

पणजी: राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवार, १२ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. अधिवेशनाची सुरुवात पहिल्या दिवशी सकाळी ११.३० वाजता होईल. त्यात राज्यपालांचे भाषण होईल. एकूण पाच बैठका होतील. हे अधिवेशन १६ जानेवारीपर्यंत चालेल. राज्यपाल राजू यांचे विधानसभेतील हे पहिले भाषण असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष असेल.
या अधिवेशनासाठी आमदारांना २६ डिसेंबरपर्यंत प्रश्न सादर करावे लागतील. शिवाय शून्य प्रहर, लक्षवेधी सूचनांसाठी त्या-त्या कामकाजादिवशी सकाळी १० वाजेपर्यंत ऑनलाईन नोटीस द्यावी लागेल. खासगी कामकाजादिवशी प्रस्तावांवर चर्चेसाठी १ जानेवारीपर्यंत नोटीस द्यावी लागेल.
या अधिवेशनाला अद्याप एक महिन्याचा कालावधी असला तरी ‘बर्च बाय रोमियो लेन'' हे प्रकरण चर्चेत राहण्याची शक्यता आहे. कारण लुथरा बंधूंना गोव्यात आणल्यानंतर त्यांची चौकशी होईल.
शिवाय उच्च न्यायालयाने घेतलेली स्वेच्छा याचिका व त्यावरून सरकारला दिलेले आदेश, तसेच मानवाधिकार आयोगाने घेतलेली दखल या सर्व बाबींतून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात. या विषयावर खास चर्चेसाठी वेळही मागितली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिवेशनाचा सविस्तर कार्यक्रम सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित होईल.
हडफडे अग्निकांड कळीचा मुद्दा
हडफडेत ‘बर्च बाय रोमिओ लेन’ला लागलेल्या आगीत २५ जणांचा झालेला मृत्यू आणि हे रेस्टॉरन्ट बेकायदा सुरू असल्याचे उघड झाल्याने हे मुद्दे येत्या अधिवेशनात विरोधकांसाठी आयतेच मिळाले आहेत. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी हा विषय विरोधकांकडून उचलून धरला जाण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.