पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अगोदरचे दोन्ही सामने गोव्याला कमजोर फलंदाजीमुळे गमवावे लागले, या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर संघ सोमवारपासून (ता. २६) जामठा-नागपूर येथे विदर्भाविरुद्ध चारदिवसीय लढत खेळले. दोन्ही संघ एलिट क गटातील चौथ्या लढतीसाठी मैदानात उतरतील.
विदर्भाचा संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यांनी दोन्ही सामने जिंकून १२ गुणांची कमाई केली आहे. पुदुचेरीला १६० धावांनी नमविल्यानंतर त्यांनी गतविजेत्या जम्मू-काश्मीरवर तीन विकेट्स राखून मात केली. घरच्या मैदानावर गोव्याला पराभूत केल्यास त्यांची स्थिती आणखीनच भक्कम होईल. दुसरीकडे गोव्याकडे प्रतिस्पर्धी संघ दोन वेळा बाद करणारे गोलंदाजी असली, तरी फलंदाजीत चार डावांत त्यांना अजूनपर्यंत दोनशे धावांचा टप्पा गाठता आलेला नाही अन् ही बाब प्रशिक्षक दिनेश मोंगिया यांच्यासाठी डोकेदुखी ठरलेली आहे.
मागील लढतील उत्तर प्रदेशविरुद्ध गोव्याला ६८ धावांनी पराभव करावा लागला होता. त्या लढतील गोव्याने उत्तर प्रदेशला दोन वेळा बाद केले, पण फलंदाज दुसऱ्या डावात २३६ धावांच्या आव्हानासमोर प्रतिस्पर्धी फिरकी माऱ्यासमोर साफ गडबडले. त्या लढतीत गोव्याचा युवा ऑफस्पिनर यश कसवणकर याने दोन्ही डावांत मिळून दहा गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. फलंदाजी बळकट करायची असल्यास गोव्याला विदर्भाविरुद्ध एक जादा फलंदाज खेळवावा लागेल, तसे झाल्यास मंथन खुटकर संघात येऊ शकतो आणि एक गोलंदाज कमी होईल.
स्पर्धेतील पहिल्या लढतीत गोव्यावर बडोद्याने डाव व १३५ धावांनी विजय मिळविला होता. गतमोसमापासून गोव्याने रणजी करंडक स्पर्धेत ओळीने सहा सामने गमावले आहेत. ही मालिका खंडित करण्याचा दबावही अभिनव तेजराणा याच्या नेतृत्वाखालील गोव्याच्या संघावर असेल. रणजी करंडक स्पर्धेत यापूर्वीच्या लढतीत विदर्भाने गोव्यावर वर्चस्व राखले आहे. सहापैकी चार लढतीत विदर्भाने विजय नोंदविला आहे. नऊ वर्षांपूर्वी पर्वरी येथे विदर्भाने गोव्याचा डाव व ३७ धावांनी धुव्वा उडविला होता.
गोवा विरुद्ध विदर्भ रणजी लढतींवर दृष्टिक्षेप
२००२-०३ (नागपूर) : विदर्भ २०३ धावांनी विजयी
२००४-०५ (मडगाव) : गोवा १६५ धावांनी विजयी
२००५-०६ (नागपूर) : विदर्भाचा ८ गडी राखून विजय
२००६-०७ (मडगाव) : विदर्भ १० गडी राखून विजयी
२००९-१० (नागपूर) : अनिर्णित, गोव्यास १३६ धावांची आघाडी
२०१७-१८ (पर्वरी) : विदर्भ डाव व ३७ धावांनी विजयी
एकूण लढती : ६, विदर्भ विजयी ४, गोवा विजयी १, अनिर्णित १
- संकलन : किशोर पेटकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.