Teachers Day Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Teachers Day: विद्यार्थ्याने वाकून नमस्कार केला, तो गौरव जास्त भावला; शिक्षक दिन कसा साजरा करणार?

Teachers Day 2025: दि. ५ सप्टेंबर हा माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. तो देशभर ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा समाजातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक.

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

दि. ५ सप्टेंबर हा माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. तो देशभर ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा समाजातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक. समाज घडविण्याचे काम शिक्षकच करत असतो. पूर्वी शिक्षक विशेष पगार नसतानासुद्धा जीव तोडून शिकवायचे.

मी म्हापशाच्या सारस्वत विद्यालयात असताना आम्हांला इयत्ता दुसरीला ठाकूर नावाचे गुरुजी भूगोल शिकवायचे. ठिगळे लावलेला कोट घालून हे गुरुजी आम्हांला असे काही शिकवायचे, की आजसुद्धा त्यांनी शिकवलेला तो भूगोल आम्ही विसरलेलो नाही.

नंतर फोंड्याच्या आल्मेदा हायस्कुलात मला अनेक चांगले शिक्षक भेटले. विश्वनाथ लवंदे सर हे यांपैकीच एक. त्यांनी शिकवलेले विज्ञान आजही आमच्या नसानसांत भिनले आहे. म्हणून आजसुद्धा ते रस्त्यात दिसले की आम्ही नतमस्तक होतो.

स्टीफन सरांनी शिकविलेली ’डॉटर जेकेल अँड मिस्टर हाइड’ ही कादंबरी आजसुद्धा आम्हांला आठवते ती स्टीफन सरांच्या शिकविण्याच्या पद्धतीमुळे.

प्रमोदिनी धारवाडकर, सुनिता भांडारी, जोजेफ पिंटोसारखे आल्मेदातील अनेक शिक्षक आमच्या स्मृतीत आजसुद्धा त्यांच्या प्रभावी शिकवण्यामुळे मर्मबंधातील ठेव बनले आहेत.

नंतरच्या काळात मी वास्कोच्या एम.ई.एस. महाविद्यालयामध्ये प्राध्यापक झाल्यावर अनेक दर्जेदार सहअध्यायी भेटले. प्राचार्य माधवराव कामत यांनी तर आम्हांला विविध दिशा दाखवल्या.

शिक्षकाने फक्त शिकवण्यापुरते मर्यादित न राहता इतर क्षेत्रातही यश संपादन केले पाहिजे हा त्यांनी दिलेला संदेश माझ्यासारख्या अनेकांच्या आयुष्याला एक नवे वळण देऊन गेला. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. पण मुख्य म्हणजे त्यांनी जे प्रशासन आणि माणुसकी यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम केले आहे त्याला खरोखरच तोड नाही.

कारकिर्दीच्या सुरुवातीलाच प्राचार्य माधवराव कामतांसारखा प्राचार्य मिळणे हे माझे भाग्यच. त्याचबरोबर कै. डॉ. हरिश्चंद्र नागवेकर, डॉ. नरहरी जंबगी, पुजारी, श्रीवल्लभ कामत, दिनेश कामत यांसारख्या माझ्या अनेक सहचाऱ्यांनी स्वतःला झोकून देऊन कसे शिकवायचे असते याचे प्रात्यक्षिकच दाखवले.

आता इतर घटकांप्रमाणेच शिक्षकही व्यावसायिक बनायला लागले आहेत. समाजातील वाईट प्रवृत्ती शिक्षकांतही भिनताना दिसायला लागल्या आहेत. म्हणून तर विद्यार्थिनींचा विनयभंग करणे, विद्यार्थ्यांना मारहाण करणे, पेपर फुटी प्रकरणात सहभागी असणे असले प्रकार करणारे शिक्षक आज बघायला मिळू लागले आहेत.

वास्तविक आज शिक्षकांना चांगले वेतन आहे. पण तरीसुद्धा वाम मार्गावरून वाटचाल करणारे शिक्षक आज घडोघडी दिसत आहेत. आव्हाने स्वीकारून विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षक आज कालबाह्य होताना दिसायला लागले आहेत.

