सुलक्षा म. गावस
एकदा मृत झालेल्या शरीरात एका सेकंदासाठीही प्राण परत फुंकता येत नाहीत. अर्थात जीवन अनमोल आहे. ते संपविण्याचा अधिकार स्वतःलाही नाही. प्रतिवर्षी १० सप्टेंबर रोजी ‘विश्व आत्महत्या प्रतिबंध दिवस’ जगभरात जनजागृतीसाठी साजरा केला जातो. लोकांच्या मनातील आत्महत्येसारखे वाईट विचार दूर करून सुखद आणि सकारात्मक विचारांचे वातावरण निर्माण करण्यावर भर देणे हा सदर दिवस साजरा करण्या मागचा उद्देश आहे. ‘आत्महत्येबद्दलचा विचार बदलूया आणि संवादाची सुरुवात करूया’ ही २०२४ ते २०२६ या कालावधीसाठीची संकल्पना आहे.
आठ वर्षांंतील आकडेवारी
२०१७.........२७३
२०१८.........२५६
२०१९.........२५९
२०२०.........३०८
२०२१.........३२१
२०२२.........३०२
२०२३.........३२७
२०२४.........२९८
२०१७ ते २०२४ या आठ वर्षांत सर्वात कमी आत्महत्यांची नोंद.
२०१८ मध्ये २५६ इतकी झाली आहे.
२०२३ मध्ये सर्वाधिक ३२७ इतकी नोंद झाली आहे.
नैराश्यग्रस्तांना आशेचा ‘किरण’
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी मानसिक नैराश्याचा सामना करत असेल, तो गोव्यातील स्थानिक सरकारी हेल्पलाईन किंवा ‘किरण’ (Kiran) या केंद्रीय मानसिक आरोग्य हेल्पलाईनवर (१८००-५९९-००१९) संपर्क साधून विनामूल्य मदत व समुपदेशन घेऊ शकता. याशिवाय टेलिमानस ही सर्वसमावेशक हेल्पलाईन असून (१४४१६) किंवा (१-८००-८९१४४१६) हा टोल फ्री क्रमांक डायल करून समुपदेशकांशी संवाद साधू शकाल. याव्यतिरिक्त मोबाईल ॲपही डाऊनलोड करता येईल.
आत्महत्यांमागची कारणे
आजच्या आधुनिक युगात आत्महत्यांच्या घटनांमध्ये झालेली मोठी वाढ आपल्याला संकेत देत आहे की, आपण अनुचित वातावरणात वावरतोय. आत्महत्येची कारणे जसे की, मानसिक आरोग्याच्या समस्या, मानसिक खेळांचे बळी, एकटेपणा आणि कमकुवत होत चाललेले सामाजिक संबंध, अपयश, शिक्षण आणि करिअरचा दबाव, आर्थिक असुरक्षितता, फसवणूक, भीती, नातेसंबंध तुटणे, सामाजिक तुलना आणि डिजिटल दबाव, हिंसा, गैरवर्तन आणि भेदभाव, मादक पदार्थांचे सेवन किंवा वाईट व्यसन, खोटे देखावे करण्याची सवय, शरीरात वा मनात दीर्घकाळ राहणाऱ्या वेदना आणि आजार. अशा अनेक कारणांमुळे आत्महत्यांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या व मानसिक ताण
२०२६ च्या सुरुवातीला गोव्यातील ‘बीट्स पिलानी’ कॅम्पसमध्ये लागोपाठ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावर चिंता व्यक्त करत शैक्षणिक ताणामुळे ‘सुसाईड कँटेजन’ (एकमेकांचे पाहून आत्महत्या करणे) किंवा ‘क्लस्टर इफेक्ट’ निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली होती व त्यानंतर तिथे २४/७ समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले.
सर्वाधिक आत्महत्या भारतात
जागतिक आरोग्य संघटनेच्या मानसिक आरोग्य अॅटलस २०२४ अहवालानुसार, वर्ष २०२१ मध्ये आत्महत्येमुळे ७,२७,००० मृत्यू झाले. तरुणांमध्ये मृत्यूचे तिसरे सर्वात मोठे कारण आत्महत्या हेच आहे. जागतिक स्तराच्या तुलनेत भारतात आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे.
