स्नेहा महांबरे
माणूस खूप बोलतो आणि ते हवेत विरून जाते, पण तेच जर अक्षरबद्ध (लिहिले किंवा मुद्रित) केले तर ते कालातीत होते. सर्व स्तरातील वाचकांपर्यंत ते पोहचते. कित्येकदा संकीर्तन, भजन-पूजन याही माध्यमातून ज्ञानगंगेचा ओघ काळ्याकुट्ट अज्ञान अंधकारापाशी येतो आणि सारे चित्र बदलते. याच संदर्भात आपणास येथे विचार करावयाचा आहे.
खन म्हणजे आत्मशोध!’ हे विधान एकदा वाचनात आले होते. विधान वाचल्यानंतर माझा विचार सुरू झाला. हा आत्मशोध लेखकाचा आहे की वाचकाचा आहे? एकदा लिहून संपले की तेथे लेखकाची त्या लेखनाशी असलेली नाळ तुटते. आणि ते लेखन समाजातील वाचकांपर्यंत येऊन पोहोचते, असाही एक प्रवाद आहे.
याविषयी विचार करीत असताना लेखक का लिहितो? वाचक का वाचतो? लिहिण्यामागचे प्रयोजन काय किंवा हेतू काय? हा प्रश्न मनात निर्माण होतो. काव्यशास्त्राचा अभ्यास करत असताना, ‘धर्म, अर्थ, काम, मोक्ष’ ही चार प्रयोजन आहेत वाचले होते; तसेच पुढे ‘काव्यप्रकाश’ या आपल्या ग्रंथात मम्मटाने तर, ‘काव्यं यशसे अर्थकृते व्यवहारविदे शिवेतरक्षतये सद्य:पर निवृरती कांता सम्मितयोपदेश युजे|’ अशी वैविध्यपूर्ण प्रयोजने सांगितलेली आहेत.
इंग्रजी म्हणीप्रमाणे पुलाखालून पाणी बरेच वाहून गेले, असे काहीसे असले तरीही ‘काप गेले आणि भोक राहिले’ या न्यायाप्रमाणे आजही यातील कोणते ना कोणते प्रयोजन लेखन-वाचन निर्मिती मागे असल्याचे सहजपणे लक्षात येते. खरे पाहता ‘साहित्य’ किंवा ‘वाङमय’ असे शब्द प्रयोग लेखनासाठी केले आहेत. ‘वाचामय ते वाङमय’ असे म्हटले आहे, तर ‘सहित तत्वाने युक्त ते साहित्य’ असेही म्हटले जाते. खरे पाहू जाता अक्षरबद्ध जे केले गेले तेच लेखन आहे. माणूस खूप बोलतो आणि ते हवेत विरून जाते, पण तेच जर अक्षरबद्ध (लिहिले किंवा मुद्रित) केले तर ते कालातीत होते.
सर्व स्तरातील वाचकांपर्यंत ते पोहचते. कित्येकदा संकीर्तन, भजन-पूजन याही माध्यमातून ज्ञानगंगेचा ओघ काळ्याकुट्ट अज्ञान अंधकारापाशी येतो आणि सारे चित्र बदलते. याच संदर्भात आपणास येथे विचार करावयाचा आहे. शिक्षणातून माणसात माणुसकी येते, चिरंतन मूल्यांचे संवर्धन होते आणि आपल्या जगण्याचा अर्थ लाभून अन्वयार्थ नीटपणे समजून घेता येतो. ज्ञान हे साऱ्या उन्नतीचा पाया आहे, राष्ट्राची शक्ती आहे, समतेचा मंत्र आहे हे गाडगेबाबा यांनी आपल्या कीर्तनांमधून आग्रहाने सांगितले होते.
व्यक्तीचा विकास समाजाची समृद्धी आणि राष्ट्राची प्रगती केवळ ज्ञानाच्या उपासनेतून होते, यावर गाडगेबाबांचा विश्वास होता. शिक्षण माणसाला डोळस बनवते, सजग करते आणि आत (अंतर्मनात) पाहायलाही शिकवते. बहुतांच्या जगाशी इथे जोडूनही देते, यावर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच ते जन समुदायाला एकत्रित करण्यासाठी कीर्तन करत असत. या कीर्तनाचे विषय मात्र लौकिक जीवनाशी बांधलेले असत. पारलौकिक जीवनापासून ते पूर्णतः अलिप्त होते. अडाणी, अशिक्षित समाजातले अपूर्णत्व कमी करून पूर्णत्व शोधून ज्ञानगंगा समजून देणारे गाडगेबाबा लोकशिक्षक होते.
कीर्तनाच्या जोडीने भजन परंपराही माणसाच्या मनावर संस्कार करणारी आहे. यासाठी आपल्याला आठवण होते ती श्री. तुकडोजी महाराज यांची. लोकांची, ग्रामीण जनतेची सेवा हा त्यांचा एक ध्यास होता. यासाठी लोकांमध्ये सद्भावना जागृत करण्याचे काम ‘भजन’ या माध्यमातून त्यांनी सुरू केले. तुकडोजी महाराजांच्या भजनामुळे त्या काळात गावोगावी चालणारे तमाशा आणि द्व्यर्थी गाणी मात्र बंद झाली.
गाडगेबाबांच्यापेक्षा वेगळेपणा इथे दिसून येतो, तो म्हणजे तुकडोजींच्या मनात परमेश्वराविषयी पूर्ण श्रद्धा होती. हा परमेश्वर त्यांना अर्धपोटी राहणाऱ्या अज्ञान, दारिद्र्य आणि आळस यांच्या पाशात सापडून अगतिक झालेल्या आपल्या अगणित दीन-दलित देश बांधवात दिसत होता, म्हणूनच तुकडोजींनी आपली वाणी, लेखणी, शक्ती आणि भक्ती यांचे सामर्थ्य एकवटून सामाजिक जागृतीचे आणि प्रगतीचे वेळोवेळी प्रयत्न केले. आपल्या भारतातील खेडी म्हणजेच खेड्यात राहणारे लोक जागे व्हावेत.
अज्ञानामुळे त्यांच्या जीवनाला आलेली अवकळा नाहीशी होणे आवश्यक आहे. हे लक्षात आल्यावर त्यांनी माणसाच्या आयुष्यात वेगवेगळ्या सुधारणा करण्यास सुरुवात केली. नव्या सुखी जीवनाची स्वप्ने त्यांनी पहावीत मरगळलेल्या जीवनात नवचैतन्य निर्माण व्हावे आणि प्रत्येकाने एक दुसऱ्याच्या उपयोगी पडावे हा त्यांचा ध्यास होता. सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने आपला देश शिक्षण, आरोग्य, धनधान्य याबाबत वैभवशील व्हावा म्हणून तुकडोजी महाराजांनी अनेक प्रयत्न सुरू केले.
श्रोत्यांना मुग्ध करणाऱ्या खंजिरी वाद्यावर भजने गायिली. खेड्याचे जीवन आमुलाग्र बदलावे यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केले. सणासमारंभात भाषणे केली. जेणेकरून बहुजन समाजाने आपलं जीवन अंतर्बाह्य बदलले पाहिजे, हाच त्यांचा विचार होता. आणि यामधूनच त्यांनी ‘ग्रामगीता’ हे एक उत्तम काव्य लिहिले. तात्पर्य शिक्षण हे फक्त पुस्तकातून दिले जाते असे नव्हे तर त्याची माध्यमे ही स्थल काल परत्वे वेगवेगळी असू शकतात, हे लक्षात आणून देण्यासाठी हा काहीसा वेगळा लेखन प्रपंच!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.