

America Iran War Economy Impact: इस्रायलच्या साथीने अमेरिकेने इराणवर केलेल्या थेट हल्ल्यामुळे पश्चिम आशियात भीषण युद्धाला तोंड फुटले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या या संघर्षाचा सर्वाधिक आर्थिक फटका अमेरिकेला बसताना दिसत आहे. ताज्या रिपोर्टनुसार, इराणवरील हल्ल्याच्या केवळ पहिल्या 24 तासांत अमेरिकेने तब्बल 779 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 6900 कोटींचा चुराडा केला. 'सेंटर फॉर न्यू अमेरिकन सिक्युरिटी'च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेच्या एका 'कॅरियर स्ट्राईक ग्रुप'ला कार्यान्वित ठेवण्यासाठी दररोज 58 कोटी रुपयांचा खर्च येतो.
या हल्ल्यापूर्वी अमेरिकेने इराणला घेरण्यासाठी 'यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड' सारख्या जगातील सर्वात मोठ्या विमानवाहू युद्धनौकांसह दोन शक्तिशाली स्ट्राईक ग्रुप तैनात केले होते. केवळ या युद्धनौकांची तैनाती, विमानांची पुनर्रचना आणि प्रादेशिक लष्करी मालमत्ता एकत्रित करण्यासाठी अमेरिकेला 5556 कोटी रुपयांचा पूर्वतयारी खर्च करावा लागला.
नामांकित वित्तीय विश्लेषक केंट स्मेटर्स यांच्या मते, जर हे युद्ध दीर्घकाळ चालले तर अमेरिकेच्या तिजोरीतून तब्बल 210 अब्ज डॉलर्स म्हणजेच 18.87 लाख कोटी रुपये खर्च होऊ शकतात. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी युद्धाबाबत दिलेल्या संकेतांनुसार, हा खर्च अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आणणारा ठरु शकतो.
शनिवारी इस्रायल आणि अमेरिकेने (America) संयुक्तपणे केलेल्या या भीषण हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई मारले गेल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेत इस्रायलची राजधानी तेल अवीववर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला. एवढेच नव्हे तर, मध्यपूर्वेतील ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत, त्या तळांवरही इराणने क्षेपणास्त्र हल्ले सुरु केले. इराणमधील स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संघर्षात आतापर्यंत सुमारे 800 लोकांचा मृत्यू झाला असून हे युद्ध आता केवळ दोन देशांपुरते मर्यादित न राहता जागतिक स्तरावर आर्थिक आणि मानवी संकटाचे रुप धारण करताना दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.