Parra Dussehra Festival Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Parra Dussehra 2025: वीरश्रीची प्रचिती आणणारा, विधी-परंपरांचा आविष्कार उत्स्फूर्तपणे घडवणारा 'पर्ये गावचा दसरा'

Goa Dussehra: कधीकाळी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडणारा चोर्ला घाट मार्ग पर्येतून जात असल्याने इथल्या देवदेवतांच्या मूर्तींतून आणि उत्सवांच्या परंपरांतून विविधांगी पैलूचे दर्शन घडते.

राजेंद्र केरकर

सत्तरीतील पर्ये हा वाळवंटी किनारी वसलेला आणि इतिहास, संस्कृतीचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा लाभलेला गाव आहे. आश्विन नवरात्रीच्या शेवटी येणार्‍या दसर्‍याच्या उत्सवामुळे त्याच्या विविधांगी पैलूंचे दर्शन घडते.

कधीकाळी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडणारा चोर्ला घाट मार्ग पर्येतून जात असल्याने इथल्या देवदेवतांच्या मूर्तींतून आणि उत्सवांच्या परंपरांतून विविधांगी पैलूचे दर्शन घडते. ‘सतशेची भूमिका’ या नावाने इथले मुख्य मंदिर जेथे ओळखले जात आहे, तेथील गर्भगृहात सप्तमातृकांच्या पाषाणी मूर्ती आणि धातूचे बारा पवित्र कलश भाविक भक्तांसाठी वंदनीय आहेत.

सांतेर, जोगेश्वरी, बाह्मणी, केळबाय, पांजणमाया, माउली आणि म्हाळसा या सात मातृदेवतांच्या गर्भगृहात असलेल्या सात पाषाणी मूर्ती पुजास्थानी आहेत.

भूमिकेच्या गार्‍हाण्यात ‘साठा सत्तरीची तू देवी’ असा येणारा उल्लेख खरे तर एकेकाळी या देवतेचा सत्तरी आणि परिसरातल्या १३० गावांशी असणारे अनुबंध अधोरेखित करतो. आजच्या घडीस महसूल दफ्तरातील नोंदीनुसार सत्तरीत ८४ गावांचा समावेश आहे. उर्वरित ४६ गावे डिचोली, धारबांदोडा, फोंडा या गोव्यातल्या तालुक्यांतील, तसेच महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग आणि कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील आहेत.

सत्तरीतील काही गावे आज विस्मृतीत गेलेली आहेत. शृंगारपूर सोडले आणि पर्ये स्थळ जोडले या गार्‍हाण्यात येणारा संदर्भ महाराष्ट्रातल्या रत्नागिरीजवळ असलेल्या संगमेश्वर येथील शृंगारपूरची आठवण करून देतो. पर्ये गावातल्या बेलवाडयावर असणारे रवळोबाचे म्हणजे रवळनाथाचे मंदिर विजयादशमी म्हणजे दसर्‍याचे मुख्य केंद्र आहे.

रवळनाथ हे लोकदैवत गोवा कोकणातल्या दसर्‍याच्या उत्सवाशी प्रामुख्याने संबंधित आहे. कधीकाळी वाळवंटी नदीच्या उजव्या काठावरती वसलेले मंदिर देवराईत वसलेले असावे. आज फणस आणि कळम हे वृक्षच गत हिरव्या वैभवाची स्मृती जागवत आहेत.

धाटवाडा येथे कोंबड्याचा बळी दिल्यावर त्या रक्ताने माखलेले शिताचा चरू चोहोबाजूना शिंपडला जातो आणि त्यानंतर म्हाळसेकर वाड्यावरचा म्हाळसा देवीचा कळस मिरवणुकीत केळबायच्या मंदिराशेजारी असणार्‍या वाळवंटी नदी किनारी आणून, तो स्वच्छ धुतल्यावर त्यात नदीतले वाहते पाणी भरून तेथे त्याची विधिवत पूजा करून सर्वांच्या कल्याणासाठी गार्‍हाणे घातले जाते. त्यानंतर तो कळस वाजत गाजत नेऊन पुन्हा म्हाळसा मंदिरात स्थापन केला जातो.

