S L Bhyrappa Marathi literature Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

S L Bhyrappa: आत्मशोध घेणारा भारतीय लेखक 'एस. एल. भैरप्पा'

S L Bhyrappa Literature: ज्येष्ठ कादंबरीकार एस. एल. भैरप्पा यांचे मराठी साहित्यात येणं, ही मराठी साहित्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारी गोष्ट आहे. माझे आणि त्यांचे खूप छान व्यक्तिगत संबंध होते.

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ. अरुणा ढेरे

ज्येष्ठ कादंबरीकार एस. एल. भैरप्पा यांचे मराठी साहित्यात येणं, ही मराठी साहित्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारी गोष्ट आहे. माझे आणि त्यांचे खूप छान व्यक्तिगत संबंध होते. त्यांची ‘पर्व’ ही माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे. ते केवळ कन्नड लेखक होते, असे मी मानत नाही. मी त्यांना ‘भारतीय लेखक’ म्हणते. संपूर्ण भारतीय संस्कृती आणि भारतीय मूल्यधारणा उत्तम तऱ्हेने त्यांच्या कादंबऱ्यातून आपल्यापर्यंत पोचलेली आहे. म्हणूनच कोणत्याही भाषेत न अडकविता, त्यांना ‘भारतीय लेखक’ म्हणणे अधिक संयुक्तिक आहे.

भाषेच्या पलिकडे जाऊन संस्कृती काय गोष्ट आहे, याचा वेध त्यांनी आपल्या सगळ्याच कादंबऱ्यांमधून अनेक अंगांनी घेतला आहे. त्यांच्या कादंबऱ्यांमधील व्यक्तिरेखा, त्यात रेखाटलेले आयुष्य, त्यातील कुटुंबजीवन, एखाद्या कादंबरीमध्ये मांडलेला विषय हे सर्व भारतीय आहे. त्यांच्या लिखाणातील नातेसंबंध, ताणेबाणे, व्यक्तिजीवन उभी राहतात, ते सगळे भारतीय मूल्यधारणेवर आधारित आहे. भारतीय संस्कृती आणि मूल्यधारणा या सगळ्याचा वेध त्यांनी कादंबऱ्यांमधून घेतलेला दिसतो. त्यांनी साहित्याची विपुल निर्मिती केली आहे.

स्वत:चा शोध घेणारा लेखक

अनेकदा माणूस लिहित राहतो, तो केवळ सवयीने लेखक आहे, म्हणून लिहित राहतो. पण, दरवेळी तो एक पाऊल पुढे टाकतोच असे नाही. पण, भैरप्पा वेगळे आहेत. कारण, ते प्रत्येक कादंबरीतून दरवेळी स्वत:चा एक वेगळा शोध घेत गेले. त्याचबरोबरच संस्कृतीचे वेगळे अंग उजेडात आणत गेले आहेत. ‘पर्व’ ही मला स्वत:ला अतिशय आवडलेली आणि मला वाटलेली त्याची सर्वोत्तम कादंबरी आहे.

महाभारताचे आव्हान पेलणे ही सोपी गोष्ट नाही. पण, भैरप्पा यांनी ज्याप्रकारे संबंध महाभारताचा भूगोल, जीवन, त्याकाळातील समाजजीवन, त्याकाळातील हवामानासकट सगळा विषय, कोणती घटना कोठे घडलेली आहे, इतक्या तपशीलात जाऊन आणि त्याचा दांडगा अभ्यास करून कादंबरीची आखणी केली आहे. त्यांनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा आणि त्यातून निर्माण झालेली प्रतीके ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत काही वर्षांपूर्वी ‘महाभारत’ विषयावर व्याख्यानमाला आयोजित केली होती. त्यावेळी, मी त्यांच्या ‘पर्व’ कादंबरीवर बोलले होते. त्यानंतर भैरप्पा यांनी मला बंगळूरला एका परिषदेसाठी बोलाविले होते, त्यावेळी देखील मी ‘पर्व’ या कादंबरीवरच बोलले होते. काही महिन्यांपूर्वी लेखिका उमा विरूपाक्ष कुलकर्णी यांनी भैरप्पा यांची पुण्यात मुलाखत घेतली. भांडारकर संस्थेच्या सभागृहातच ही मुलाखत झाली. त्याहीवेळी नव्वदीच्या पुढे वय असूनही त्यांची स्मरणशक्ती अत्यंत तल्लख होती. पूर्णपणाने सहित्यप्रेमाने वाङमयाने अतिशय भारलेले असे ते लेखक होते.

वाचकांच्या प्रेमाचा सन्मान

‘‘मराठीशी आपले जवळचे संबंध आहेत,’’ असे ते स्वत: कायम सांगत. मराठी जगाने त्यांना खूप प्रेम दिले. मराठी वाचकांनी भैरप्पा यांना ज्या तऱ्हेचा प्रतिसाद दिला, त्याने ते खूप सुखावलेले होते. मराठी वाचकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे.

मराठी वाचकांच्या जगाने दिलेला हा सन्मान त्यांना खूप अपूर्वाईचा आणि आनंदाचा वाटला होता. त्यामुळे, इतक्या निर्मळपणाने मिळालेला प्रतिसादाचा त्यांनी तितक्याच आनंदाने स्वीकारला केला होता. ‘‘माझं मराठीशी वेगळं नातं आहे,’’ असे ते आवर्जून म्हणत.

