
SL Bhyrappa Passed Away: प्रसिद्ध कन्नड साहित्यिक आणि आधुनिक भारतीय साहित्यातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे लेखक संतेशिवरा लिंगणय्या भैरप्पा (S.L. Bhyrappa) यांचे मंगळवारी (23 सप्टेंबर) निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने भारतीय साहित्यातील एका युगाचा अंत झाला.
भैरप्पा यांना भारतातील (India) सर्वात लोकप्रिय कादंबरीकारांपैकी एक मानले जाते. त्यांच्या लिखाणातील विशिष्ट विषय, रचना आणि पात्रांच्या निर्मितीसाठी ते विशेष ओळखले जात होते. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचे हिंदी आणि मराठी भाषांमध्ये भाषांतर झाले. खासकरुन या दोन्ही भाषांमध्येही त्या प्रचंड लोकप्रिय ठरल्या. या कादंबऱ्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या (Best-Sellers) पुस्तकांच्या यादीतही होत्या. त्यांच्या लिखाणाने केवळ कन्नड साहित्यातच नाही, तर संपूर्ण भारतीय साहित्यविश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले.
भैरप्पा यांच्या लेखनाचा आवाका मोठा होता. त्यांचे लिखाण कोणत्याही एका विशिष्ट शैलीत (जसे की, नवोदय, नव्य, बंदाया किंवा दलित) बसणारे नव्हते. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये त्यांनी सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय आणि पौराणिक विषयांना अतिशय प्रभावीपणे मांडले. त्यांच्या अनेक प्रमुख साहित्यकृतींनी सार्वजनिक वाद आणि चर्चांना जन्म दिला, ज्यामुळे त्यांच्या कामाला मोठ्या प्रमाणात वाचक मिळाले आणि त्यावर सखोल विचारमंथनही झाले. एवढेच नाहीतर त्यांच्या निर्भीड विचारांनी अनेकदा समाजाला विचार करण्यास भागही पाडले.
तसेच, साहित्यविश्वातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले. 2010 मध्ये त्यांना सरस्वती सन्मान या सर्वोच्च साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 2015 मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली. याशिवाय, त्यांना दोन सर्वोच्च भारतीय नागरी सन्मानांनीही गौरवण्यात आले. 2016 मध्ये त्यांना पद्मश्री आणि त्यानंतर 2023 मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
भैरप्पा यांनी आपल्या लेखनातून भारतीय संस्कृती, इतिहास (History) आणि सामाजिक मूल्यांवर नेहमीच चिंतन केले. त्यांच्या निधनाने भारतीय साहित्याचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे विचार आणि साहित्य पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.