Vashi Island Ai Image Generator
गोंयकाराचें मत

Vashi Island: मांडवीच्या कुशीत दडलेले वाशी बेट! समुद्राच्या लाटांपासून हिरव्यागार वनराईपर्यंत निसर्गाचे प्रत्येक रूप येथे अनुभवता येते

Vashi Island Biodiversity: समुद्र किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटांची गाज ऐकताना संगीताचा आनंद मिळतो, किनाऱ्यावर चालताना अगर पाण्यावरील शुभ्र वाळूतून चालताना पायांना कोमलपणा मिळतो.

गोमंतक ऑनलाईन टीम

मधू य.ना.गावकर

समुद्र किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटांची गाज ऐकताना संगीताचा आनंद मिळतो, किनाऱ्यावर चालताना अगर पाण्यावरील शुभ्र वाळूतून चालताना पायांना कोमलपणा मिळतो, हिरव्या वाटांतून जाताना उंच झाडांच्या सावलीने सुखावतो, चैत्र मासात वनातून फिरताना डोक्यावर सूर्याची आग पडते, पण कोवळ्या पालवीचा रंग-बहार पाहून मन थक्क होते, बांबूच्या हिरव्या वनात फिरताना आकाशात छत्री फुललेली दृष्टीस पडते, रानातून दचकत चालताना सरपटणारे प्राणी अचानक दिसल्यास छातीत धडकी भरते, निसर्ग पहात राहणे ही सुद्धा घोर तपश्‍चर्या असते.

ती करण्यासाठी मन एकाग्र ठेवून अरण्यविद्या प्राप्त करता येते. जंगलातील हत्ती म्हातारा झाल्यावर आत्म समर्पण करतो, अशा अनेक गोष्टी म्हादईपुत्र राजेंद्र केरकर यांच्यासोबत चालताना शिकण्यास मिळाल्या. आज मी पंच्याहत्तरी पार करून मागच्या वीस वर्षांचा काळ मागे वळून पाहताना, या छंदाच्या तपश्चर्येमुळे जंगलाची अगर नदी, नाल्यांची भटकंती कशी करावी हे त्यांच्यामुळे शिकलो. जंगल प्रवास करताना सावकाश, डोळसपणे आणि सावधपणे करावा लागतो.

अशा ज्ञानामुळे हजारो टाके पडणाऱ्या गोधडीचा जन्म झाला, वन विद्येच्या ज्ञानासाठी सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री जाऊन तिथल्या जैवविविधतेचे निरीक्षण, अभ्यास करून लेखन करावे लागते. या निरीक्षणानंतर नोंदी-करताना जंगल जिवांचे धाग एकमेकांत गुंफल्याचे समजते, त्यांचे धागे म्हणजे, ययाती आणि शुक्राचार्य यांचा जीवन-बदल नाही.

हंस पक्षाच्या घरट्याचे आणि त्याच्या विणीतील काळाचे सुक्ष्म वर्णन करणारे वैदीक ऋषी, रानात गाईच्या कळपात राहुन ब्रम्हज्ञान मिळवणारे सत्यकाम जाबाल, खगोलशास्राचा अभ्यास करणारे शुणःरोप, गूढ अंतरिक्षाचे वर्णन करणारे भृगुऋषी, हत्तीवर ग्रंथ लिहीणारा पालकाप्य मुनी, तृणांवर उपजीविका करीत कांचनमृगाबरोबर रहाणारा शतकर्णी, निसर्गाचे वर्णन करणारा कवी कालिदास, या महान शास्रज्ञांनी जंगलात राहुन, पक्षी, सरपटणारे प्राणी, हिंस्त्र जनावरे, वनस्पती, डोंगर, दऱ्या, वाहणारे पाणी, पाऊस, थंडी, ऊन, आकाशदर्शन यांचे निरीक्षण प्रयोग आणि लेखन करून वनविद्या संपादन केली, हे त्यांच्या ग्रंथात सापडते.

त्यांनी जो तपश्‍चर्या केली, ती भविष्यासाठी उपयोगी पडणारी, निसर्ग आणि मानव यांचा मिलाफ म्हणजे रान. काही पक्षी जंगलात रहात नाहीत, ते सदोदित तलाव, ओहोळ, खाडीच्या काठावर दिसतात. मात्र, त्यांची घरटी पठारावरील गवताळ तृणांत असतात, हे पाहण्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागतो. यालाच वनविद्या म्हणतात. ही विद्या आदिवासी लोकांचे पूर्वज ऋषी, मुनी, साधूंकडून शिकले. आज ही विद्या आदिवासी लोकांकडून शिकण्यास मिळते, असे डॉ. माधव गाडगीळ जंगलाच्या भ्रमंतीत सांगायचे, जंगल प्रवासात शिकलेली विद्या कधीच नष्ट होत नाही, असे ते म्हणायचे.

