Goa Politics: 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना'; मगो-भाजप युतीत फोंडा-शिरोड्याचा पेच!

BJP MGP Alliance Goa: फोंड्यातून आपण निवडणूक लढवणार असे ‘मगो’चे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांनी जाहीरच करून टाकले आहे.
BJP MGP Alliance Goa
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मिलिंद म्हाडगुत

फोंड्यातून आपण निवडणूक लढवणार असे ‘मगो’चे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांनी जाहीरच करून टाकले आहे. तर दामू नाईकांनी फोंडा व शिरोडा हे मतदार संघ ‘मगो’ला देणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे पेच उद्‍भवला आहे.

आगामी निवडणुकीत मगो- भाजप युती होणार का? यावर सध्या राजकीय विश्लेषकांकडून विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर या दोघांनीही येत्या निवडणुकीत ही युती होणारच, असे छातीठोकपणे सांगितले असले तरीही अनेकांच्या मनात शंकेची पाल चूकचुकताना दिसत आहे. आणि त्याला कारणेही तशीच आहेत. सध्या ‘मगो’कडे मडकई व मांद्रे हे दोनच मतदारसंघ आहेत. आता युती व्हायची असेल तर ‘मगो’ला कमीत कमी चार ते पाच मतदारसंघ तरी द्यावे लागणार आहेत. कळीचा मुद्दा आहे तो हाच.

BJP MGP Alliance Goa
Goa Politics: आरजीतील अंतर्गत वाद पुन्हा चिघळला! 'पक्षाला हानी पोहोचवल्यास कारवाई', वीरेश बोरकरांचा खोलकरांना इशारा

याचा अर्थ भाजपला आपल्या दोन ते तीन मतदारसंघावर जिथे ‘मगो’ची पण ताकद आहे पाणी सोडावे लागणार आहे. संघर्ष होणार आहे, तो याच बाबीवरून आणि सध्या ज्या मतदारसंघावर ‘मगो’ची नजर आहे ते भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत,त्यामुळे भाजपची अवस्था ‘टू बी आॅर नॉट टू बी’ होत असल्याचे दिसते आहे. त्या दृष्टीने फोंडा व शिरोडा हे दोन मतदारसंघ जास्त महत्त्वाचे ठरतात. सध्या फोंड्याला आमदार नसला तरी २०२२ साली हा मतदारसंघ दिवंगत रवी नाईक यांनी भाजपच्या उमेदवारीवर जिंकला होता, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. यामुळे या मतदारसंघावर भाजपचा हक्क ठरतो, हेही सत्य आहे.

पण ‘मगो’च्या दाव्याप्रमाणे फोंड्यात ‘मगो’ जास्त प्रभावी असून गेल्यावेळी केवळ रवी नाईकांमुळे हा मतदारसंघ भाजप जिंकू शकला होता. वस्तुस्थिती पाहता गतवेळी भाजपचे रवी नाईक हे फक्त ७७ मतांनी विजयी झाले होते, हे खरे आहे. आता नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे फोंडा मतदारसंघात ‘मगो’ आघाडीवर आहे असा जो दावा ‘मगो’ पक्ष करतो त्यात किती तथ्य आहे, हे सांगणे कठीण असले तरी गेल्यावेळी ‘मगो’चे दिवंगत नेते डॉ. केतन भाटीकर हे दुसऱ्या क्रमांकावर होते, हे खरे आहे. पण रवी नसले तरी भाजपकडे फोंड्यात इच्छुक उमेदवारांची कमतरता नाही. शिरोडा मतदारसंघातली परिस्थितीही जवळजवळ अशीच आहे.

तिथे सध्या जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर हे प्रतिनिधित्व करत असून त्यांना डावलणे भाजपला परवडेल, असे बिलकुल वाटत नाही. असे असूनही ‘मगो’ने या मतदारसंघावर दावा करणे म्हणजे भाजपला आव्हान देण्यासारखेच वाटते. विशेष म्हणजे फोंडा व शिरोडा मतदारसंघात ‘मगो’ने कार्य सुरू केल्याचे दिसून येत असल्यामुळे शंकांना अधिकच वाव मिळू लागला आहे. आता पक्ष वाढवण्याकरता कार्यरत असणे महत्त्वाचे असे जरी दीपक ढवळीकर म्हणत असले तरी हे कार्य निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केले जात असल्याचे अनेक उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. फोंड्यातून आपण निवडणूक लढवणार असल्याचे मगो पक्षाचे सर्वेसर्वा वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी तर जाहीरच करून टाकले आहे.

BJP MGP Alliance Goa
FC Goa: एफसी गोव्याचा झुंजार खेळ, पण आव्हान संपले! अल कादसाकडून 1-2 ने पराभव

तर दामू नाईकांनी फोंडा व शिरोडा हे मतदार संघ ‘मगो’ला देणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे हा पेच कसा सुटणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. युतीचा अंतिम निर्णय केंद्रात घेतला जाईल, असे सांगून पत्ते ‘हाय कमांड’च्या रिंगणात फेकले असले तरी जागांचे विभाजन कसे केले जाईल याचे काही आकलन होत नाही. हे सांगत असताना युतीचा निर्णय ३१ ऑक्टोबरला होणारी ‘मगो’ची सर्वसाधारण सभा घेईल, असेही सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे. आता या दोन म्हणण्यामधला विरोधाभास स्पष्टपणे अधोरेखित होतो. फोंडा व शिरोड्याबरोबरच मगोची सध्या प्रियोळ मतदारसंघावरही नजर लागून राहिली आहे. तिथे या पक्षाचे सुनील जल्मी (भोमकर) जे विद्यमान झेडपी आहेत ते भलतेच सक्रिय झालेले बघायला मिळत आहे. फोंडा तालुक्यातील या मतदारसंघाबरोबर इतर काही मतदारसंघही सध्या ‘मगो’च्या रडारवर असलेले दिसत आहेत.

पण युतीची अधिकत्तम भिस्त असणार ती फोंडा व शिरोडा मतदारसंघावरच. याबाबतीत भाजप तडजोड करणार की, मगो अधिक आक्रमक होणार, यातून आणखी काही ‘पर्याय’ निघू शकतो का?, असे अनेक सवाल सध्या निर्माण होऊ लागले आहेत. यात एक लक्षात ठेवायला हवे ते म्हणजे १९९९ ते २०२२ पर्यंत २०१२चा अपवाद वगळता या दोन पक्षांची निवडणूक पूर्व युती कधीच झालेली नाही, असे असूनही ‘मगो’ २००२, २०१७ व २०२२ साली भाजप सरकारात होता. या वृत्तीलाच ‘तुझे माझे जमेना तुझ्या वाचून करमेना’, असे म्हटले जाते. आणि सध्याची स्थिती पाहता त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक वाटत आहे. आता प्रत्यक्षात काय होते, याचे उत्तर मिळायला मात्र काही दिवस जावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com