Zoho Indian software Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Opinion: मायक्रोसॉफ्ट नाही, 'झोहो शो'! केंद्रीय मंत्र्यांनी दिला स्वदेशी सॉफ्टवेअरला 'प्राइम टाइम' बूस्ट

Zoho Indian software: मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव २४ सप्टेंबर रोजी उभे राहिले.

गोमंतक ऑनलाईन टीम

मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव २४ सप्टेंबर रोजी उभे राहिले. मात्र, आपले प्रेझेंटेशन सुरू करण्याआधीच त्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली, ‘स्वदेशीचा अंगीकार करण्याच्या प्रेरणेने, मी आज जे प्रेझेंटेशन करतोय ते मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटवर नव्हे, तर भारतीय कंपनी झोहो कॉर्पोरेशनने तयार केलेल्या ‘झोहो शो’ या स्वदेशी सॉफ्टवेअरवर तयार केले आहे.’ त्याआधी दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर जाहीर केले होते की, ते आता झोहो सूट या पूर्णपणे स्वदेशी प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. त्याचबरोबर, भारतीय नागरिकांनी स्थानिक उत्पादने व सेवा स्वीकारावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

२४ सप्टेंबर रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या सोशल मीडियावरून भारतीयांना एक वेगळं आवाहन केलं. त्यांनी मित्रपरिवाराशी संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपऐवजी झोहोने विकसित केलेल्या ‘अरट्टाई’ (Arattai) या मेड-इन-इंडिया इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपचा वापर करा, असं सांगितलं. या आवाहनानंतर अल्पावधीतच अरट्टाई अ‍ॅपचे इतके मोठ्या प्रमाणावर डाउनलोड झाले की काही तास झोहोचे सर्व्हर जॅम झाले. वाढलेल्या वापरकर्त्यांना सांभाळण्यासाठी कंपनीला आपल्या पायाभूत सुविधांत तातडीने वाढ करावी लागली.

अमेरिका भारतावर सलगपणे लादत असलेल्या टॅरिफ आणि निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर, विविध क्षेत्रांत स्वदेशी पर्याय शोधण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांत हल्ली सरकारी पातळीवर परत परत झोहोचा उल्लेख होत आहे. यामुळे हे नाव हल्ली सर्वाधिक चर्चेत आले आहे.

अश्विनी वैष्णव यांनी उल्लेख केलेला ‘झोहो सूट’ हा सर्वसामान्य वापरात असलेल्या मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा गूगलच्या ऑनलाइन ऑफिस सूटइतकाच वापरण्यास सोपा-सुटसुटीत आणि तितकाच प्रभावी आहे. या झोहो वर्कप्लेस बंडलमध्ये अनेक साधने उपलब्ध आहेत. ‘झोहो रायटर’ हे मायक्रोसॉफ्ट वर्डप्रमाणे सर्व सुविधा देणारे वर्ड प्रोसेसिंग टूल आहे. ‘झोहो शीट’ हे स्प्रेडशीट तयार करण्यासाठी आणि डेटा विश्लेषणासाठी उपयुक्त असून मायक्रोसॉफ्ट एक्सेल किंवा गूगल शीट्सच्या तोडीस तोड आहे.

तर ‘झोहो शो’ हे आकर्षक प्रेझेंटेशन्स तयार करण्यासाठी विविध पर्याय व सुविधा उपलब्ध करून देते. विशेष म्हणजे, झोहो ऑफिस सूट वापरून तयार केलेल्या फाइल्स इतर कुठल्याही ऑफिस सूटमध्ये सहज वापरता येतील अशा स्वरूपात सेव्ह करता येतात. अलीकडेच झोहोने ‘उला’ नावाचा गोपनीयतेवर आधारित वेब ब्राउझर विकसित केला असून तो गूगल क्रोम, सफारी आणि मायक्रोसॉफ्ट एज (पूर्वीचा मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर) यांच्याइतका सक्षम मानला जात आहे.

धर्मेंद्र प्रधानांनी उल्लेख केलेलं ‘अरट्टाई’ एक इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. खरे तर अरट्टाई हा तमिळ शब्द असून याचा अर्थ संभाषण, गप्पा किंवा अगदी चहाड्या असाही होतो! कुतूहलाने मी हा अरट्टाई अ‍ॅप डाउनलोड केला, आणि आश्चर्य म्हणजे माझ्या फोनवरील ५३ संपर्क आधीच या अ‍ॅपवर होते. व्हॉट्सअपच्या चॅटपासून चॅनेलपर्यंतच्या सर्व सुविधांबरोबरच पॉकेट आणि शेड्यूलसारख्या अतिरिक्त सुविधाही या अ‍ॅपवर आहेत. वापरण्यास अतिशय सोपा आणि पूर्णपणे मोफत असलेल्या या अ‍ॅपचे डाउनलोड गेल्या काही दिवसांत दरदिवशी ३००वरून दरदिवशी लाखांवर डाउनलोडपर्यंत पोहोचलेय! या आकड्यांवरूनच त्याच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.

गेला आठवडाभर या झोहोची चर्चा देशभर, खास करून सोशल मीडियावर चालली आहे. या साऱ्या बोलबाल्यामुळे अचानक प्रसिद्धीच्या झोतात येऊन सर्वतोमुखी नाव झालेली झोहो कॉर्पोरेशन ही भारतीय कंपनी खरे तर गेली दोन दशके सातत्याने सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात कार्यरत आहे. आजघडीस ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक म्हणून गणली जातेय. १९९६मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे ५५हून अधिक क्लाउड बिझनेस अ‍ॅप्स जगभरातील १३० कोटींहून अधिक लोक वापरत आहेत.

