
पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील आव्हान कायम राखताना तिसऱ्या फेरीत जीनो स्पोर्टस क्लब व साळगावकर क्रिकेट क्लबने शानदार विजयांची नोंद केली.
पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर जीनो क्लबने एमसीसी संघावर डाव व ३७ धावांनी विजय नोंदवून बोनस गुणाची कमाई केली. फॉलोऑननंतर फलंदाजी करणाऱ्या एममसीसी संघाचा दुसरा डाव शुभम देसाई (५-४६) व गगन (३-४५) यांनी ११४ धावांत गुंडाळला. जीनो क्लबच्या पहिल्या डावातील ४१७ धावांना उत्तर देताना एमसीसी संघाचा पहिला डाव २६६ धावांत संपुष्टात आला.
चिखली-वास्को येथील मैदानावर साळगावकर क्लबने पणजी जिमखान्याला ११० धावांनी हरविले. साळगावकरने पहिल्या डावात २२८ धावा केल्यानंतर पणजी जिमखान्याने १७३ धावांचे उत्तर दिले होते. पुलकित नारंग (६-३२) व हिमांशू नेहरा (४-२८) या पणजी जिमखान्याच्या गोलंदाजांनी साळगावकर क्लबचा दुसरा डाव ९९ धावांत गुंडाळला. मात्र नितीन तन्वर (७-३४) व विनय चौधरी (३-११) यांच्या भन्नाट माऱ्यासमोर पणजी जिमखान्याचा दुसरा डाव अवघ्या ४५ धावांत गारद झाल्यामुळे साळगावकर संघाला शतकी फरकाने सामना जिंकता आला.
सांगे येथील जीसीए मैदानावर अनिर्णित लढतीत चौगुले स्पोर्टस क्लबने पहिल्या डावातील ६४ धावांच्या आघाडीमुळे धेंपो क्रिकेट क्लबविरुद्ध तीन गुणांची कमाई केली. चौगुले क्लबने ३७१ धावा केल्यानंतर धेंपो क्लबचा पहिला डाव ३०७ धावांत आटोपला. त्यांच्या लक्षय गर्ग (९२) व समर दुभाषी (७३) यांनी सातव्या विकेटसाठी केलेली १२७ धावांची झुंझार भागीदारी विफल ठरली. चौगुले क्लबचे समर्थ राणे (४-७५) व दर्शन मिसाळ (३-१०१) यांनी गडी बाद केले. औपचारिक ठरलेल्या दुसऱ्या डावात चौगुले क्लबने बिनबाद ३३ धावा केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.