रणजी करंडक प्लेट डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत गोव्याने शानदार कामगिरी केली. गोव्याच्या आक्रमक फलंदाजीसह गोलांदाजीही कमालीची झाली. गोव्याच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा आपला जलवा दाखवून दिला. आक्रमक सुरुवात करत मिझोरामच्या गोलंदाजांना बॅकफूटवर आणले. गोव्याकडून स्नेहल कवठणकर याने 'द्विशतकी' दणका दिला.
स्नेहलच्या आक्रमक खेळीने मिझोरामच्या संघाचे धाबे दणाणले. गोव्याने मिझोरामचा एक डाव आणि 169 धावांनी पराभव केला. गोव्याचा हा सलग चौथा विजय आहे. फॉलोऑन लागू केल्यानंतर मिझोरामचा दुसरा डाव 182 धावांवर संपला.
दरम्यान, गोव्याचे फलंदाज जेवढ्या ताकदीने लढले तेवढ्याच ताकदीने गोलंदाजही लढले. गोव्याकडून गोलंदाजी करताना मोहित रेडकरने पंजा खोलला. मिझोरामसाठी मोहित काळ बनून आला.
दरम्यान, स्नेहल कवठणकरने कारकिर्दीतील दुसरे द्विशतक नोंदवताना रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अडीचशे धावा करणारा तिसरा गोमंतकीय फलंदाज बनण्याचा मान मिळवला. त्या आधारे प्लेट विभाग क्रिकेट सामन्यात त्याच्या संघाने दुबळ्या मिझोरामविरुद्ध (Mizoram) 9 बाद 555 धावांचा डोंगर रचला.
गोव्याविरुद्धच्या (Goa) लढतीपूर्वी तीन सामन्यांतील पाच डावांत 161.50च्या सरासरीने 646 धावा केलेल्या अग्नी चोप्रा याला एका धावेवर पायचीत करुन मोहित रेडकरने मिझोरामला धक्का दिला. फक्त सात धावांत चार विकेट गमावल्यामुळे मिझोरामचा डाव 4 बाद 35 असा गडगडला होता. नंतर जेहू अँडरसन (नाबाद 45) याने मोहित जांग्रा (25) व विकास कुमार (19) यांच्यासमवेत खिंड लढवल्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवसअखेर गुरुवारी सव्वाशे धावांच्या जवळ पोहचता आले.
सामन्याच्या पहिल्या दिवसाअखेर स्नेहल 135 धावांवर खेळत होता, गुरुवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही 29 वर्षीय क्रिकेटपटूची फलंदाजी बहरली. आत्मविश्वासाने खेळत द्विशतकी धावसंख्या उभारताना त्याने प्रेक्षणीय 250 धावा केल्या. त्याने 342 चेंडूंतील खेळीत 25 चौकार मारले.
सकाळच्या सत्रात दीपराज गावकर (55) लगेच बाद झाल्यामुळे चौथ्या विकेटची भागीदारी 133 धावांत संपली. नंतर स्नेहलने कर्णधार दर्शन मिसाळ (25) याच्यासमवेत 53 धावांची, समर दुभाषी (17) याच्यासह 50 धावांची, तर राहुल मेहता (48) याच्यासह 76 धावांची भागीदारी करून संघाला साडेपाचशे धावांपर्यंत नेले. स्नेहलचे कारकिर्दीतील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदवताना 54 व्या लढतीत आठव्यांदा शतकी खेळी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.