पणजी: गोव्याची युवा गुणवान जलतरणपटू पूर्वी नाईक हिने मंगळवारी ६९व्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली, तर आरोही बोर्डे हिला रौप्यपदक मिळाले.
मंगळवारी समारोप झालेल्या या स्पर्धेत गोव्याला एकूण पाच पदके मिळाली. पूर्वी हिने १४ वर्षांखालील मुलींत एकूण तीन पदके पटकावली. मंगळवारी तिने १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली.
तिला अगोदर २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्य, तर ४०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये ब्राँझपदक मिळाले होते. गोव्याचे आणखी एक ब्राँझपदक १९ वर्षांखालील महिलांत पूजा राऊळ हिने २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये मिळविले होते. गोव्याच्या तिन्ही पदक विजेत्या जलतरणपटूंना गोव्यातील खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्राचे जलतरण मुख्य प्रशिक्षक टी. ए. सुजीत यांचे मार्गदर्शन लाभले.
मंगळवारी पूर्वी हिने १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये वेगवान जलतरण साधताना १ मिनिट ०३ सेकंद वेळ नोंदविली. ती साखळी येथील सेंट जॉन ऑफ द क्रॉस हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. आरोही हिने १७ वर्षांखालील मुलींच्या २०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत २ मिनिटे ३०.८३ सेकंद वेळेसह दुसरा क्रमांक मिळविला.
गोव्याचे पदकविजेते जलतरणपटू
पूर्वी नाईक (३ पदके, १४ वर्षांखालील मुली) : सुवर्ण : १०० मीटर फ्रीस्टाईल, रौप्य : २०० मीटर फ्रीस्टाईल, ब्राँझ : ४०० मीटर फ्रीस्टाईल.
आरोही बोर्डे (१ पदक, १७ वर्षांखालील मुली) : रौप्य : २०० मीटर बटरफ्लाय.
पूजा राऊळ (१ पदक, १९ वर्षांखालील मुली) : ब्राँझ : २०० मीटर फ्रीस्टाईल.
क्रीडा संचालकांनी केले कौतुक
पेडे-म्हापसा येथील खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्रातील प्रशिक्षणार्थी पूर्वी नाईक, आरोही बोर्डे व पूजा राऊळ या तिघाही पदकविजेत्या जलतरणपटूंचे क्रीडा व युवा व्यवहार संचालक अजय गावडे यांनी अभिनंदन करताना शाबासकी दिली.
नवी दिल्लीतील राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी गोवा क्रीडा प्राधिकरणाने संघ पाठविला होता. खेलो इंडिया केंद्राचे उच्च कामगिरी संचालक सुमीत, जलतरण मुख्य प्रशिक्षक सुजीत यांचेही क्रीडा संचालकांनी अभिनंदन केले आहे.
पदकविजेत्या खेळाडूंची कामगिरी राज्यासाठी अभिमानास्पद आहे. राज्यातील क्रीडा विकासासाठी कटिबद्ध असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व क्रीडामंत्री रमेश तवडकर यांचेही आभार. पदकविजेत्या खेळाडूंना सन्मानित केले जाईल, अशी माहितीही गावडे यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.