Ravi Naik Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Ravi Naik: रवि नाईक 'गुन्हेगारांना संभाळावे लागते' हे खोटं ठरवणारा 'गुन्हेगारांचा कर्दनकाळ' - संपादकीय

Ravi Naik Death: राजकारणात दिखावा नव्हता, गावरान सचोटी होती. रवि यांनी कधी स्वतःला नेता मानले नाही, तर जनतेचा प्रतिनिधी म्हणून जगले. शेवटच्या काळातही त्यांनी भाषणात मिश्किल शैली सोडली नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

नाईक या आडनावातच नायक हा अर्थ आणि रवि या नावातच जग प्रकाशमान करून टाकणारी सर्वदूर व्याप्ती आहे. हयात असताना भोवती प्रेमळांची गर्दी आणि निर्वाणानंतरही पूर्ण गोवा त्यांच्याकडेच लोटला. ‘गुन्हेगारांना संभाळावे लागते’ हे विधान खोटे ठरवणारा हा खरा गुन्हेगारांचा कर्दनकाळ. मुख्यमंत्री, गृहमंत्री या पदांना सन्माननीय अर्थ देणारा नेता.

असताना आधार आणि गेल्यानंतर निराधार वाटावे अशी जनसामान्यांची अवस्था करणारा हमसफर. राज्यकर्ता, विनाकारण गंभीर किंवा उन्मादी जाणवतो; पण याला छेद देत मिश्किलपणे जगणारे माणूसपण म्हणजे रवि नाईक! राजकीय साधेपणा दिखाऊ आणि स्वयंभू अशा दोन प्रकारचा असतो. पण, आहे तसा दिसणारा साधेपणा त्यांच्यात होता. तेच रवितेज होते.

ते तेजाळलेले पर्व अस्तंगताला पावले असले तरी त्याची लाली कार्यक्षितिजावर कायम राहील. सागराच्या क्षितिज टोकाशी मावळतीचा सूर्यही देखणा दिसावा, तद्वतच बहुजनांच्या डोळ्यात दाटलेल्या महासागराच्या तटावर रविंचा अस्त भारदस्त व प्रत्येकाचा आप्त गेल्याचे दु:ख व्यक्त करणारा होता.

गरीब घराण्यात जन्मलेला, लौकिकार्थाने फारसा न शिकलेला तरुण राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत कशी झेप घेऊ शकतो, याचे स्तिमित करणारे रवि नाईक हे उदाहरण. पन्नास वर्षांच्या राजकीय मुशाफिरीत शिक्षण, रोजगार, कला-संस्कृती, क्रीडा क्षेत्रांतील अतुलनीय योगदान अनेक पदवीप्राप्त उच्चशिक्षितांनाही मान खाली घालावयास लावणारे होते. ‘जनमत कौला’वेळी गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्वाचा केलेला पुरस्कार व विलीनीकरणाला केलेला विरोध त्यांच्या निस्सीम गोवाप्रेमाची साक्ष आहे.

भाऊसाहेब बांदोडकरांच्या पश्‍चात गोव्याचा खऱ्या अर्थाने ‘नेता’ रवि ठरले. केवळ बहुजनांचा नेते म्हटल्यास तो त्यांच्यावर अन्याय ठरेल. भाऊसाहेबांनी कुळ-मुंडकारांना न्याय देण्यासाठी कायदे आणले, त्या विरोधात कोर्टात दिलेले आव्हान भेदण्याचे महत्कार्य रविंनी केले. पिचलेल्या समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा कालातीत आहे. राजकारणात अपयश कुणाला चुकलेले नाही.

दोनदा मुख्यमंत्री झालेल्या रविंना २०१२मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. पण ते खचले नाहीत. धाडस व निर्णयक्षमता हे त्यांची बलस्थाने. मुळात खेळाडू असल्यामुळे पराजयाची त्यांना भीती नसे. तरुणपणात राज्यस्तरीय व्हॉलिबॉलपटू म्हणून ते नावाजले होते. पुढे ते निवडूनच आले नाहीत तर भाजपला त्यांना मंत्रिमंडळात मानाने सामावून घ्यावे लागले. रविंनी न बोलता बरेच प्रतिडावही खेळले. पर्रीकरही राजकीयदृष्ट्या त्यांच्यापासून सावध असत.

रवि हे खरे सेक्युलर. त्यांनी धर्माचे अवडंबर माजवले नाही. जातीपातीचे राजकारण केले नाही; पण भंडारी समाजाला ते कधी विसरले नाहीत. त्यांनी व मधू नाईक यांनी खऱ्या अर्थाने भंडारी समाजाला आत्मभान, राजकीय स्थान व मान मिळवून दिला. राजकीय वैऱ्यांनाही ज्ञातीच्या बळावर रवि काहीही करू शकतील, अशी सुप्त भीती कायम राहिली.