आदिवासी लोक पाऊस येण्यापूर्वी पृथ्वीला पुष्पावती म्हणत होते, आणि पाऊस पडल्यानंतर गंधवती म्हणत, जंगलातील पुष्पवैभव फुलल्यावर त्याचा गंध परिसरात पसरून वातावरण सुगंधित बनते. सृष्टीची ती ऊर्जा आहे, ती नष्ट होत नाही, वाऱ्यासंगे नी आकाशाच्या गाभाऱ्यात जाते, पावसाला सुरवात झाली म्हणजे, तो पुष्पगंध त्या सरींतून मातीत जिरुन तो गंध वृक्ष-वेली, झुडपे साऱ्यांतून खेचून फुलणाऱ्या फुलांच्या परामात येऊन ती स्थान मिळवत असावा. पहिला पाऊस मातीवर पडताच त्या मातीतून सुगंध बाहेर पडतो.

त्यावेळी मनाला जाण येते, की आता पृथ्वी हिरवा शालू नेसून सुगंधाची उधळण करणार आणि पावसाच्या सरी कोसळताना सूर्याची किरणे त्यात सामील होऊन इंद्रधनुष्याच्या आगमनाने पृथ्वीच्या डोक्यावरील अंबर मंडप सजणार. या सृष्टीचक्राचे ओझे डोक्यात भरल्याने खांडोळा गावातून स्कुटरने जुने-गोवे फेरीतून धक्क्यावर मी आणि माझे मित्र एकनाथ परब कधी पोहोचलो, हे कळले नाही. आफोन्स-द-आल्बुकर्क कमानीतून मांडवीच्या पात्रातून वाहणारे लाल पाणी चाळून स्वच्छ करण्याचे काम वाऱ्याच्या सहाय्याने उडणाऱ्या लाटा करीत तो गाळ खाली तळाकडे नेत होत्या. हे दृष्य

पहात दिवाडी बेटावरून दक्षिणेकडून उत्तरेकडील मांडवीचा दुसरा काठ गाठला. आणि त्या काठावरून अतिसंवेदनशील वाशी बेटाचे दर्शन झाले. अवघ्या मिनिटांत दुसऱ्या फेरीबोटीने मांडवी पार करून वाशी बेटावर दुसऱ्यांदा पाय ठेवला. आणि थोर पर्यावरणवादी फादर बिस्मार्क डायस यांची आठवण आली. कारण त्यांनी सांतइस्तेव्ह रामाच्या तारीवरून होडी प्रवासाने डॉ. माधव गाडगीळांना नेले होते, त्यांच्या सोबत मीही होतो, संपूर्ण दिवस आम्ही डॉक्टरांसोबत जैवविविधते संबंधी माहिती जाणून घेत होतो.

वाशी बेटावर पाय ठेवताच पायातील चप्पल काढून फिरावे इतके हे बेट संवेदनशील आहे. बेटाला मांडवीच्या पात्राने वेढले असून, तिने बेटाच्या किनारी तटावर वर्तुळाकार भागात हिरवेगार वलय निर्माण करून ला बेटाला बुरुजाप्रमाणे उभे केले आहे. बेटावर देवकीकृष्ण आणि सातेरीचे प्रकच देऊळ आहे.मला वाटते बाटाबाटीच्या काळात चोडण माडेल बेटावरून दुसऱ्या टिकाणी श्रींच्या मूर्ती नेताना वाशी बेटावरून त्या नार्वे पंचगंगा तीरावर नेऊन नंतर त्या माशेलात आणल्या असाव्यात. बेटावर चहूबाजूने खाजन शेती पहावयास मिळते. पडीक शेती कांदळवनाने व्यापलेली दिसते.

शेतीचे खाऱ्या पाण्यापासून रक्षण करण्यास सभोवार सात मानसा लावून करंगुट मुणे, आजगा, खोचरी अशी गोमंतकीय भात-बियाणी पेरणी करून लोक भातपीक घेत होते. त्या बेटावर गोपालन होते, बैलाच्या सहाय्याने नांगरणी करून पीक घेत होते. हिवाळ्यात मिरची, कांदा, हळसांदे, वाल आणि इतर भाजीचे पीक घेत होते. पावसाळ्यात बांधावर भेंडी, टरबूज, काकडी, दोडगी पीक घेत होते. मांडवीच्या पात्रातील आठही बेटांना या नदीने मत्स्यधनाची कोठारे बनवली होती.

