
पणजी: गोव्यातील क्रिकेट विकासासाठी ‘परिवर्तन’ घडणार का या प्रश्नाचे उत्तर मंगळवारी (ता. १५) संध्याकाळी मिळणार आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनची (जीसीए) बहुचर्चित निवडणूक प्रक्रिया दुपारी तीनपर्यंत चालेल, त्यानंतर चार वाजता मतमोजणी होऊन तीन वर्षांसाठी क्रिकेट प्रशासनाची धुरा कोणाकडे राहील हे निश्चित होईल.
व्यवस्थापकीय समितीच्या एकूण सहा जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत. सचिवपद वगळता इतर पाच जागांसाठी दुहेरी चुरस आहे. निवडणूक रिंगणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) संयुक्त सचिव रोहन गावस देसाई यांचे समर्थन लाभलेला ‘जीसीए परिवर्तन’ गट असून त्यांच्यासमोर माजी अध्यक्ष चेतन देसाई-विनोद (बाळू) फडके गटाचे आव्हान आहे.
या गटाला माजी अध्यक्ष सूरज लोटलीकर व माजी खजिनदार अकबर मुल्ला यांचा पाठिंबा आहे. दोन्ही गट आपला विजय व मताधिक्याचा दावा करत आहे, मात्र मतदार असलेले १०७ क्लब कोणती भूमिका घेतील याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. निवडणूक अधिकारी ए. के. जोती यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी मतदार प्रक्रिया होईल.
येत्या २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बीसीसीआय आमसभा व निवडणूक प्रक्रियेसाठी जीसीएचा प्रतिनिधी नियुक्त करण्यावरून जीसीए निवडणुकीपूर्वी फड रंगला. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशान्वये अखेर रोहन गावस देसाई हेच जीसीएचे अधिकृत ‘प्रतिनिधी’ ठरले. याबाबतीत रोहन यांनी ‘लढाई’ जिंकल्याचे मानले जाते.
आता राज्य क्रिकेटमध्ये संलग्न १०७ क्लबांची भूमिका निर्णायक असेल. महत्त्वाची बाब म्हणजे, जीसीएचे माजी अध्यक्ष ॲड. दयानंद नार्वेकर यांचे सर्व समर्थक क्लब ‘जीसीए परिवर्तन’ गटाच्या बाजूने वळले आहेत हे रोहन यांच्या दोन दिवसांपूर्वीच्या पत्रकार परिषदेत सिद्ध झालेले आहेत.
खुद्द रोहन यांनी राज्यातील क्रिकेटमध्ये ॲड. नार्वेकर यांनी दिलेल्या योगदानाचा प्रामुख्याने उल्लेख करून त्यांचे आभार मानले होते. २०१२ नंतर ॲड. नार्वेकर ‘जीसीए’त सक्रिय नसले, तरी त्यांना मानणाऱ्या क्लबांचा गट अजूनही राज्य क्रिकेटमध्ये असून त्यांची भूमिका मंगळवारच्या निवडणुकीत निर्णायक ठरेल, असे सूत्राने नमूद केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘परिवर्तन’ गटातील उमेदवारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या गटाची भूमिका मांडली.
रोहन गावस देसाई यांच्या ‘परिवर्तन’ गटाने गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणीचा मुद्दा क्लबांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. डिचोली तालक्यातील वन-म्हावळिंगे येथे जीसीएच्या मालकीची स्टेडियमसाठी जागा आहे, त्याचठिकाणी क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी आमचा प्राधान्यक्रम राहील, आमचा गट निवडून आल्यास २०२७ पूर्वी स्टेडियम बांधण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे रोहन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसंदर्भात अगोदरच्या जीसीए व्यवस्थापकीय समितीकडे योग्य दृष्टिकोन नसल्याची टीका रोहन यांनी केली होती.
पद चेतन देसाई-बाळू फडके गट जीसीए परिवर्तन गट तटस्थ
अध्यक्ष महेश देसाई महेश कांदोळकर -
उपाध्यक्ष परेश फडते राजेश पाटणेकर -
सचिव तुळशीदास शेट्ये दया पागी हेमंत आंगले
संयुक्त सचिव अनंत नाईक सुशांत नाईक -
खजिनदार सय्यद अब्दुल माजिद रुपेश नाईक -
सदस्य महेश बेहकी मेगनाथ शिरोडकर -
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.