ISL 2024-25 FC Goa Vs East Bengal
पणजी: एफसी गोवाने संघर्षपूर्ण लढतीत ब्रायसन फर्नांडिसच्या भेदक हेडरमुळे ईस्ट बंगालला १-० असे निसटते हरविले, मात्र विजयाचे पूर्ण तीन गुण महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळे त्यांना इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तीस गुणांसह दुसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती साधता आली.
सामन्याच्या १३व्या मिनिटास सेटपिसेसवर बोर्हा हेर्रेरा याच्याकडून मिळालेल्या क्रॉस पासवर ब्रायसनचे हेडिंग अचूक ठरले. २३ वर्षीय मध्यरक्षकाचा हा यंदा स्पर्धेतील सहावा गोल ठरला. त्यानंतर एफसी गोवाचे प्रयत्न हुकले.
इकेर ग्वॉर्रोचेना याचा ताकदवान फटका गोलपोस्टला आपटला, तर उत्तरार्धात समोर केवळ गोलरक्षक प्रभसुखनसिंग गिल असताना आर्मांदो सादिकू चेंडूवर नियंत्रण राखू शकला नाही. सामन्याच्या भरपाई वेळेत (९०+३) सादिकू याला थेट रेड कार्ड दाखविण्यात आले. त्यामुळे बाकी चार मिनिटे एफसी गोवास दहा खेळाडूंसह खेळावे लागले.
सामन्याच्या उत्तरार्धात ईस्ट बंगालने खूपच आक्रमक खेळ केला, त्यामुळे एफसी गोवा संघ बचावावर जास्त लक्ष केंद्रित करताना दिसला. ईस्ट बंगालचे पी. व्ही. विष्णू व नवा परदेशी खेळाडू रिचर्ड सेलिस यांनी आक्रमणावर भर देत एफसी गोवास उसंत मिळू दिली नाही.
गोलरक्षक ऋतिक तिवारी याच्या अफलातून दक्षतेमुळे, तसेच बचावफळीही भक्कम ठरल्यामुळे एफसी गोवाची निसटती आघाडी अबाधित राहिली. यजमान संघाचा बचावपटू संदेश झिंगन सामन्याचा मानकरी ठरला. एफसी गोवा संघाने आता स्पर्धेतील अपराजित मालिका ११ सामन्यांपर्यंत नेली आहे. मागील लागोपाठच्या दोन बरोबरीनंतर त्यांनी विजयाला गवसणी घातली.
एफसी गोवाचा हा १६ सामन्यांतील आठवा विजय ठरला. त्यामुळे त्यांचे ३० गुण झाले आहेत. पहिल्या क्रमांकावरील मोहन बागानचे ३६ गुण आहेत. एफसी गोवाचा पुढील सामना २५ जानेवारी रोजी फातोर्डा येथेच चेन्नईयीन एफसीविरुद्ध होईल.
स्पर्धेतील सलग तिसऱ्या, तर एकंदरीत दहाव्या पराभवामुळे ईस्ट बंगालचे १६ लढतीनंतर १४ गुण कायम राहिले. अकराव्या क्रमांकावरील संघासाठी आता प्ले-ऑफ फेरीसाठी बाकी सामने महत्त्वाचे असतील.
आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचे ईस्ट बंगालविरुद्ध सलग ६ विजय
एफसी गोवा ओळीने ११ सामने अपराजित, ७ विजय व ४ बरोबरी
फातोर्डा येथे यंदा ८ सामन्यांत एफसी गोवाचे ४ विजय, २ बरोबरी, २ पराभव
आयएसएलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळलेल्या १० सामन्यांत एफसी गोवाचे ७ विजय, तर ईस्ट बंगालचा १ विजय, २ लढती बरोबरीत
ब्रायसन फर्नांडिसचे यंदा ६, तर एफसी गोवातर्फे एकूण १० गोल
एफसी गोवातर्फे यावेळच्या स्पर्धेत ४ क्लीन शीट्स
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.