यंदाचा आयपीएल हंगाम (IPL2025) बिहारच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने गाजवला. हा हंगाम वैभवसाठी खूप खास ठरला. त्याने लहान वयातच क्रिकेटच्या सर्वात मोठ्या लीगमध्ये आपला जलवा दाखवून दिला. बिहारचा हा सुपुत्र भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. वैभवनंतर आता बिहारच्या आणखी एका धाकड फलंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील 13 वर्षीय क्रिकेटपटू अयान राजने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली.
जिल्हा क्रिकेट लीगच्या 30 षटकांच्या सामन्यात संस्कृती क्रिकेट अकादमीकडून खेळताना अयानने 327 धावांची धमाकेदार खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने 41 चौकार आणि 22 षटकार मारले. ही खेळी केवळ त्याच्या प्रतिभेचे प्रदर्शनच नाहीतर भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्याकडेही निर्देश करते. या सामन्यात अयानने 134 चेंडूंचा सामना करत 244 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. अयानने या खेळीत केवळ चौकार मारुन 296 धावा काढल्या, ज्यावरुन त्याची आक्रमक फलंदाजी दिसून येते.
अयान राजने त्याच्या यशाचे श्रेय त्याचा जवळचा मित्र आणि भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख स्टार वैभव सूर्यवंशीला दिले. अयानने माध्यमाशी बोलताना सांगितले की, 'वैभवपासून मी प्रेरणा घेतली. आम्ही लहानपणापासून एकत्र क्रिकेट खेळत आहोत. आज त्याने मोठे नाव कमावले. मी देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवत आहे.' अयानचे वडील देखील एक माजी क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी भारतासाठी (India) खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. अयानला त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.
वैभव सूर्यवंशीप्रमाणेच अयान राजने देखील शानदार खेळी खेळून बिहारमधील उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत ठरला. आयपीएलमध्ये (IPL) गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूत शतक ठोकून वैभवने इतिहास रचला, ज्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाज बनला. त्याचवेळी, अयानची ही खेळी कमी आश्चर्यकारक नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.