बेटावरील मच्छीमारी लोक जाळ, वेणी, हारीच्या सहाय्याने खारे आणि गोड्या पाण्याशील काळूंद्र, शेवटा, पालू, तामसा, खरचाणी, घोळशी, चोणकुल, खेकडे, मुड्शी, बागी, झिंगे, सांगट, शेतुक, बुराटे अशी रुचकर मासळी पकडून आपला संसार चालवतात. वाशी बेटाच्या भागाला तीन नावांनी ओळखतात, सखला वाडा, वरचावाडा आणि ख्रिश्‍चन वाडा, तिथे ख्रिश्‍चन लोकांचे गिरीजाघर आहे. बेटावर कैक घरे बंद असून ती कुटुंबे परदेशात स्थायिक झाली आहेत. बेटावर हिंदू, ख्रिश्चनांचा मिलाफ असून ते एकत्र नांदतात.

पूर्वी बेटावर विहिरींचे पाणी पित होते. आश्चर्य म्हणजे हे बेट मांडवीच्या खाऱ्या पाण्याचे वेढूनही वसुंधरेने तिथल्या जैवविविधतेसाठी गोड पाण्याची व्यवस्था केली आहे. वाशी बेटावर कैक प्रकारच्या पक्ष्यांचे थवे येतात आणि जातात. काही पक्षी तिथे स्थायिक होतात. पिटकळ, कणेर, हासाळी, चुरन, जांभूळ, फातर फळ, फणस आणि नारळाची झाडे आहेत. मानकुर, मालगेस, सावेर, साकरीन आंबा झाडेही आहेत. इवल्याशा बेटावर पोर्तुगीज सोल्जरांची पोलिस चौकी होती. तिथला हिंदू रहिवासी वारल्यास त्याचे प्रेत होडीच्या सहाय्याने मांडवीतून अंदाजे दोन कि. मी. अंतरावर पंचगंगा तीर्थस्थानावर नेऊन तिथे विधिवत चिताग्नी देतात.

मात्र, केवढा हा खडतर प्रवास. ख्रिस्तींसाठी बेटावर दफनभूमी आहे. पोर्तुगीज काळातील एक स्वतंत्र गाव आज विकासासाठी दिवाडी मालाड पंचायतीला जोडला आहे. आज बेटावर वीज आणि नळाचे पाणी पोहचले आहे, तरीही शिक्षणासाठी अगर आरोग्यासाठी नदी पार करून दिवाडी गाठावी लागते. पूर्वी या बेटावर जाण्या-येण्यास दिवाडी, लॉयेला कारय व मुर्डी नार्वे या ठिकाणी होडी , तार होत्या. आणि पणजीला जाण्यास लॉन्च होती, ती माडेल, विठोजे, लॉयेला, वाशी, नार्वे आणि दिवाडी या ठिकाणी धक्क्यावर प्रवाशांना घेत होती. काही असो मांडवीची सात बेटे माणसांनी गजबजली आहेत, मात्र कृष्णाचे वाशी बेट कासवांच्या बेटाप्रमाणे शांत आहे. ते पाहण्यास आपल्यात आज फादर बिस्मार्क नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Gochar 2026: शुक्राच्या नक्षत्रात सूर्यदेवाचा जलवा! 13 सप्टेंबरपर्यंत 4 राशींवर पैशांचा पाऊस; 31 ऑगस्टची तारीख ठरणार जॅकपॉट

Iran Prison: 'इराणच्या तुरुंगात महिलांवर क्रूर अत्याचार...'!, ट्रम्पचा खळबळजनक दावा; द जेरुसलेम पोस्टचा रिपोर्ट केला शेअर

Mallikarjun Kharge Vehicle Attack: मल्लिकार्जुन खर्गेंच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या 'BJYM'कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवा; गोवा काँग्रेसची मागणी

Santa Cruz Constituency: सांताक्रूझमध्ये भाजपच्या उमेदवारास पाठिंबा, बाबूश मोन्सेरात यांचे स्पष्टीकरण; रुडॉल्फबाबत बोलणं टाळलं

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर महागाई भत्ता वाढीची घोषणा होणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT