Mitchell Starc Record: क्रिकेट जगतातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'ॲशेस' (Ashes 2025) मालिकेचा थरार आता एका निर्णायक वळणावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा कसोटी सामना बुधवार, 17 डिसेंबरपासून अॅडलेड ओव्हलच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे.
मालिकेतील पहिले दोन्ही सामने धमाकेदार पद्धतीने जिंकल्यानंतर, यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ आता विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे, सलग दोन पराभवांमुळे बॅकफूटवर गेलेला इंग्लंडचा (England) संघ मालिकेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसेल. मात्र, या सामन्यात सर्वांच्या नजरा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर खिळल्या आहेत, जो सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे.
ॲशेस 2025 च्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये मिचेल स्टार्कने आपल्या वेगवान आणि स्विंग गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांची झोप उडवली. स्टार्कने आतापर्यंत केवळ दोन सामन्यांत 18 बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, या मालिकेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्टार्कच्या आसपासही कोणी नाही. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स याच्या खात्यात केवळ 9 बळी आहेत. यावरुन हे स्पष्ट होते की, स्टार्कने इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आहे. अॅडलेडची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पूरक मानली जाते, अशा परिस्थितीत स्टार्कचा सामना करणे इंग्लंडच्या फलंदाजांसाठी पुन्हा एकदा अग्निपरीक्षा ठरणार आहे.
अॅडलेडमधील तिसऱ्या कसोटीत 35 वर्षीय मिचेल स्टार्ककडे एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. ॲशेसच्या इतिहासात स्टार्कने आतापर्यंत एकूण 115 बळी घेतले आहेत. या सामन्यात त्याने केवळ 3 बळी मिळवल्यास तो ॲशेसमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या माँटी नोबल आणि इंग्लंडचा महान गोलंदाज जेम्स अँडरसन या दोघांनाही मागे सोडले. जेम्स अँडरसनने ॲशेसमध्ये 117 बळी घेतले आहेत. हा टप्पा गाठताच स्टार्क या ऐतिहासिक यादीत वरच्या स्थानावर झेप घेईल.
ॲशेसमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम दिवंगत महान फिरकीपटू शेन वॉर्नच्या नावावर आहे, ज्यांनी 195 बळी घेतले आहेत. त्यानंतर ग्लेन मॅकग्रा 157 बळींसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ज्या वेगाने स्टार्क सध्या विकेट्स घेत आहे, ते पाहता आगामी काळात मॅकग्रा यांचा विक्रमही धोक्यात येऊ शकतो. ॲशेसच्या इतिहासात आतापर्यंत केवळ तीनच गोलंदाजांना 150 पेक्षा जास्त बळी घेता आले आहेत.
मिचेल स्टार्क केवळ ॲशेसमध्येच नाही, तर संपूर्ण कसोटी क्रिकेटमध्येही आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरत आहे. त्याने आतापर्यंत 102 कसोटी सामन्यांच्या 196 डावांत 420 बळी घेतले आहेत. अॅडलेड कसोटीत केवळ 2 बळी घेताच तो दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज गोलंदाज शॉन पोलॉक (421 बळी) याला मागे टाकेल. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये स्टार्क सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियाने (Australia) आधीच मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. जर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने अॅडलेड कसोटी जिंकली, तर ते मालिका आपल्या खिशात घालतील. दुसरीकडे, बेन स्टोक्सचा 'बॅझबॉल' (Bazball) स्टार्कच्या 'वेगा'समोर गुडघे टेकणार की इंग्लंड जोरदार पुनरागमन करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मिचेल स्टार्कचा फॉर्म पाहता, तिसऱ्या कसोटीतही तो इंग्लंडसाठी सर्वात मोठे आव्हान असेल यात शंका नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.