‘एनसीआरबी’च्या जुन्या डेटाचा विचार केला तर गोव्यातील आत्महत्येचे प्रमाण प्रति १ लाख लोकसंख्येमागे साधारणपणे १९.९ इतके राहिले आहे, जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा थोडे अधिक आहे. सप्टेंबर २०२६ च्या एका अहवालानुसार, गेल्या ८ महिन्यांत गोव्यात विविध कारणांमुळे ५६ पर्यटकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये १० पर्यटकांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
संवादाला प्रोत्साहन देणे गरजेचे
जेव्हा आत्महत्या होते, तेव्हा केवळ एका व्यक्तीचा जीव जात नाही, तर त्या कुटुंबात, नातेवाईकांमध्ये, कार्यस्थळी, समाजात आणि संबंधित संपूर्ण समुदायामध्ये कायमस्वरूपी एक जागा रिकामी होते; तसेच सामाजिक, भावनिक आणि आर्थिक परिणाम होतात. आत्महत्या रोखण्यासाठी परस्पर संबंधांमध्ये सहानुभूतीपूर्वक संवादाला प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे आहे. गैरसमज दूर करणे, समस्या सांगणे, मोकळेपणाने आपले म्हणणे मांडणे, सहानुभूती आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करणे, या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. सरकार आणि सामाजिक संस्थांनीही समाजात आनंददायक, सकारात्मक वातावरण टिकवून ठेवण्यासाठी अमूल्य भूमिका बजावली पाहिजे.
संवाद हरवतोय !
आजच्या धावपळीच्या युगात आई-वडील आणि मुलांमधील संवाद हरवत चालला आहे. अशा वेळी पालकांनी आपल्या मुलांशी मैत्रीचे आणि विश्वासाचे नाते निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. पालकांनी घरामध्ये असा ‘कम्फर्ट झोन’ तयार केला पाहिजे, जिथे मुले न घाबरता आपल्या मनातील भीती, दुःख किंवा शंका उघडपणे मांडू शकतील. मनात साचून राहिलेले विचार जेव्हा संवादाच्या माध्यमातून बाहेर पडतात, तेव्हा मानसिक ताण आपोआप हलका होतो. आत्महत्येचा विचार मनात येण्यासाठी आणि ते पाऊल उचलण्यासाठी काही सेकंदच पुरेसे असतात. जर योग्य वेळी संवाद झाला, तर हे सेकंदांचे नकारात्मक विचार सहज ‘डायव्हर्ट’ केले जाऊ शकतात.
- सपना गावस, पोलिस उपनिरीक्षक
युवकांना आभासी जगाची भुरळ!
२१ व्या शतकात भारत हा तरुणांचा देश आहे. पण, सोशल मीडियामधूनच आजचा युवक बाहेर पडेनासा झाला आहे. त्याचबरोबर आजची कुटुंब नावाची संस्था अबोल बनू लागली आहे. सध्या घरातील संवाद समोरासमोर अर्थात ‘फेस टू फेस’ होत नसतो. त्यावेळेस विचारांची भावनांची निर्जीव पद्धतीने देवाण-घेवाण होत असते. म्हणूनच बहुतांश युवक संस्कारांपासून दुरावत आहेत. इंटरनेट कंपन्यांनी युवकांना डेटाचा रतीब घातला आहे. दररोज डेटा संपवण्यासाठी रात्रंदिवस मोबाईलवर सोशल मीडियावर राहतो कळत नकळत मेंदू ,डोळे व शरीरावर ताण येतो आणि आभासी जगात जाऊन मी तसेच असायला हवे, अशी स्वप्ने तो बाळगतो. ती स्वप्ने भंग पावल्यास नकळत तरुण आत्महत्येकडे वळतो. विद्यार्थ्यांत वाढता न्यूनगंड आठवीपर्यंत मुलांना नापासच करायचे नाही, या धोरणामुळे तसेच बारावीपर्यंत ‘बेस्ट फाईव्ह’ यासारख्या घटकांमुळे बालपणात विद्यार्थ्यांच्या वाट्याला अपयश येत नाही, त्यामुळे अचानक आलेल्या अपयशामुळे नकळत मुलांमध्ये न्यूनगंड येतो, किंवा अपयशाच्या भीतीने मुले आत्महत्येकडे वळतात.
मुलांशी नियमित संवाद हवा!
दररोज पालकांनी स्वतःशी नोकरीवरून घरी आल्यानंतर किंवा संध्याकाळी झोपताना फक्त स्वतःला एक प्रश्न विचारावा की मी आज माझ्या मुलांशी बोललो का? या प्रश्नाचे अंतर्मुख होऊन चिंतन केले तर मुले आणि पालक यामध्ये नक्की संवाद घडेल कळत नकळत वेगवेगळे मार्ग आपोआप निघतील. मुले पालकांशी संवाद करू शकतील.
-प्रा. डॉ. मोहन निंबाळकर, (प्राचार्य शारदाबाई महाविद्यालय, बारामती)
स्वतःवर बंधने हवीत!
