पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ‘एलिट’ पुनरागमन गोव्याच्या संघाने मागील तीन सामन्यांत खूपच लक्षवेधी ठरविले. चंडीगडविरुद्ध डावाने विजय, मातब्बर पंजाबवर पहिल्या डावात आघाडी, बलाढ्य कर्नाटकला विजयापासून दूर ठेवणाऱ्या मिलाप मेवाडा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे उल्लेखनीय खेळ केला. साहजिकच खेळाडूंचा आत्मविश्वास कमालीची उंचावला असून ते आता बलाढ्य मध्य प्रदेशच्या आव्हानासाठी सज्ज झाले आहेत.
गोवा आणि मध्य प्रदेश यांच्यातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा एलिट ‘ब’ गट चार दिवसीय सामना शनिवारपासून (ता. ८) पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर खेळला जाईल. सामन्याच्या अगोदरच्या दिवशी संघाने शुक्रवारी भर उन्हात दुपारपर्यंत जोरदार सराव केला. या कालावधीत खेळाडूंच्या देहबोलीच प्रचंड उत्साह जाणवला.
अगोदरच्या तीन लढतीतील सकारात्मक कामगिरीने खेळाडूंचा दृष्टिकोन पूर्णतः बदलल्याचे दिसून आले. मध्य प्रदेशचा संघ गोव्याला नक्कीच कमी लेखणार नाही हे स्पष्ट आहे. गोव्याचे सध्या ११, तर मध्य प्रदेशचे नऊ गुण झाले आहेत.
कसोटीपटू रजत पाटीदार नेतृत्व करण्यासाठी दाखल झाल्याने मध्य प्रदेशची ताकद वाढली आहे. व्यंकटेश अय्यरचा आंतरराष्ट्रीय अनुभव निर्णायक ठरू शकतो. यश दुबे, हिमांशू मंत्री, शुभम शर्मा, हरप्रीत सिंग हे पाहुण्या संघातील खेळाडू धोकादायक आहेत.
गोलंदाजीत मध्य प्रदेशचा संघ सरस भासतो. ऑफब्रेक सारांश जैन, डावखुरा कुमार कार्तिकेय हे फिरकी गोलंदाज याअगोदर प्रतिस्पर्ध्यांना भारी ठरले आहेत, कुलदीप सेनही वेगवान गोलंदाजीही प्रभावी आहे. विशेष बाब म्हणजे, संघाकडून प्रभावी कामगिरी करुन घेण्याचा प्रशिक्षक पंडित यांचा लौकिक आहे.
अनुक्रमे पंजाब, सौराष्ट्र, चंडीगडविरुद्धच्या अनिर्णित लढतीत मध्य प्रदेशने पहिल्या डावात आघाडी संपादली होती. यंदा गोव्याची फलंदाजी खूपच बहरली आहे.
पर्वरीत चंडीगडविरुद्ध गोव्याने पहिल्या डावात ५६६ धावा केल्या, न्यू चंडीगड येथे मागील लढतीत पहिला डाव ६ बाद ४९४ धावांवर घोषित केला, तर सामना गमावण्याचा धोका असताना कर्नाटकविरुद्ध दुसऱ्या डावात १ बाद १४३ करून सामना अनिर्णित राखला. गोव्याचे फलंदाज शानदार फॉर्ममध्ये आहेत.
पहिलाच रणजी मोसम खेळणारा डावखुरा अभिनव तेजराणा याने प्रत्येकी एक द्विशतक, शतक, अर्धशतक नोंदविताना तीन सामन्यांतील चार डावांत १४२.३३च्या सरासरीने ४२७ धावा केल्या आहेत. दिल्लीचा ‘पाहुणा’ ललित यादव याने एका द्विशतकासह २७० धावा केल्या आहेत.
मंथन खुटकर याने मागील दोन डावात दमदार फलंदाजी करताना दोन अर्धशतकांसह १७१ धावा केल्या आहे. हुकमी फलंदाज सुयश प्रभुदेसाई यालाही पंजाबविरुद्ध सूर गवसला. त्याने न्यू चंडीगड येथे १४९ धावा करून सामनावीर पुरस्कार पटकावला. कर्णधार स्नेहल कवठणकर यानेही मागील लढतीत अर्धशतक नोंदविले.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तब्बल १५ वर्षांनंतर गोवा आणि मध्य प्रदेश शनिवारी खेळतील. या दोन्ही संघांत आतापर्यंत तीन सामने झाले असून मध्य प्रदेशने एक सामना जिंकला असून अन्य दोन अनिर्णित लढतीत पहिल्या डावात आघाडी संपादली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.