या पवित्र पेशातही आज राजकारणाचा शिरकाव व्हायला लागला आहे. म्हणूनच तर राज्य पुरस्कारासारख्या महत्त्वाच्या पुरस्कारालाही राजकारणाचे गालबोट लागताना दिसायला लागले आहे. मला आठवते काही वर्षांपूर्वी शिकवण्याच्या नावाखाली विमा व्यवसाय करणाऱ्या एका शिक्षकाला त्याच्यावर असलेल्या राजकीय वरदहस्तामुळे शिक्षकाचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला होता!

पण खरं सांगायचं तर शिक्षकांचा पुरस्कार म्हणजे विद्यार्थ्यांनी दिलेले प्रशस्तिपत्रक. शिक्षकाचा खरा मानदंड हा विद्यार्थीच असतो. विद्यार्थ्यांना आपला शिक्षक कसा आहे याची चांगली जाण असते. आणि ही जाण ते शिक्षक निवृत्त झाला तरी बाळगत असतात.

मला जेव्हा गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळाला तेव्हा एम.ई.एस.मधला १९८९सालच्या बॅचचा एक विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातमी वाचून त्या सोहळ्याला उपस्थित राहिला. केवळ उपस्थितच राहिला नाही तर त्याने मला खाली वाकून नमस्कार केला व भेटवस्तू देऊन तिथेच माझा गौरवही केला. तेव्हा मला शिक्षकाची महती काय असते हे खऱ्या अर्थी कळले. त्यामुळे राज्य पुरस्कार मिळाल्यापेक्षा मला त्या विद्यार्थ्याने केलेला गौरव जास्त भावला.

हे पाहता शिक्षकाची जबाबदारी अधिकच वाढायला लागते. ‘दिवार’मध्ये शशी कपूर जेव्हा ‘मेरे पास माँ है’ असे म्हणतो तेव्हा त्याच्यापुढे धनाढ्य अमिताभची सगळी दौलत फिकी वाटायला लागते. शिक्षकांचेही असेच आहे.

विद्यार्थी हीच शिक्षकांची खरी दौलत आणि या दौलतीपुढे जगातील कोणतीही दौलत फिकी पडायला लागते. म्हणूनच तर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कै विष्णू वाघ, आमदार संकल्प आमोणकर, प्राचार्य डॉ. मनोज कामत, सिनेकर्मी लक्ष्मीकांत शेटगावकर, प्रशांती तळपणकर, संजय शेट्ये यांसारखे गोव्याची विविध क्षेत्रे गाजविणारे माझे माजी विद्यार्थी पाहिले की माझी मान अभिमानाने उंच व्हायला लागते.

शिक्षक हा पेशा नसून ते व्रत आहे असे जे म्हटले जाते ते याच करता. शिक्षक हा शेवटपर्यंत शिक्षकच असतो आणि विद्यार्थ्यांशी असलेले त्याचे नाते हेही शेवटपर्यंत कायम असते. शिक्षक दिनाचा हाच तर खरा संदेश आहे!

यामुळेच शिक्षकाने स्वतःला फक्त शिकवण्यापुरते मर्यादित न ठेवत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे बघितले पाहिजे. यालाच खऱ्या अर्थी ‘घडवणे’ म्हणतात आणि हेच तर शिक्षकाचे ध्येय असायला हवे. पण आज अनेक शिक्षक या ध्येयापासून दूर जाताना दिसायला लागले आहेत.

चांगला पगार मिळत असल्यामुळे अनेक युवक युवती या पेशाकडे वळायला लागले आहेत. पण वेतन हे शिक्षकाचे ध्येय असूच शकत नाही; किंबहुना असू नये. आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करून मुलांना कसे विधायक शिकवायचे हा शिक्षकांचा मूळ हेतू असायला हवा. तो हेतू साध्य करायचा जर सर्व शिक्षकांनी आजच्या शिक्षक दिनी निर्धार केला तरच शिक्षक दिन खऱ्या अर्थी साजरा होऊ शकेल.

पूर्वी शिक्षकांना आदर्श मानायचे. आताच्या काही शिक्षकांच्या वागणुकीमुळे शिक्षकांची ही प्रतिमा समाजात थोडीफार मलिन व्हायला लागली आहे. म्हणूनच आजच्या शिक्षक दिनी ही प्रतिमा परत उंचावण्याचा प्रयत्न प्रत्येक शिक्षकाने करायला हवा. असे झाले तरच शिक्षक दिन विधायक दृष्टिकोनातून साजरा केल्याचे समाधान मिळू शकेल हे निश्चित!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT