

पणजी: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दस्तऐवज आणि पदवी प्रमाणपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच त्यांची पडताळणी सुलभ करण्यासाठी गोवा विद्यापीठाने केंद्र सरकारच्या ‘नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरी’ (नाड) प्रणालीमध्ये स्वतःचा समावेश करून घेतला आहे. यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सर्व पदव्या, पदविका (डिप्लोमा), प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका आता डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहतील आणि तात्काळ उपलब्ध होणार आहेत.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा ‘डिजिलॉकर’ हा एक मुख्य भाग आहे. ‘नाड’ ही २४ तास सेवा देणारी ऑनलाइन डिजिटल दस्तऐवज साठवणारी प्रणाली असून, याद्वारे शैक्षणिक संस्थांनी डिजिटल पद्धतीने जमा केलेल्या कागदपत्रांची सत्यता आणि सुरक्षितता तपासली जाते.
या सुविधेमुळे नोकरीच्या ठिकाणी किंवा पुढील उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करणे अधिक पारदर्शक, वेगवान आणि कागदविरहित होणार आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे.
मूळ कागदपत्रांइतकीच वैधता
माहिती तंत्रज्ञान नियम, २०१६ नुसार, डिजिलॉकर प्रणालीमध्ये उपलब्ध असलेले डिजिटल दस्तऐवज हे मूळ कागदपत्रांइतकेच वैध मानले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठेही प्रत्यक्ष कागदपत्रे सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही. तसेच कागदपत्रे गहाळ होण्याची भीतीही पूर्णपणे नाहीशी होणार आहे.
नोंदणी प्रक्रिया सोपी
गोवा विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना या प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. विद्यार्थ्यांनी digitallocker.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथे आपली प्राथमिक माहिती भरून नोंदणी पूर्ण करावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.