

पणजी: ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉटसीटवर पणजीच्या उमेदवाराचा उल्लेख होताच महानायक अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणी उमटल्या. पणजीतील माझी पहिली चाहती आजही माझ्या संपर्कात असल्याचे बच्चन यांनी सांगितले. त्या चाहतीबद्दल आजही मला आदर असून तिने अद्याप विवाह केला नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे ‘केबीसी’च्या मंचावर पणजीचा उल्लेख केवळ एका स्पर्धकामुळे नव्हे, तर अमिताभ बच्चन यांच्या वैयक्तिक आठवणींमुळेही विशेष ठरला.
पणजीतील क्विझ मास्टर अजित पुनिया यांनी २८ सप्टेंबरच्या ‘केबीसी-१८’च्या भागात हॉटसीटवर स्थान मिळविले. ‘इंडिया चॅलेंजर वीक’मधील ‘जल्दी-५’ फेरीत पाच प्रश्नांची अचूक उत्तरे देत त्यांनी हॉटसीट गाठली. लहानपणापासून क्विझची आवड असलेल्या पुनियांनी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी संस्थांमध्ये प्रश्नमंजूषांचे आयोजन केले आहे. पुनियांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला गोव्याचा संदर्भ मिळाला आणि त्याचवेळी बच्चन यांनी पणजीशी असलेले जुने नाते उलगडले. पणजीतील पहिली चाहती आजही संपर्कात असल्याचे बच्चन यांनी सांगितल्याने गोमंतकीय प्रेक्षकांसाठी हा प्रसंग विशेष ठरला. चित्रपटांपासून दूर असलेल्या एका वैयक्तिक आठवणीला त्यांनी ‘केबीसी’च्या मंचावर उजाळा दिला.
अविस्मरणीय ‘शोले’ आणि ‘गब्बर’
पुनियांनी स्वतःही बच्चन यांच्याशी चित्रपटांविषयी चर्चा केली. ‘शोले’शी संबंधित प्रश्नाच्या निमित्ताने बच्चन यांनी अमजद खान यांच्या ‘गब्बर’च्या भूमिकेची आठवण सांगितली. अमजद खान कुटुंबासह चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईहून गोव्याला येत असताना १९७६ मध्ये त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. उपचारादरम्यान शस्त्रक्रियेची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर कुटुंबीयांच्या संमतीसाठी बच्चन यांनी स्वाक्षरी केल्याची आठवण त्यांनी सांगितली. त्यानंतर अमजद खान यांना मुंबईला हलविण्यात आले.
...अखेर पुनिया १२.५ लाखांवर थांबले
पुनियांनी प्रश्नमंजूषेत सावधपणे वाटचाल करत १२.५ लाख रुपये जिंकले. दोन लाख रुपयांच्या प्रश्नासाठी त्यांनी ‘ऑडियन्स पोल’, तर तीन लाख रुपयांच्या प्रश्नासाठी ‘संकेत सूचक’ ही लाइफलाइन वापरली. ‘सुपर संदूक’ फेरीत १० पैकी नऊ प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी ९० हजार रुपये मिळवले आणि त्याऐवजी ५०:५० लाइफलाइन निवडली. ७.५ लाख रुपयांचा प्रश्न ‘महाफ्लिप’च्या मदतीने सोडविल्यानंतर ते १२.५ लाख रुपयांपर्यंत पोहोचले.
यानंतर त्यांच्यासमोर २५ लाख रुपयांचा प्रश्न आला. अंतराळात मृत्यू झालेल्या तीन व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही? पर्यायांमध्ये जॉर्जी डोब्रोव्होल्स्की, व्हिक्टर पॅटसायेव्ह, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्लादिमीर कोमारोव्ह यांचा समावेश होता. ५०:५० लाइफलाइन उपलब्ध असतानाही पुनियांनी जोखीम न घेता खेळ सोडण्याचा निर्णय घेतला आणि १२.५ लाख रुपयांची रक्कम सुरक्षित केली. योग्य उत्तर व्लादिमीर कोमारोव्ह हे होते.
अंतराळातील मृत्यूचा प्रश्नही तितकाच रंजक ठरला. १९७१ मध्ये सोयूझ-११ मोहिमेदरम्यान जॉर्जी डोब्रोव्होल्स्की, व्हिक्टर पॅटसायेव्ह आणि व्लादिस्लाव वोल्कोव्ह यांचा अंतराळात मृत्यू झाला होता. त्यांच्या यानातील दाब अचानक कमी झाल्याने परतीच्या प्रवासात त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, व्लादिमीर कोमारोव्ह यांचा १९६७ मध्ये सोयूझ-१च्या पृथ्वीवर परतीच्या वेळी पॅराशूट यंत्रणेतील बिघाडामुळे मृत्यू झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.