सोशल मीडिया यावरती आपण बंधन ठेवू शकत नाही पण आपण आपल्या वरती बंधन ठेवणे शक्य आहे यासाठी पालकांनी दररोज घरी आल्यानंतर अशी नियमावली करावी की जेणेकरून काही कालावधी घरातील सर्व सदस्यांचे ‘मोबाईल स्विच ऑफ’ असतील आणि फक्त समोरासमोर कुटुंबाबद्दल वेगवेगळ्या अडीअडचणी बद्दल पालक आणि मुले चर्चा करतील, अशी नियमावली असावी.
जीवनदायी संवाद...
नकारात्मकतेच्या तिमिरातून निसटून आशादायी तेजाकडे वाटचाल करत संवाद आधार आणि संवेदनशीलतेच्या माध्यमातून जीवनाला नवी झळाळी देण्यासाठीची ही साद आहे.
जे टाळणे अशक्य, दे शक्ती दे सहाया
जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय
माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया
कुणी परीक्षेच्या भीतीने मृत्यूला कवटाळते, कुणी डोक्यावरच्या कर्जाच्या डोंगराचा भार पेलवत नाही म्हणून, कुणी आजाराचे दुखणे कायमचे सुटावे म्हणून तर कुणी कौटुंबिक कलहाचा ससेमिरा चुकवण्यासाठी. तात्पुरत्या समस्यांवर काढलेला आत्मघाताचा तोडगा जीवाभावाच्या माणसांच्या जिवाला घोर लावून जातो. हे लिहिताना ती माऊली आठवली. तिच्या होतकरू मुलाने प्रश्नाला न भिडता, मृत्यूस कवटाळणे पत्करले. त्या माऊलीच्या डोळ्यांची धार कधी थांबली नाही. ती म्हणते अधून मधून,‘त्याच्यासारखं स्वतःचा जीव घेणे मला पटत नाही म्हणून जगतेय.त्याच्या आठवणींवर दिवस सारतेय’ मुलगा जाऊन १७ वर्षे उलटली तरी अश्रुधारेला विराम नाहीच.
तो वाचला असता, त्याच्या स्वभावातील बदलाचे कुणी डोळसपणे निरीक्षण केले असते तर, त्याला मायेने आधार दिला असता तर. मृत्यूशय्येवर असताना तो मित्राला कळवळीने सांगत होता, मला मरायचे नाही मला वाचव. यातून दोन गोष्टी अधोरेखित करू इच्छिते एक म्हणजे हा विचार क्षणिक असतो व दुसरा खंबीर, ग्रह करून न घेता समजून घेणारा, आधार याच्या मदतीने तो क्षण टाळता येतो. नैराश्य व मानसिक वेदना दाटून आल्या की, माणूस स्वतःच्या कोशात जाऊ लागतो. ‘जीवाचा कंटाळा आला आहे’, ‘आता काही अर्थ नाही’ अशी निर्वाणीची भाषा बोलली जाते. आपल्या आवडत्या वस्तू इतरांना देणे, लोकांपासून अचानक दूर जाणे वा निराशेची तीव्र भावना व्यक्त करणे, या संकेतांकडे दुर्लक्ष न करता वेळीच त्याची दखल घेणे महत्त्वाचे आहे.
आत्महत्येचा विचार हा त्या क्षणी असह्य वाटणाऱ्या वेदनेतून निर्माण होऊ शकतो; म्हणून त्या क्षणीचा निर्णय अंतिम ठरू नये, यासाठी आधाराचा हात मिळणे महत्त्वाचे आहे.कधी कधी साध्या गोष्टी मदत करू शकतात.एक कप चहा घेणे, उठून मनापासून आंघोळ करणे, आवडत्या व्यक्तीशी बोलणे. अशा छोट्या कृती मनाला उसंत देऊ शकतात. विचार तीव्र असतील वा स्वतःला इजा करण्याचा धोका वाटत असेल, तर फक्त स्वतःला व्यग्र ठेवणे पुरेसे नाही; विश्वासू व्यक्ती, मानसिक आरोग्य तज्ज्ञ किंवा तातडीची मदत त्वरित घेणे आवश्यक आहे. योग्यवेळचे समुपदेशन व आवश्यक उपचार एखाद्याला अंधारातून पुन्हा आशेकडे नेऊ शकतात. या आत्महत्या प्रतिबंधक दिनी मौनाऐवजी संवाद निवडूया, समजूतदारपणा निवडूया अन् निराशेऐवजी मदतीचा हात पुढे करूया. जीवन संपवण्याचा विचार आला, तरी तो एकट्याने पेलायचा नाही; बोला, मदत मागा आणि जीवनाला आणखी एक संधी द्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.