पणजी: सेनादलाकडून खेळणारा अष्टपैलू पुलकित नारंग यांच्या लाजबाव गोलंदाजीच्या बळावर पणजी जिमखान्याने रविवारी चौगुले स्पोर्टस क्लबला १०२ धावांनी नमवून गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी निश्चित केली. तीस वर्षीय गोलंदाजाने दोन्ही डावांत मिळून १४ गडी बाद केले.
तीन दिवसीय सामना पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झाला. पणजी जिमखान्याने चौगुले क्लबला २०१ धावांचे आव्हान दिले होते. पहिल्या डावात ३३ धावांत ७ गडी बाद केलेल्या पुलकित याने दुसऱ्या डावात १९ धावांत ७ विकेट टिपून चौगुले क्लबचा डाव ९९ धावांत गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला. चार सामन्यांतील तिसऱ्या विजयामुळे पणजी जिमखान्याचे १९ गुण झाले असून त्यांचे पहिल्या दोन संघांत स्थान कायम राहणार हे निश्चित आहे. पराभवामुळे चौगुले क्लबला धक्का बसला. १५ गुणांसह ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
सांगे येथील जीसीए मैदानावर एमसीसी संघाने फॉलोऑन लादल्यानंतर साळगावकर क्रिकेट क्लबने २८६ धावांच्या पिछाडीनंतर दुसऱ्या डावात ६ बाद २५४ धावा करून सामना अनिर्णित राखण्यात यश मिळविले. कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर धेंपो क्रिकेट क्लबने दुसरा डाव ५ बाद १२१ धावांवर घोषित करून २४२ धावांचे आव्हान दिल्यानंतर जीनो क्लबने ५ बाद १२६ धावा करून सामना अनिर्णित राखला.
पणजी जिमखाना, पहिला डाव ः सर्वबाद १८१ व दुसरा डाव ः सर्वबाद १६४ वि. वि. चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः १४४ व दुसरा डावः ३५.४ षटकांत सर्वबाद ९९ (क्षिजित पटेल ३१, मनन हिंग्राजिया ३४, पुलकित नारंग १७-७-१९-७).
एमसीसी, पहिला डाव ः सर्वबाद ४५१ अनिर्णित वि. साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव ः सर्वबाद १६५, फॉलोऑननंतर दुसरा डाव ः ८१ षटकांत ६ बाद २५४ (स्नेहल कवठणकर ५९, नितीन तन्वर नाबाद ७८).
धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव ः सर्वबाद ४०६ व दुसरा डाव ः १७ षटकांत ५ बाद १२१ घोषित (प्रशांत चोप्रा नाबाद ७२) अनिर्णित वि. जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः सर्वबाद २८६ व दुसरा डाव ः ३९ षटकांत ५ बाद १२६ (सिद्धेश वीर २४, दीपराज गावकर नाबाद २४, मोहित रेडकर ३-४०).
प्रत्येकी चार सामने जिंकल्यानंतर १९ गुणांसह पणजी जिमखाना अग्रस्थानी आहे. अंतिम फेरीतील दुसऱ्या जागेसाठी चौगुले क्लब (१५ गुण), धेंपो क्लब (१० गुण) व एमसीसी (९ गुण) यांना संधी आहे. जीनो क्लब (८ गुण) व साळगावकर क्रिकेट आगेकूच राखणे अशक्य आहे. शेवटच्या पाचव्या फेरीत साळगावकर क्लब विरुद्ध जीनो क्लब, चौगुले क्लब विरुद्ध एमसीसी, धेंपो क्लब विरुद्ध पणजी जिमखाना अशा लढती होतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.