Dengue patients in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात सहा महिन्यात डेंग्यूचे 164 रुग्ण, 40 जणांना मलेरिया

डेंग्यू (Dengue ), मलेरिया आणि चिकुनगुनिया हे रोग डासांपासून होतात. मात्र, पावसाच्या गढूळ पाण्यात डासांची पैदास होत नाही.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात गेल्या सहा महिन्यांत डेंग्यूचे (dengue) 164 रुग्ण सापडले असून, 40 व्यक्तींना मलेरियाची लागण झाली आहे. (164 dengue patients in Goa in six months)

साथ रोग प्रसारण नियंत्रण मोहिमेच्या प्रमुख डॉ. कल्पना महात्मे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया हे रोग डासांपासून होतात. मात्र, पावसाच्या गढूळ पाण्यात डासांची पैदास होत नाही. मात्र, पावसाचे पाणी टायर, भांडी, बाटल्या यात साचले तर त्यात डासांची पैदास होते. त्यामुळे नागरिकांनी घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये. आपल्या विभागाने पावसाळ्‍यापूर्वी स्वच्छता अभियान राबवले होते. आता पाऊस संपल्यानंतर पुन्हा ते राबवले जाईल. सध्या जागोजागी औषध फवारणी सुरू असल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.

आरोग्य खात्याचे कर्मचारी जेव्हा घरोघरी सफाई अभियानासाठी जातात त्यावेळी लोकांनी त्यांना सहकार्य करावे. त्यांच्याकडे राहणाऱ्या भाडेकरुंची माहिती द्यावी. कारण मलेरियाची लागण कामगारांना जास्त होत असल्याचे दिसून आले आहे, असेही त्या म्हणाल्या. 2017 साली गोव्यात मलेरियामुळे एक व्यक्ती दगावली होती. त्यानंतर एकही मृत्यू झालेला नाही, अशी माहिती डॉ. महात्मे यांनी दिली.

चिकुनगुनियाचे रुग्ण नाहीत

1 जानेवारी ते 30 जून या काळात 164 लोकांना डेंग्यूची लागण झाली, तर 40 लोकांना मलेरियाची लागण झाली आहे. गतवर्षी 337 व्यक्तींना डेंग्यूची, तर 102 व्यक्तींना मलेरियांची लागण झाली होती. गेल्यावर्षी मलेरिया किवा डेंग्यूमुळे एकही मृत्यू झाला नव्हता. चिकुनगुनियाचे रुग्ण गोव्यात अद्याप तरी सापडलेले नाहीत, असे डॉ. कल्‍पना महात्मे यांनी सांगितले.

डेंग्‍यूचे भय संपत नाही..!

गतवर्षी प्रियोळमध्‍ये डेंग्‍यूच्‍या रुग्‍णांनी पन्नाशी गाठल्‍यानंतर आता केपे परिसरात डेंग्‍यूचे तब्‍बल बारा संशयित रुग्‍ण सापडल्‍याने, तसेच दोन आठवड्यांपूर्वी धारगळ परिसरात मलेरियाचे बारा रुग्‍ण सापडल्‍याने स्‍थानिकांत घबराट पसरली आहे. कोविडचा फैलाव नुकताच कमी होत असताना पावसाबरोबरच आता तापाच्‍या साथीने डोके वर काढल्‍याने आधीच दमछाक झालेल्‍या आरोग्‍य खात्‍यासमोर त्‍याचे समूळ उच्चाटन करण्‍याचे आव्‍हान निर्माण झाले आहे. लोकांनीही सावधगिरी बाळून आपल्‍याबरोबर इतरांचेही आरोग्‍य जपल्‍यास संकटमुक्त होऊ शकतो. कोविडचे संकट घोंगावण्‍यापूर्वी वास्‍कोतील मांगोरहिल, मेरशी, चिंबल, पणजी, ताळगाव, सांतिनेज, म्‍हापसा, फोंडा, मडगाव परिसरात डेंग्‍यूचे रुग्‍ण प्रचंड वाढले होते. काहीजण मृत्‍युमुखीही पडले होते. लोकांनी सावधगिरी न बाळगल्‍याने कोरोनाबरोबर डेंग्‍यूचे दुहेरी संकट पुन्‍हा ओढवून घेतले आहे.

फोंड्यात रुग्‍ण नसले, तरी सतर्कता हवीच

फोंडा तालुक्यात अधूनमधून डेंग्‍यू व मलेरिया डोके वर काढत असून दोन वर्षांपूर्वी प्रियोळ भागात डेंग्‍यू रुग्णांनी पन्नाशी ओलांडली होती. प्रियोळ तसेच इतर भागात दोन वर्षांपूर्वी पन्नासपेक्षा जास्त रुग्ण सापडले होते. त्यात मंगेशी येथील एका महिलेचा बळी गेला होता. त्यानंतर आरोग्य खात्याने प्रभावी उपाययोजना केल्यानंतर तसेच नागरिकांनी सजगता दर्शवल्याने डेंगू रुग्ण संख्या आटोक्यात आली होती. आता डेंग्‍यू आणि मलेरियाचे रुग्ण फोंडा तालुक्यात नसले तरी धोका कायम आहे. गेल्या वर्षी पाच मलेरिया रुग्ण सापडले होते, मात्र ते परप्रांतीय कामगार होते.

फोंड्यातील बाबल्याखळी - नागझर कुर्टी भागात डेंगू व मलेरिया रुग्ण मागच्या काळात सापडल्यानंतर या ठिकाणीही आरोग्य खात्याने स्वच्छता मोहीम राबवली. बाबल्याखळी नागझर भागात झोपडपट्टी असून जागा मिळेल तेथे छोटी घरे बांधण्यात आली आहेत. या घरात भाड्याने देण्यासाठी खोल्या तयार केल्याने त्यात परप्रांतीयांनी बस्तान मांडले आहे. सांडपाणी तसेच शौचालय आदी सुविधा नसल्याने नागझर तसेच कुर्टीच्या इतर काही भागात लोक उघड्यावरच सर्व विधी उरकत असल्याने हा परिसर ओंगळवाणा ठरला आहे. आरोग्याच्या अनेक समस्या उद्‍भवतात. सुदैवाने गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीने शिरकाव केल्याने डेंगू व मलेरियाचे रुग्ण फोंड्यात सापडलेले नाहीत.

डासांची उत्‍पत्ती टाळा

फोंडा तसेच कुर्टी भागात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. कदंब बसस्थानक तसेच अन्य भागात टायर पंक्चर काढणाऱ्यांकडून पावसाळ्यात टाकाऊ टायर व इतर वस्तू उघड्यावर फेकल्या जात असल्याने त्यात पाणी साचून डास पैदास होण्याचा धोका असतो. काही बागायतीत माडाच्या ‘पोयी‘ उघड्यावर टाकल्या जात असल्याने त्यातही पाणी साचून डासांची पैदास होते. आरोग्य खात्याने याप्रकरणी पाहणी करून आवश्‍यक त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

स्वच्छता महत्त्वाची

चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. आपले घर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच कुठेही पावसाचे पाणी साचणार नाही, याकडे प्रत्येकाने कटाक्ष ठेवायला हवा. पावसाचे पाणी साचल्यानंतर डासांची पैदास वाढते, त्यामुळे टाकाऊ टायर, करवंट्या, टाकाऊ प्लास्टिक उघड्यावर फेकू नका. स्वच्छतेला प्राधान्य द्या. फॉगिंगची आवश्‍यकता असल्यास त्यासंबंधी कळवा.

- डॉ. विकास कुवेलकर (वैद्यकीय अधीक्षक, फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळ)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT