Goa Population: देशाची पर्यटन राजधानी अशी ओळख असलेल्या गोव्यात एकूण 75 टक्क्याहून अधिक लोकसंख्या शहरी भागात राहते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाने म्हटले आहे. आयोगाच्या आकडेवारीनुसार गोव्याची लोकसंख्या सध्या 15.7 लाख इतकी आहे.
आर्थिक सर्व्हेक्षण 2022-23 च्या अहवालाच्या हवाल्याने इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. गोव्यातील 15.7 लाख लोकसंख्येपैकी 7.9 लाख (50.4 टक्के) पुरुष आहेत आणि 7.8 लाख (49.6 टक्के) महिला आहेत.
2011 च्या जनगणनेनुसार गोव्याची लोकसंख्या 14.6 लाख होती. 2021 ची जनगणना साथीच्या रोगामुळे होऊ शकली नाही. ती यंदा होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
गोव्यातील शहरी भागातील लोकसंख्येच्या घनतेबद्दल बोलताना आयोगाने म्हटले आहे की, गोव्यातील शहरी लोकसंख्या आता पुर्णतेच्या पातळीवर पोहचत आहे. शहरीकरणाचा जलद वेगामुळे हे घडत आहे.
शहरी राहणीमान, उत्तम रोजगार आणि शिक्षणाच्या संधी, उत्तम आरोग्य आणि सामाजिक सेवा, सांस्कृतिक उपक्रमांच्या संधी यामुळे हे घडले आहे. दरम्यान, वाढत्या लोकसंख्येच्या गरजांची पुर्तता करण्यासाठी राज्याकडे विकास योजना असणे आवश्यक आहे.
आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, 2023 संपलेल्या दशकात राज्याच्या लोकसंख्येची वाढ 7.9 टक्के इतकी जास्त झाली. 2011 ते 2021 या मागील दशकाच्या तुलनेत ज्यामध्ये दशकातील लोकसंख्या वाढ 6.8 टक्के होती.
दरडोई GSDP उच्च असल्यामुळे गोव्यात निःसंशयपणे वेगाने शहरीकरण झाले आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले आहे की 2023 या वर्षासाठी गोव्यातील अंदाजित लोकसंख्येपैकी 75.8 टक्के शहरी असल्याचे नोंदवले गेले आहे.
दोन वर्षांपूर्वी गोव्याच्या शहरी भागात 11.5 लाख लोक राहत होते, आज जवळपास 12 लाख लोक शहरांमध्ये राहत आहेत. दरम्यान, गोव्यातील ग्रामीण लोकसंख्या 2021 मध्ये 4.2 लाखांवरून 2023 मध्ये 3.8 लाखांवर आली आहे.
गेल्या दशकात गोव्याच्या ग्रामीण लोकसंख्येतील सरासरी घट 1.2 टक्के आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.