मायक्रोसॉफ्ट आणि गूगल या सॉफ्टवेअर क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांशी झोहो भारतातच नव्हे तर जगभरात थेट स्पर्धा करत आहेत. लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या उद्योग व्यवसायांना वेगवेगळ्या सेवा देणारी सॉफ्टवेअर एज एसर्विस (SaaS) उत्पादने ही झोहोची खासियत.

ग्राहक व्यवस्थापनासाठीच संपूर्ण प्लॅटफॉर्म -झोहो सीआरएम, प्रकल्प व्यवस्थापन आणि टीम समन्वयासाठी उपयुक्त -झोहो प्रोजेक्ट, अकाउंटिंग आणि वित्तीय व्यवस्थापनासाठी -झोहो बुक्स, गोदाम आणि मालाची नोंद ठेवण्यासाठी - झोहो इन्व्हेंटरी, कर्मचारी व्यवस्थापनासाठी-झोहो पीपल, ई-कॉमर्स वेबसाइट तयार करण्यासाठी -झोहो कॉमर्स आदी झोहोची विविध उत्पादने जगभरच्या व्यवसायांना आणि व्यावसायिकांना आधुनिक आणि सर्वसमावेशक तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहेत आणि तेही अतिशय माफक किमतीत.

‘झोहो वर्कप्लेस’ हे गुगल तसंच ‘मायक्रोसॉफ्ट ३६५’च्या वर्कप्लेस एप्लिकेशन साठीही थेट पर्याय आहे. बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने झोहो सतत भारतात आणि परदेशात आपला उत्पादन पोर्टफोलिओ वाढवत आहे. २०२५मध्ये त्यांनी झिया एआय ही स्वतःची मोठी भाषा मॉडेल प्रणालीही (LLM) त्यांनी बाजारात आणलीय, ज्यात २५ पेक्षा जास्त एआय एजंट्स बिझनेस कामकाजासाठी तयार केले गेले आहेत. या साऱ्यामुळे आजघडीस झोहो भारताच्या आत्मनिर्भर तंत्रज्ञान चळवळीचे एक प्रभावी प्रतीक बनले आहे.

झोहोच्या या जगव्यापी साम्राज्याचे सर्वेसर्वा आहेत पद्मश्री श्रीधर वेंबू. त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे आणि ऑफिस मध्ये चप्पल न घालता अनवाणी वावरण्याच्या सवयीमुळे जग त्यांना भारताचे ‘बेअरफूट बिलियनेअर’ (अनवाणी अब्जाधीश) असेही म्हणत. आयआयटी मद्रासचे पदवीधर आणि प्रिन्स्टन युनिव्हर्सिटचे डॉक्टरेट श्रीधर वेम्बू यांनी सिलिकॉन व्हॅलीतील आपली नोकरी सोडून १९९६मध्ये मित्र परिवाराला बरोबर घेऊन ‘अड्व्हेंटनेट’ची स्थापना केली. २००९मध्ये अड्व्हेंटनेटचे रूपांतर ‘झोहो’मध्ये झालं.

तामिळनाडूतील तेनकासी या खेड्यात अख्ख्या जगाला सेवा देणारी कंपनी उभी करण्याच्या त्यांच्या संकल्पनेला सुरुवातीला सगळ्यांनी वेड्यातच काढले होते. पण आपले ज्ञान, स्वतःवरील आणि सहकाऱ्यांवरील विश्वास आणि अथक परिश्रमांच्या जोरावर त्यांनी अशक्य शक्य करून दाखवलं. जगभरात डेटा सेंटर आणि कार्यालये स्थापन करून, ‘डेलॉईट’सारख्या मोठ्या भागीदारांसोबत टायअप करून झोहो जगभरात आपले स्थान मजबूत करत आहे.

झोहोची कथा ही केवळ एका सॉफ्टवेअर कंपनीची यशोगाथा नसून, जागतिक स्तरावरील तीव्र स्पर्धेत आपले स्थान निर्माण करतानाही स्थानिक मातीशी नाळ कशी जपता येऊ शकते, याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आगामी काळात झोहोची उत्पादने सर्वसामान्य वापरकर्त्यांच्या दैनंदिन तांत्रिक गरजा पूर्ण करण्यात यशस्वी ठरल्यास इतरही अनेक भारतीय कंपन्यांद्वारे अशा सेवांच्या पुरवठ्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना योग्य ती चालना मिळेल. परिणामी, निकट भविष्यात किमान सॉफ्टवेअर क्षेत्रात तरी भारत व्यापक आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी!

- संगीता नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घरात भांडण करुन पळाले, कच्छच्या जंगलात गाववाल्यांनी पकडले, अल्पवयीन पाकिस्तानी जोडप्याने प्रेमासाठी पार केली देशाची सीमा

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

Viral Video: बिहारमधून दिसू लागला हिमालय आणि माऊंट एव्हरेस्ट; मनमोहक व्हिडिओ आला समोर Watch

Goa Politics: आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी द्या! ‘आप’चा काँग्रेससोबत युतीस स्पष्ट नकार

Shubhman Gill: "त्यांनी भारताला स्वबळावर अनेक सामने जिंकून दिले, आम्हाला त्यांची गरज..." नवा कर्णधार शुभमन गिलचे रोहित-विराटबाबत मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT