Taleigao Village Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Taleigao: सफर गोव्याची! गर्द झाडी व घनदाट डोंगर; ताळगावचे गोड किस्से

Taleigao Village Goa: गोवा मुक्ती झाली, त्या वेळी दहा मी वर्षांचा होतो. श्रीराम विद्यालयात तिसरीत शिकत होतो. पोरताईश-मळा येथे पाच किमी शाळेत चालत जावं लागे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा मुक्ती झाली, त्या वेळी दहा मी वर्षांचा होतो. श्रीराम विद्यालयात तिसरीत शिकत होतो. पोरताईश-मळा येथे पाच किमी शाळेत चालत जावं लागे. चप्पल-बूट नव्हते. अनवाणी चालत जायचं. तक्रार करणार कुणाकडे? पाटी, काडी व कपड्याचं दप्तर. चार आण्यांची ३२ पानी वही. एक पाठ्यपुस्तक मराठी, दुसरं मोडी.

पुढच्या इयत्तेत गेल्यावर पुस्तके मार्केटात उपलब्ध नसल्याने पास झालेल्या विद्यार्थ्यांकडून विकत घ्यायचो. पेन्सिल मिळणं म्हणजे परमानंद, शाईचं पेन म्हणजे गगन. पालक वर्षातून एकदा प्रवेशावेळी शाळेत येत. मी कुठल्या इयत्तेत आहे, हे वडिलांना ठाऊक नसे. मार्कशीट दाखवल्यावर ते पार्कर शाईच्या पेनाने सही करायचे.

त्या पेनकडे मी विलक्षण कुतुहलाने बघत असे. मुसीदाद (स्काऊट) तुकडी आली तेव्हा आम्हाला गणवेष मिळाला. खाकी कालसांव, हिरवा शर्ट आणि त्यावर पोर्तुगीज चिन्ह असायचं. त्याकाळी म्हणजे मुक्तीआधी आणि नंतर ताळगावला जी ताजी भाजी आम्ही बागायतीत जाऊन आणली, त्याची विविधता, लज्जत हा आठवणींचा गोड साठा. तांबडी भाजी, भेंडी, वांगी... अनेक प्रकार मी आईला आणून देत असे. ‘बाबा, मुवॉ (मुळा) घे मरे, आई बोरी मूं’ अशी मायेने त्या विक्रेत्या आग्रह करत. असा हा मायेचा ओलावा त्याकाळी होता.

शेताभोवती गर्द झाडी व घनदाट डोंगर होते. हिंस्र श्वापदांची भीती होती. तांबड्या मातीवरून जाताना रात्री अपरात्री भुते-खेते नाचतात, आल्वांतीण असते, असे बरेच समज-गैरसमज होते. परामानसशास्त्र (पॅरासायकॉलॉजी) विषयावर भुते व तत्सम अज्ञात अदृश्य शक्तिसंदर्भात बंगळुरूत सखोल संशोधन सुरू आहे. एमबीबीएस केल्यानंतर मी सायकीयाट्री विषयात एमडी केली. रात्री-अपरात्री कुणी आजारी पडला तर सेवेसाठी, उपचारासाठी जावे लागे.

तांबडी मातीवरून जाताना नामस्मरण करत जा, असे सल्ले वयस्कांनी दिले होते. त्याचं पालन मी करत असे. कुत्रे स्कूटरपुढे भुंकून वैताग आणायचे. कालांतराने रात्री जाताना त्यांना बहुधा कळले, हा बीपी वगैरे तपासायला जात आहे. ते मिरवणुकीने रक्षकासारखे वेशीपर्यंत आवाज न करता यायचे.

स्कूलात असताना टिफिन, पाण्याची बाटली हे विषयच नव्हते. जाताना आम्ही मजा, गंमत म्हणून घोडागाडी, बैलगाडीचा वापर मागून चालकाच्या नकळत उडी मारून करत असू. पोटभर नाश्ता करून जायचं. खिशात दमडी नसायची. हॉटेल्सना ब्राह्मणी म्हणत. कधीकाळी चुकून त्यात आम्ही खायला गेलो, तर बारमध्ये गेल्याचा प्रमाद केल्यासारखी बोलणी बाबांकडून खावी लागत. नंतर आई पदरात घ्यायची.

मळ्यातील जत्रेसाठी आम्ही चालत जायचो. साखरेची बाहुली खायला मिळणं म्हणजे दिव्य. नाटकं बघून उशिरा घरी. आजही मी सकाळच्या वॉकला जाताना मित्रांना तेव्हाच्या ६५ वर्षांआधीच्या ताळगावचे अनेक किस्से सांगतो. रंगीत दृश्यांचा तो स्मृती-चित्रपट पाहताना बरं वाटतं.

-डॉ. ब्रह्मानंद कुंकळयेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT