Panaji News : भूबळकाव प्रकरणातील मास्टरमाईंड सुलेमान महमद खान उर्फ सिद्दीकी याला पोलिस कोठडीतून पलायनास मदत केल्याबद्दल आयआरबीचा पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याला सेवेतून बडतर्फ केले आहे.
क्राईम ब्रँचमधील कोठडीच्या पहाऱ्यासाठी एक पोलिस हवालदार आणि दोन पोलिस कॉन्स्टेबल नेमलेले असतात. पोलिस हवालदाराने अधूनमधून कॉन्स्टेबल्सच्या ड्युटीवर लक्ष ठेवायचे असते. मात्र, त्यामध्ये निष्काळजीपणा झाला आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या तपास अधिकाऱ्याचीही जबाबदारी होती.
संशयित अमित नाईक याची आर्थिक स्थिती चांगली असूनही तो संशयित सुलेमानने दाखविलेल्या तीन कोटी रुपयांच्या आमिषाला भुलला. पोलिस खात्यात झटपट पैसा मिळविता येतो, हे स्वप्न घेऊनच तो भरती झाला होता. अनेकदा तो आपल्या साथीदारांशी कोटींच्या व्यवहाराबाबत चर्चा करायचा. ही संधी त्याच्याकडे आयतीच चालून आल्याने त्याचा फायदा उठविण्याचे त्याने ठरविले. नोकरी गमवावी लागली तरी कोट्यवधी रुपयांची त्याला नशा चढली होती, असे सूत्रांनी सांगितले.
रात्रीच्यावेळी अमित ड्युटीवर असतानाच हा कट शिजला होता. सुमारे तीन कोटी रुपयांचा सौदा झाल्याचे संशयित अमितने चौकशीवेळी कबूल केले आहे. मात्र, ही रक्कम त्याला मिळाली नाही. संशयित हजरत अली याला हुबळीहून आणण्यात आले असून त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
संशयित सुलेमानला हुबळीहून पलायन करण्यास मदत करणारा संशयित हजरत अली याचीही पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून तो सुलेमानचाच साथीदार आहे. त्याच्याविरुद्धही कर्नाटकात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.
सुलेमान कोठे गायब झाला, याची माहिती अलीकडून मिळविण्यात पोलिसांना यश आलेले नाही. देशातून बाहेर जाऊ नये, यासाठी सुलेमानची माहिती विमानतळ इमिग्रेशन कार्यालयांना दिली आहे. हजरत अलीच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्स (सीडीआर) घेऊन तपास सुरू आहे.
क्राईम ब्रँचमध्ये जेव्हा सफाई कामगार आला, तेव्हा अमितने सफाई कामगाराच्या हातातून फिनाईलची बाटली हिसकावून घेतली आणि फिनाईल प्राशन केले. अचानक घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे क्राईम ब्रँचमध्ये एकच धावपळ उडाली. अमितला त्वरित गोमेकॉत उपचारासाठी नेले. त्याची प्रकृती आता ठीक असून त्याला इस्पितळात ठेवलेल्या खोलीबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
सुलेमानला कोठडीतून बाहेर काढून हुबळीपर्यंत दुचाकीवरून पोहोचविण्यामागील माहिती घेण्यासाठी पोलिसी हिसका दाखविताच अमित मुकाटपणे बोलू लागला. सुलेमानने दाखविलेल्या ३ कोटी रुपयांच्या आमिषाला आपण बळी पडल्याचे त्याने सांगितले. आयुष्यभर नोकरी करूनही एवढी मोठी रक्कम जमा करणे शक्य होणार नाही. ती एकदाच मिळेल, यासाठी नोकरी गेली तरी हरकत नाही, असे ठरवूनच सुलेमानची सुटका केली, असे अमित म्हणाला.
अमितने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी इस्पितळात जाऊन त्याची चौकशी केली. पोलिसी हिसका, कुटुंबाची बदनामी तसेच सुलेमानकडून झालेली फसवणूक याला कंटाळून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो फसला. त्यामुळे आता त्याच्यावर सतत देखरेख ठेवण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी पणजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून (उपअधीक्षक) अहवाल मागविण्यात आला आहे.
म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाला (Court) शुक्रवारच्या सुनावणीवेळी संशयित सुलेमान कोठडीतून पळाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे १६ डिसेंबरला म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालय त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.