

वास्को: बायणा येथील उड्डाणपुलाच्या कठड्याला जोरदार धडक बसल्याने उसळून उड्डाणपुलावरून सुमारे २० ते २५ फूट खाली असलेल्या रस्त्यावर आपटल्याने मृत्यू पावलेले मांगोरहिल येथील श्रीशैल तलवार (२८) व बायणा येथील सुवर्णा कोप्पर (२२) यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीशैल याच्यावर खारीवाडा, तर सुवर्णा हिच्यावर बोगदा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुरुवारी रात्री अंदाजे साडेदहाच्या सुमारास श्रीशैल व सुवर्णा हे दोघे दुचाकीवरून घरी निघाले होते. श्रीशैल चालवत असलेल्या दुचाकीची बायणा येथील उड्डाणपुलाच्या कठड्याला जोरदार धडक बसल्याने ते दोघेही उसळून उड्डाणपुलावरून सुमारे २० ते २५ फूट खाली असलेल्या रस्त्यावर आपटले. यात सुवर्णा हिचा जागीच मृत्यू झाला, तर श्रीशैल याला इस्पितळात मृत घोषित करण्यात आले. वास्को पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठविले होते. शवचिकित्सेनंतर शुक्रवारी दोघांचेही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
उड्डाणपुलावरील तीव्र वळण धोकादायक : बायणा येथील उड्डाणपुलावरील तीव्र वळण सध्या जीवघेणे ठरू लागले आहे. हे वळण अतिशय धोकादायक असून, वेगाने येणाऱ्या वाहनाने वेग कमी केला नाही, तर वाहन नियंत्रणाबाहेर जाते. बहुतांश चालक त्या ठिकाणी पोहोचल्यावर वेग कमी करून पुढे जातात. तरीही येथे आतापर्यंत लहान-मोठे अपघात घडले आहेत. हल्लीच एका ट्रकची कठड्याला ठोकर बसून ट्रक कठड्यावर कलंडला होता.
नशीब बलवत्तर म्हणून ट्रकचालक वाचला होता. तसेच ट्रक पुलाखालील रस्त्यावर कोसळला नाही. मात्र, त्यातील साहित्य रस्त्यावर पडले होते. त्यात सापडून एका दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. हे वळण तीव्र असल्याने वेगाने येणारी वाहने येथे धडकतात. त्यामुळे येथे आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.
श्रीशैल डान्सर म्हणून होता परिचित
श्रीशैल हा पूर्वी मांगोरहिल येथील गुरुद्वारानजीकच्या एका गल्लीत आपल्या पालकांसह राहत होता. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून तो आपल्या आई-वडिलांसह व भावासोबत ड्रायव्हरहिल येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. निरनिराळ्या कार्यक्रमांत नृत्य करणारा श्रीशैल हा परिसरात डान्सर म्हणून परिचित होता, तर त्याचा भाऊ डीजे आहे. श्रीशैल याला चार-पाच महिन्यांपूर्वी गोवा शिपयार्डमध्ये कंत्राटी पद्धतीवर नोकरी लागली होती.
त्यामुळे त्याचे पालक व तो खूश होता. गुरुवारी तो बाहेर जाऊन येतो, असे आपल्या आईला सांगून घराबाहेर पडला होता. मात्र, बराच वेळ तो घरी न परतल्याने त्याच्या काळजीपोटी आईने फोन करून त्याला लवकर घरी येण्यास सांगितले. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही. उलट, त्याच्या अपघाताची माहिती घरी पोहोचली.
तासाभरात घरी परतणार होती सुवर्णा!
सुवर्णा ही बायणा येथील कलीमट्टी चाळीत राहत होती. तिचे आजोबा एमपीटीमध्ये कामाला होते. तिचे वडीलही मुरगाव बंदरातील वेस्टर्न इंडिया शिपिंगमध्ये कामाला होते. त्यांचे बारा वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे तिच्या आईने सुवर्णा व तिच्या भावाचे पालनपोषण करून त्यांना वाढविले. सुवर्णाने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केल्याने ती काही दिवस पुण्यामध्ये कामाला होती.
महिन्यापूर्वी ती परतली होती व येथील एका हॉटेलमध्ये कामाला लागली होती. गुरुवारी तिने आपल्या आईला आपण जरा बाहेर जात असून तासाभराने परतणार असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. उशीर झाल्याने तिच्या आईने तिला फोन करून घरी परतण्यास सांगितले. ती श्रीशैलसह दुचाकीने बायणा येथे येत असताना अपघातात तिचा मृत्यू झाला.
रस्त्याची पाहणी करण्याची वाहतूक मंत्र्यांची सूचना
दरम्यान, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी या उड्डाणपुलावरील रस्त्याची पाहणी करण्याची सूचना रस्ता सुरक्षा मंडळाच्या सदस्यांना केली आहे. मंडळाचे सदस्य पाहणी करून आवश्यक उपाययोजना सुचवतील, असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.