पणजी: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आमसभा व निवडणूक प्रक्रियेसाठी रोहन गावस देसाई यांचे नाव गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) प्रतिनिधी या नात्याने मतदार यादी मसुद्यात समाविष्ट करण्यास जीसीए अध्यक्ष विपुल फडके यांनी आक्षेप घेतला असून पुन्हा एकदा बीसीसीआय संयुक्त सचिवास रोखण्याचा प्रयत्न झालेला आहे.
सध्याच्या अंदानुसार, २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आमसभेत निवडणुकीद्वारे रोहन गावस देसाई यांना पुन्हा एकदा संयुक्त सचिवपदी संधी मिळण्याचे संकेत आहेत. बीसीसीआय निवडणूक अधिकारी यांनी १२ सप्टेंबर रोजी बीसीसीआय मतदार यादी मसुद्यास अंतिम स्वरुप दिले होते.
विपुल यांनी बीसीसीआय निवडणूक अधिकारी यांना पाठवलेल्या आक्षेप पत्रानुसार, रोहन यांचे नामनिर्देशन जीसीएच्या घटनेनुसार अधिकृत प्रतिनिधीने पाठवलेले नाही. जीसीए संविधानानुसार नामनिर्देशन पाठविण्याचा अधिकार सचिवाला असून, संयुक्त सचिवाकडे असा अधिकार नाही.
६ सप्टेंबर २०२५ रोजी जारी सूचनेनुसार फॉर्म ‘ए’ अधिकृत प्रतिनिधीने सही केलेला असणे आवश्यक आहे. संघटनेच्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत उपाध्यक्ष शंभा देसाई यांची कार्यकारी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याने, फक्त त्यांनाच जीसीएच्या वतीने पत्रव्यवहाराचा अधिकार आहे.
विपुल आक्षेप पत्रात दवा करतात, की फॉर्म ‘ए’ संयुक्त सचिवाने भरून दिलेला असल्याने तो अवैध व असंवैधानिक आहे. तसेच, रोहन गावस देसाई हे व्यवस्थाकीय समितीचे सदस्य नसल्याने त्यांची प्रतिनिधी म्हणून शिफारस होऊ शकत नाही.
सर्वोच्च नियुक्त केलेल्या प्रशासक समितीच्या २०१९ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार, बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होणारा प्रतिनिधी संबंधित संघटनेच्या मतदार यादीतील पात्र सदस्य असणे बंधनकारक आहे. मात्र, रोहन देसाई हे आजीवन सदस्य असून, घटनेनुसार त्यांना मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे ते पात्र नाहीत, असेही विपुल यांनी नमूद केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने १२ सप्टेंबर २०२५ रोजी व्यवस्थापकीय समितीची बैठक घेण्याचे आदेश दिले होते.
त्या बैठकीत दोन वेगवेगळे ठराव मांडण्यात आले, मात्र ५ सदस्यांनी ठरावावर सही करण्यास नकार दिल्याने वैध ठराव झालाच नाही, त्यामुळे बीसीसीआय निवडणूक अधिकाऱ्यास पाठविलेले रोहन गावस देसाई यांचे नामनिर्देशन बेकायदेशीर, अवैध असून त्याबाबत १२ सप्टेंबर २०२५ रोजी ई-मेलद्वारे निवडणूक अधिकाऱ्यास कळविण्यात आले आहे, असे विपुल यांनी पत्रात म्हटले आहे.
विपुल यांनी या प्रकरणी वैयक्तिक सुनावणीची विनंती बीसीसीआय निवडणूक अधिकाऱ्यास केली असून रोहन गावस देसाई यांचे गोवा क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी नामनिर्देशन फेटाळण्याची मागणी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.