पणजी: ऑफस्पिनर महेश पिठिया (५-५८) व अनुभवी डावखुरा भार्गव भट (४-५१) यांच्या फिरकीने गोव्याच्या फलंदाजांना मंगळवारी नाचविले. यजमान संघातील फलंदाज दर्जेदार फिरकीला तोंड देऊ शकले नाहीत. परिणामी, रणजी करंडक एलिट ‘अ’ गट क्रिकेट सामन्यात बडोदा संघाने पहिल्या डावातील २७३ धावांच्या मोठ्या आघाडीसह फॉलोऑन लादला.
पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर गोव्याने सलग दुसऱ्या डावात अपयशी ठरलेल्या सुयश प्रभुदेसाई (२) याला गमावून १ बाद ३५ धावा केल्या होत्या. ते अजून २३८ धावांनी मागे असून सामन्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी यजमान संघावर पराभवाची गहरी छाया असेल. बडोद्याच्या पहिल्या डावातील ८ बाद ४७२ या घोषित धावसंख्येला उत्तर देताना गोव्याचा पहिला डाव कालच्या १ बाद ५ धावांवरून मंगळवारी चहापानानंतर १९९ धावांत आटोपला.
अनुभवी स्नेहल कवठणकर (५० धावा, ८६ चेंडू, ५ चौकार) व ललित यादव (५४ धावा, ९५ चेंडू, ५ चौकार, २ षटकार) यांची अर्धशतके आणि त्यांनी पाचव्या विकेटसाठी केलेली ८१ धावांची भागीदारी वगळता गोव्यासाठी सामन्याचा तिसरा दिवस निराशाजनकच ठरला. भार्गव भटच्या गोलंदाजीवर स्नेहलला यष्टिरक्षक मितेश पटेल याने यष्टिचीत बाद केल्यानंतर गोव्याची दाणादाण उडाली. ५ बाद १४७ वरून डाव १९९ धावांत संपला. चेंडूला वेग आणि फिरक देणारे पिठियाचे चेंडू खेळणे गोव्याच्या फलंदाजांना जड गेले. याच खेळपट्टीवर गोव्याचे फिरकी गोलंदाज निष्प्रभ ठरले होते, तेथेच २४ वर्षीय पिठिया व ३६ वर्षीय भार्गव या फिरकी गोलंदाजांनी एकत्रितपणे नऊ गडी बाद केले.
गाठले बळींचे शतक
गोव्याच्या दुसऱ्या डावात सुयश प्रभुदेसाई याला त्रिफळाचीत बाद करून २४ वर्षीय महेश पिठिया याने २५व्या प्रथम श्रेणी सामन्यात १०० गडी बाद करण्याचा पराक्रम साधला. त्याने मंगळवारी गोव्याविरुद्ध प्रथमच, तर कारकिर्दीत आठव्यांदा डावात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम साधला. गुजरातमधील जुनागढ येथील महेशने डिसेंबर २०२२ मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले होते.
संक्षिप्त धावफलक
बडोदा, पहिला डाव : ८ बाद ४७२ घोषित
गोवा, पहिला डाव (१ बाद ५ वरून) : ७१.१ षटकांत सर्वबाद १९९ (शिवेंद्र भुजबळ १२, दर्शन मिसाळ १६, अभिनव तेजराणा १३, स्नेहल कवठणकर ५०, ललित यादव ५४, दीपराज गावकर १८, मोहित रेडकर ४, ऋत्विक नाईक १२, वासुकी कौशिक नाबाद ४, शुभम तारी ०, महेश पिठिया २८-४-५८-५, भार्गव भट १९.१-३-५१-४, रसिक दार १०-२-२८-१).
गोवा, दुसरा डाव (फॉलोऑन) : १३ षटकांत १ बाद ३५ (सुयश प्रभुदेसाई २, शिवेंद्र भुजबळ नाबाद १३, अभिनव तेजराणा नाबाद १४, महेश पिठिया ३.४-१-१०-१).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.