खरा नेता कोण तर तो जिथे उभा राहील तेथे त्याच्या भोवताली किमान पन्नास लोक जमतील. ती किमया रवि यांच्याकडे होती. कारकिर्दीमधील पहिल्या टप्प्यातील झंझावात अखेरीला उरला नव्हता. प्रकृती साथ देत नव्हती; लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिपदावरून रविंना दूर केले जाईल, अशा कंड्या पिकल्यावर रविंनी देव रुद्रेश्‍वराचा रथ बाहेर काढला. भंडारी नेते एकत्र आले. त्यात रवि पुढे कुठेच नव्हते. पण, सरकारला जायचा तो ‘संदेश’ गेला, रविंचे आसन मजबूत झाले. रवि नेहमी आब राखून राजकारणात सक्रिय राहिले.

त्यात प्रतिष्ठा, अस्मिता होती. गोवा, भंडारी समाजाशी प्रतारणा करणार नाही; कधी हुजरेगिरी करणार नाही, हा त्यांचा बाणा. व्यासपीठावर अमित शहा असोत वा मोदी. आपल्याला हवे ते भाषण करताना त्यांनी तमा बाळगली नाही. म्हणूनच बांदोडकर, पर्रीकरांच्या रांगेत रविंचे नाव आदराने घेतले जाईल. स्वत:च्या हिकमतीवर ते मिळवलेले स्थान आहे. पक्ष, संघटनांचे लेबल फिजूल आहे. ‘पात्रांव’ म्हणून ओळख मिळवणाऱ्या या नेत्याचा जीवनप्रवास चढ-उतारांनी भारलेला राहिला. पण साधेपणा, निर्धार आणि जनसामान्यांसोबतचे नाते त्यांनी तुटू दिले नाही.

रवि कधी मंत्रिपदाच्या वैभवाने दीपले नाहीत, तर विरोधकांच्या टीकेने खचले नाहीत. गृहखात्याची धुरा सांभाळताना ‘कर्दनकाळ’ लौकिक अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावा. कोकणी आंदोलनावेळी बरीच जाळपोळ झाली होती. मडगावात घाबरून लोक दुकाने उघडत नव्हते. रवि तेव्हा साधे आमदार होते.

काही सहकाऱ्यांच्या विनंतीवरून त्यांनी मडगावातून पायी एक फेरी मारली, त्याबरोबर लोकांना धैर्य आले, दुकाने उघडली. जनतेशी संवाद साधताना त्यांचा चेहरा कायम मिश्कील, माणुसकीने ओथंबलेला असे. ‘इमेज बिल्डिंग’ कधी त्यांनी केली नाही. त्यात ते कमी पडले. चांगल्या लोकांना घेऊन राजकारण पुढे नेण्यात ते जरा कमी पडले, हेदेखील मान्य करावे लागेल. अन्यथा रविंनी राजकीय साम्राज्य घडवले असते.

एखाद्या चौकात चहाचा कप घेऊन थांबणारे, गावकुसात लग्नसमारंभाला हजेरी लावून हसतखेळत गप्पा मारणारे व्यक्तिमत्त्व हीच त्यांची ताकद होती. राजकारणात दिखावा नव्हता, गावरान सचोटी होती. रवि यांनी कधी स्वतःला नेता मानले नाही, तर जनतेचा प्रतिनिधी म्हणून जगले. शेवटच्या काळातही त्यांनी भाषणात खुमासदार शैली सोडली नाही. अखेरीला त्यांच्या ओठांवरचे हलके हसू आणि डोळ्यांतली शांत चमक भरभरून जगल्याची साक्ष द्यायची.

गोव्याच्या राजकारणात अनेक नेते येतील-जातील; पण साधेपणा, सुसंवाद आणि संघर्षातून उभे राहणाऱ्या ‘पात्रांव’सारखी कहाणी पुन्हा जन्म घेणे अवघड आहे. रवि यांच्‍या निधनाने भंडारी समाजातील एक महत्‍वाचा दुवा, चेहरा अस्‍तंगत पावला आहे. समाजातील नेत्‍यांनी एकसंध राहावे, अशी त्‍यांची अपेक्षा फळाला आल्‍यासच राजकीय दबावाची मुत्‍सद्दी कायम राहील. अर्थात हे येणारा काळच ठरवेल. आज रवि हयात नाहीत; पण त्यांच्या शब्दांतले ठसके, कर्तृत्व दरारा, आपुलकीची थाप आणि त्यांच्या हसण्यातली सहजता गोमंतकाच्या आठवणीत कायम राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT