Alex Hartley On Menstrual Cycle: इंग्लंडची माजी फिरकी गोलंदाज आणि सध्याची प्रसिद्ध समालोचक एलेक्स हार्टली हिने क्रीडा विश्वातील एका अत्यंत संवेदनशील पण महत्त्वाच्या विषयावर भाष्य करुन जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. मासिक पाळीबद्दल समाजात असलेला संकोच आणि खेळाडूंच्या मनात असलेली भीती दूर करण्यासाठी तिने अत्यंत परखड मते मांडली. महिला खेळाडूंनी आपल्या मासिक पाळीबद्दल मोकळेपणाने बोलण्यास घाबरु नये, असे आवाहन हार्टलीने केले. या विषयाला 'टॅबू' न मानता ते सामान्य मानण्याची गरज असल्याचे तिने अधोरेखित केले.
अलीकडेच रंगलेल्या महिला अॅशेस मालिकेत 'बीबीसी टेस्ट मॅच स्पेशल' मध्ये समालोचन करताना हार्टलीने आपल्या मासिक पाळीचा उल्लेख केला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान तिने रेडिओवर बोलताना सांगितले की, मासिक पाळी सुरु झाल्यामुळे आपल्याला 'चिडचिडे' वाटत आहे. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर (Social media) संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही लोकांनी तिच्यावर टीका केली, तर काहींनी तिचे कौतुक केले.
यावर बोलताना हार्टली म्हणाली की, जरी काही नकारात्मक कमेंट्स मिळाल्या असल्या, तरी बहुतांश प्रतिक्रिया सकारात्मक होत्या. हजारो महिला आणि मुलींनी मेसेज करुन या विषयावर जाहीरपणे बोलल्याबद्दल तिचे आभार मानले, कारण यामुळे एका नैसर्गिक प्रक्रियेला सामान्य बनवण्यास मदत झाली.
'नो बॉल्स' या आपल्या पॉडकास्टमध्ये हार्टलीने या मुद्द्यावर अधिक सविस्तर चर्चा केली. ती सांगते की, मासिक पाळी हा जीवनाचा एक अविभाज्य आणि नैसर्गिक भाग आहे, त्यामुळे सार्वजनिक व्यासपीठांवर, विशेषतः क्रीडा प्रसारणादरम्यान त्यावर चर्चा व्हायलाच हवी. अशा संभाषणांमुळे खेळ बघणाऱ्या लहान मुलींच्या मनात हा विश्वास निर्माण होईल की, मासिक पाळीबद्दल लाज वाटण्यासारखे काहीही नाही.
तिने एका भारतीय चाहत्याच्या मेसेजचा उल्लेख केला, ज्यामध्ये त्या मुलीला मासिक पाळीमुळे मुलांसोबत क्रिकेट खेळण्यापासून रोखण्यात आले होते. तसेच, ब्रिटीश मोहिमेच्या आकडेवारीचा संदर्भ देत तिने सांगितले की, तब्बल 64 टक्के शाळकरी मुली मासिक पाळीच्या वेदना आणि लाज वाटण्याच्या भीतीमुळे क्रिकेट खेळणे सोडून देतात. हे क्रीडा क्षेत्रासाठी मोठे नुकसान आहे.
क्रिकेटमध्ये महिला खेळाडूंसाठी ही अडचण अधिक वाढते कारण कसोटी सामन्यांमध्ये पांढरे कपडे परिधान करावे लागतात. हार्टलीने स्वतःच्या 13व्या वर्षातील क्लब मॅचचा अनुभव सांगताना म्हटले की, पांढऱ्या कपड्यांमुळे मासिक पाळीदरम्यान खेळताना मनावर प्रचंड ताण असतो. इंग्लंडची वेगवान गोलंदाज केट क्रॉस हिनेही यावर सहमती दर्शवली.
तिने सांगितले की, कसोटी सामन्यांचा आठवडा खेळाडूंसाठी मानसिक तणावाचा असू शकतो. अनेक खेळाडू अशा वेळी होणारी लाज टाळण्यासाठी मासिक पाळी लांबवण्याची औषधे घेतात, जे आरोग्यासाठी हितकारक नाही. या सर्व समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे खेळातील ही 'कलंक' मानली जाणारी वागणूक बदलणे आणि संवाद वाढवणे.
एलेक्स हार्टली हिची क्रिकेट कारकीर्द यशस्वी राहिली आहे. तिने इंग्लंडसाठी 28 एकदिवसीय आणि 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण म्हणजे 23 जुलै 2017 रोजी झालेला विश्वचषक फायनल होता. या सामन्यात इंग्लंडने (England) भारतीय संघाचा 9 धावांनी पराभव करुन आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. आता खेळाचा निरोप घेतल्यानंतर हार्टली समालोचनाच्या माध्यमातून महिला खेळाडूंच्या हक्कासाठी आणि त्यांच्या सुखसोयींसाठी आवाज उठवत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.