मुळातच भाषेचे अडसर ओलांडून त्यांनी लिखाण केले. त्यांची संबंध प्रकृतीच लेखनामध्ये भाषेच्यापलीकडे जाणारी होती. त्यांच्या लिखाणाचा संस्कृतीशी, भारतीय मूल्यधारणेशी संबंध होता. त्यामुळेच त्यांचे लेखन हे बाकीचे कोणतेही अडथळे न येता सर्वदूर पोचू शकले.

भैरप्पा यांचे चाहते मराठीसह इतरही भाषांमध्ये, देशासह परदेशामध्येही होते. त्यांच्या एका-एका कादंबरीच्या २२-२२ आवृत्त्या निघालेल्या आहेत. लेखकांसाठी याहून आनंदाची गोष्ट दुसरी काय असू शकते?

सामान्य परिस्थितीतून येऊन अत्यंत कष्टपूर्वक स्वत:ला घडवत गेलेला माणूस, असे त्यांचे आयुष्य होते. त्यांचे आत्मचरित्र वाचले तर लक्षात येते, की स्वत:ला घडवत गेलेला हा माणूस आहे. त्यांच्या सगळ्या लेखामागे तत्त्वज्ञान, इतिहासाचा उत्तम अभ्यास हाच पाया आहे. अशा भक्कम पायावर त्यांच्या संपूर्ण लेखनाचा डोलारा उभा राहिलेला आहे. त्यांचे व्यक्तिमत्व नव्या लोकांना प्रतिसाद देणारे होते.

साहित्यातून मिळालेल्या मानधनाचा त्यांनी एक ट्रस्ट केला आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून नव्या लेखकांना साहाय्य मिळत राहो, अशी त्यांची इच्छा आहे. ही गोष्टदेखील खूप मोठी आहे. भविष्यातील लेखकांच्या पिढ्यांसाठी त्यांनी केलेला विचार आणि त्यातून उभा राहिलेला ट्रस्ट हे त्यांचे मोठेपण आणि त्यांचे वाङमय जगतावर असणाऱ्या प्रेमाचे लक्षण आहे.

लिखाणातील साधना

साधना हा शब्द केवळ परमार्थ क्षेत्रातील नाही. साहित्यात क्षेत्रातही साधना करताना दिसणारे लेखक हातावर मोजण्याइतकेच आहेत आणि त्यातील एक ‘भैरप्पा’. लिखाण करताना अभ्यास, साधना, चिंतन महत्त्वाचे असते. यामुळे बाहेरचे मोह सहज बाजूला ठेवता येतात आणि तात्पुरतेपणा, उथळपणा टाळता येतो.

भैरप्पा यांना लोकप्रियता काही कमी मिळालेली नाही. पण, लोकप्रियतेचे वजन काय आहे, हे स्वत:च्या लेखन समाधीत जाताना किंवा अभ्यासाच्या अंगाने त्यात बुडून जाताना त्यांच्या लक्षात आलेले होते. त्यामुळे त्या लोकप्रियतेचा परिणाम त्यांच्या लेखनावर झाला नाही, तो उथळपणा कधीच आला नाही. त्यासाठी, आवर्जून काहीतरी लेखन केले गेले, असेही कधी झाले नाही. त्यामुळे हेही याच पिढीचे वैशिष्ट्य आहे. ही माणसं आपल्यासमोर आहेत, त्यामुळे आपण काही करू शकतो. मुख्यत: आपला पिंड या सगळ्यांनी पोसलेला आहे.

अल्प परिचय

नाव : शांतेशिवरा लिंगान्नैया तथा एस. एल. भैरप्पा

जन्म : २० ऑगस्ट १९३१

निधन : २४ सप्टेंबर २०२५

व्यवसाय : लेखक, कादंबरीकार, प्राध्यापक

शैली : कल्पनारम्य, इतिहास

विषय : तत्त्वज्ञान, इतिहास, सौंदर्यशास्त्र

पुरस्कार

पद्मभूषण पुरस्कार (२०२३)

बेंद्रे राष्ट्रीय पुरस्कार

पद्मश्री (२०१६)

साहित्य अकादमी फेलोशिप (२०१५)

राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक पुरस्कार (२०१४)

‘मंद्र’ या कादंबरीसाठी बिर्ला फाउंडेशनचा सरस्वती सन्मान (२०११)

साहित्य अकादमी पुरस्कार (१९७५)

कर्नाटक राज्य पुरस्कार

कर्नाटक केंद्रीय विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट (२०२०)

नृपतुंगा पुरस्कार (२०१७)

श्री कृष्णदेवराय पुरस्कार (२०१७)

म्हैसूर विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट (२०१५)

बेटगेरी कृष्ण शर्मा पुरस्कार (२०१४)

वाग्विलासिनी पुरस्कार (दीनानाथ मेमोरियल फाउंडेशन, पुणे, २०१२)

नाडोजा पुरस्कार (२०११)

एनटीआर राष्ट्रीय साहित्य पुरस्कार (२००७)

गुलबर्गा विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट (२००७)

पंपा पुरस्कार (२००५)

अध्यक्ष, कनकपूर अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलन (१९९९)

कन्नड साहित्य अकादमी पुरस्कार (१९६६)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT