

Persian Woman Israeli Man Los Angeles Love: युद्ध आणि प्रेम या जगातल्या दोन अशा गोष्टी आहेत ज्यांच्या सीमा कधीच निश्चित नसतात. 'प्रेम आणि युद्धात सर्वकाही माफ असते' ही म्हण सध्या इस्रायल आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अक्षरशः खरी ठरताना दिसत आहे. जिथे एकीकडे इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत आहे, तिन्ही देशांचे सैनिक एकमेकांना संपवण्याच्या रणनीती आखत आहेत, तिथेच या रणधुमाळीकडे दुर्लक्ष करुन एका इस्रायली सैनिकाने चक्क कट्टर शत्रू मानल्या जाणाऱ्या इराणच्या तरुणीशी प्रेमसंबंध जोडून साखरपुडा केला.
ही कहाणी कोणत्याही चित्रपटाच्या कथानकापेक्षा कमी नाही, कारण यात दोन भिन्न धर्म, भिन्न संस्कृती आणि एकमेकांना संपवण्यास टपलेले दोन देश यांचे अडथळे असूनही प्रेमाचा विजय झाला.
इस्रायलच्या गोलानी ब्रिगेडचा एक रिझर्व्ह सैनिक असलेल्या 'डीन'ला (बदलेले नाव) कधीही स्वप्नात वाटले नव्हते की, अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये सांता मोनिका येथील एका बारमध्ये त्याची भेट अशा महिलेशी होईल जी त्याच्या जीवनाचे केंद्र बनेल आणि जिचा जन्म इराणमध्ये झाला असेल. डीन आणि इराणच्या 'अजादेह'ची (बदलेले नाव) पहिली भेट 2019 मध्ये झाली होती. त्यावेळी त्यांच्यात फक्त जुजबी बोलणे झाले, पण त्यांच्यातील संवादाचा खरा धागा कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये विणला गेला.
डीन जेव्हा इस्रायलमध्ये होता, तेव्हा त्याने तेल अवीवमधील एका पर्शियन रेस्टॉरंटचा फोटो सोशल मीडियावर टाकला. हा फोटो पाहून अजादेहने त्यावर प्रतिक्रिया दिली आणि तिथूनच त्यांच्यातील प्रेमाच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. काही महिन्यांनंतर जेव्हा डीन पुन्हा अमेरिकेला परतला, तेव्हा दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि लवकरच ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
ही प्रेमकहाणी केवळ दोन व्यक्तींची नसून दोन विचारधारांचीही आहे. अजादेहने स्पष्ट केले की, ती मुस्लीम किंवा ज्यू या पलीकडे जाऊन मानुसकीवर विश्वास ठेवते. इराणच्या इस्फहान शहरात जन्मलेली अजादेह 18व्या वर्षी अमेरिकेत आली होती. इराणमधील निर्बंध आणि कठीण परिस्थितीनंतरही तिला आपला देश सोडायचा नव्हता, पण तिच्या मावशीच्या आग्रहामुळे ती अमेरिकेत स्थायिक झाली. तिने गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आईला पाहिलेले नाही, कारण तिची आई आणि भाऊ अजूनही इराणमध्येच राहतात. त्यांच्या सुरक्षेचा विचार करुनच या प्रेमी युगुलाने आपली खरी नावे आणि फोटो प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला. अजादेहसाठी डीनची ज्यू ओळख कधीच अडथळा ठरली नाही, उलट तिला इस्रायली संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची मोठी उत्सुकता होती.
आज डीन आणि अजादेह यांचा साखरपुडा झाला असून ते एकत्र राहण्याचे स्वप्न पाहत आहेत. जगाच्या नजरेत त्यांचे देश एकमेकांचे कट्टर शत्रू असले, तरी या दोघांच्या डोळ्यात एक वेगळेच भविष्य आहे. त्यांना आशा आहे की एक दिवस दोन्ही देशांमधील युद्धाची धग शांत होईल आणि ते मुक्तपणे एकमेकांच्या वतनाचा प्रवास करतील. त्यांना एकत्र तेहरानच्या गल्ल्यांमध्ये फिरायचे आहे आणि तेल अवीवच्या समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्त पाहायचा आहे. राजकीय तणाव आणि सीमेवरील गोळीबाराच्या आवाजात या दोन जीवांनी जोडलेले प्रेमाचे नाते हेच सिद्ध करते की, द्वेषाच्या भिंती कितीही उंच असल्या तरी प्रेमाचा एक कोमल स्पर्श त्या पार करण्याची ताकद ठेवतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.