Betim: सफर गोव्याची! डोंगर आणि नदी यांच्यामधील दुवा; निसर्गसंपन्न 'बेती'

Betim Village Goa: दर दिवशी शाळेत जाताना ही नदी ओलांडणे, शाळेतून कधी उदास होऊन तर कधी आनंदीत होऊन परतणे.... प्रत्येक दिवशीचे आकाश या नदीत प्रतिबिंबित होताना मी पाहिले आहे.
Betim Village Goa
Betim Village GoaDainik Gomantak
Published on
Updated on

बेती! जी नदी माझ्या गोव्याला आपल्या बाहूत कवटाळून आहे त्या नदीच्या काठावर माझे हे गाव नम्र होऊन उभे आहे.‌ माझ्या गावापासून पणजी शहर इतके जवळ आहे की मी त्याला जणू स्पर्श करू शकते, मी तिथे उडून जाऊ शकते.

माझ्या या गावाला स्वतःचा एक ताल आहे. धिम्या गतीचा, हळुवार ताल जो तिथल्या पाण्यात, मातीत आपली मुळे रोवून आहे. गावाच्या कडेने वाहणारी मांडवी आमच्यासाठी केवळ एक नदी नाही तर ती आमची जीवनरेषा आहे.‌

माझे वडील या नदीत मासेमारीसाठी जायचे.... त्यांचे प्रत्येक काम या नदीच्या संबंधित असायचे- बोटींची दुरुस्ती ते नाविक व्यवसायाशी जुळणारे दुकान चालवणे, वगैरे.

दर दिवशी शाळेत जाताना ही नदी ओलांडणे, शाळेतून कधी उदास होऊन तर कधी आनंदीत होऊन परतणे.... प्रत्येक दिवशीचे आकाश या नदीत प्रतिबिंबित होताना मी पाहिले आहे.

ज्याचा कुणाला अंदाज लागणार नाही असे एक आगळे हे माझे गाव आहे. जिथून प्रवास सुरू होतो किंवा संपतो, निदान माझा तरी, अशा बिंदूवर हे गाव आहे. गावाला वेटाळून असलेली इथली चढणीची वाट तांबड्या मातीच्या डोंगरावर घेऊन जाते. जुन्या शैलीची घरे गावातून नाहीशी होत असताना माझे घर मात्र अजून तसेच आहे- मातीचे आणि कौलारू. बाकी गाव आता काँक्रीटचे झाल्यातच जमा आहे.‌

उन्हाळ्याच्या सुट्टीत मी इथल्या पाण्यात पोहले आहे. या नदीत पकडलेला ''गालमो'' (छोटी कोळंबी) वाळवत घातला आहे.‌ प्रत्येक दिवशी या नदीने मला वेगळे दृश्य दाखवले आहे. बेती गावातून सुटत असलेल्या फेरीबोटीतून प्रवास करणे हे जणू माझ्यासाठी श्वास घेण्यासारखे असायचे.

या बेती गावाने मला शिक्षक बनवून घडवले आहे.‌ या गावात राहून मी पाण्याला समजू शकले, भरती ओहोटीला समजू शकले. पाण्यावर तरंगत येणारी मेलेली मासळी, मेलेली माणसे मी पाहिली आहेत.

पावसाळ्यात हेलकावे खाणाऱ्या फेरीबोटीला समुद्र आपल्याकडे खेचून घेताना मी अनुभवले आहे.‌ मात्र त्यातून कोणीतरी आपली सुटका करेल हा विश्वास मला नेहमीच असायचा. गाव मांडवीच्या काठावर असल्यामुळे ही नदी मला नेहमी आईसारखी वाटत राहिली आहे.‌ नारळी पौर्णिमेला वडिलांबरोबर जाऊन नदीला नारळ वाहणे हा वार्षिक रिवाज असायचा. या नदीच्या पाण्यात मी माझ्या आजीच्या अस्थी सोडल्या आहेत.‌

डोंगर आणि नदी यांच्यामध्ये असलेला माझा गाव या दोघांच्या मधील एक दुवा आहे. एकेकाळी माझे घर या डोंगराच्या पायथ्याशी दाट झाडीत वसलेले होते.

Betim Village Goa
Zambaulim: सफर गोव्याची! श्री दामोदरांचा आशीर्वाद लाभलेले, निसर्गसंपन्न 'जांबावली' गाव

मात्र आता ते काँक्रीटच्या जंगलाच्या मधोमध उभे आहे. त्यामुळे अलीकडील उन्हाळा असह्य बनलेला आहे.‌ एकेकाळी गावात वाऱ्याचा, लाटांचा आवाज गुंजायचा. मात्र गेल्या दहा-बारा वर्षात नदीतील कॅसिनोवरील गोंगाट गोंधळाचे आवाजाने हे आवाज नाहीसे करून टाकले आहेत. नदीतील स्वादिष्ट मासे दुर्मीळ बनले आहे.

हे सारे असले तरी अजूनही माझे माझ्या गावावर प्रेम आहे. ते माझे घर आहे. इथून मी कुठल्याही प्रवासाला निघू शकते. कुठूनही परतू शकते.

Betim Village Goa
Mandrem: सफर गोव्याची! शांततेचा, निवांतपणाचा आणि निसर्गाशी संवाद साधण्याचा अवकाश देणारं 'मांद्रे'

कधी काळचा तिथल्या पक्ष्यांचा चिवचिवाट, घराभोवती असलेली उंच झाडे, भाजायला ठेवलेल्या खेकड्यांचा वास, बोरांचा स्वाद, जवळचा झरा हे सारे माझ्या अजूनही स्मृतीत आहे.‌

गाव आता इतका वेगळा झाला आहे की मी माझ्या शेजाऱ्याला ओळखू शकत नाही कारण तो पूर्वी माझा शेजारी नव्हता. गाव आता नगर बनले आहे आणि काही काळाने कदाचित ते शहरही बनेल.‌

आसावरी कुलकर्णी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com