, कोणाची कोणाशी जवळीक आहे याची त्यांना पुरेपूर माहिती असून त्यांची गोव्याच्या राजकारणावर बारीक नजर असल्याचे दिसून आले.
या भेटीनंतर मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर राज्यात काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविली. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आमदार कोणत्याही अटीविना पक्षात आले होते. त्यामुळे पुढील कोणताही निर्णय हा पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती मिळत आहे. भाजपमध्ये सध्या अधिवेशनानंतर फेरबदल व्हावा अशी भूमिका घेतली जात आहे. गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार, याबाबत चर्चा सुरू आहे. शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांचे नाव चर्चेत आहे.
सभापती रमेश तवडकर यांनाच अधिवेशनकाळात सभापतिपदी कायम ठेवण्याची भाजप नेत्यांची इच्छा आहे. विरोधक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने अनुभवी पीठासीन अधिकारी म्हणून तवडकर यांचा अनुभव कामी येईल, असे भाजपला वाटते.
मंत्रिमंडळातील फेरबदल आणि पक्षांतर्गत समीकरणे या सर्व हालचाली विधानसभेच्या अधिवेशनानंतर गती घेतील, एवढे मात्र निश्चित. अमित शहांची दूरदृष्टी आणि बारकाईने ठेवलेली नजर गोव्यातील राजकीय दिशा ठरवण्यात निर्णायक ठरणार, हे आता नाकारता येणार नाही.
दुसरीकडे, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा सध्या दिल्लीत ‘एम्स’मध्ये उपचार घेत आहेत. त्यांना पुढील चार दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्याऐवजी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. मात्र, सिक्वेरा यांना डिस्चार्ज मिळेपर्यंत त्यांच्याबाबत कोणताही निर्णय होणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
गोविंद गावडेंच्या जागी दिलायला?
मंत्रिमंडळ फेरबदलाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर त्यांच्या जागी कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. सभापती रमेश तवडकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी चर्चा असली तरी काहींच्या मते शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांना या जागी संधी मिळू शकते.
रमेश तवडकरच तोपर्यंत सभापती
राज्य विधानसभेचे १५ दिवसीय अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होत आहे. सभापती रमेश तवडकर हेच या पदावर कायम असावेत असे भाजप नेत्यांना वाटते. अधिवेशन काळात विरोधक आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने अनुभवी सभापतीच पीठासीन अधिकारी म्हणून हवेत असे बोलले जात आहे.
लोबोंना मिळणार ‘त्या’ कामगिरीचे फळ!
काँग्रेसमधून आठ आमदार भाजपमध्ये आले तेव्हा त्यांचे नेतृत्व मायकल लोबो यांनी केले होते. वीस महिन्यांपूर्वी लोबो यांची अमित शहा यांच्यासोबत भेट झाली होती. त्यावेळी शहा यांनी ‘पुन्हा भेटीसाठी वेळ देतो’ असे आश्वासन दिले होते. काल त्यांना शहा यांच्या कार्यालयातून फोन आला आणि त्यांना दिल्लीत बोलविले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.