पूर्वीच्या काळी म्हाळसा देवीचे पूजन धातूच्या पवित्र कलशाने केले जायचे. १९८९साली या मंदिरात म्हाळसा देवी म्हणून अष्टभुजा महिषारसुर मर्दिनीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.

गोवाभर विखुरलेली राणे सरदेसाई कुटुंबे नवरात्रीच्या उत्सवादरम्यान म्हाळसेचे दर्शन घेण्यासाठी इथे येतात. महानवमीच्या दिवशी रवळनाथाच्या मंदिरात रवळोबा म्हणजे रवळनाथ आणि भूतोबा म्हणजे भूतनाथ यांच्या पंजाच्या प्रतिकृती, तर पावणाईचा मुखवटा असलेली तीन तरंगे साडींद्वारे परंपरागत पद्धतीने सजवली जातात. रवळनाथाच्या मंदिरात त्रिशूळ डमरू खङ्ग आणि रक्तपात्र धारण केलेली

चतुर्हस्त रवळनाथ मूर्ती असून भूतनाथ आणि पावणाईची मूर्ती तेथे नाही. पारंपरिक ढोलवादनाच्या लोकसंगीताचे सूर निनादू लागल्यावर रवळनाथ मंदिराचा सारा परिसर भारावून जातो.

जुन्या काळी एकदा दसर्‍याच्या उत्सवात चक्क मंदिराशी संबंधित एका भाविकाने प्रतिकूल परिस्थितीत खंजीर हाती घेऊन पोटातली आतडी काढून म्हणे आपले बलिदान केले .त्या आत्मबलिदानाची आठवण म्हणून दसर्‍याच्या तंरगोत्सवात खंजीर आणि काठीला देवतुल्य स्थान आहे.

पर्ये गावची भूमिका आज साठासतरीची अधिष्ठात्री देवता म्हणून गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या तिच्या भाविकांत वंदनीय आहे. रवळनाथाच्या दसर्‍याची तरंगे ढोलवादनाच्या निनादात भाविकांना पहिल्या दिवशी कौल प्रसाद देण्यासाठी भूमिका मंदिरात, तर उर्वरित चार दिवस रवळनाथ मंदिरात उपलब्ध असतात.

भूताखेतांची त्याचप्रमाणे अन्य अतृप्त आत्म्यांची वक्रदृष्टी होऊ नये यासाठी गोवा, कोकणात रवळनाथाचा दसरोत्सव पारंपरिक विधींद्वारे साजरा केला जातो. पर्ये गावाला शेकडो वर्षांचा इतिहास लाभला आहे.

सतशेची भूमिका मध्ययुगात नावारूपाला आलेल्या साखळी बाजारपेठेची सप्तशती भूमिका म्हणून वंदनीय आहे. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांत विखुरलेल्या भाविकांनी पर्येच्या भूमिकेला तिन्ही राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा मानले आहे.

घाट माथ्यावरती असलेल्या कणकुंबी गावातल्या माउली देवीची जत्रा, जेव्हा गुरू मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा दर बारा वर्षांनी भरते. या जत्रेस गुळम, कोदाळ, चिगुळे, गुंजी व अन्य अशा सात गावांतल्या भगिनीरूपी देवींच्या आणि चंदगड येथील बंधुस्वरूप रवळनाथ देवाच्या पालख्या कणकुंबी आणि चिगुळे या दोन्ही गावांच्या सीमेवरच्या वण्ड्यार येथे भेटीला यायच्या. त्यात सात भगिनींपैकी पर्येच्या भूमिकेला ही स्थान आहे.

कधीकाळी पर्ये गावात आदिम जमातीशी नाते सांगणार्‍या मेशेचे वास्तव्य होते. आज इथे स्थायिक झालेल्या समाजांनी षड्यंत्र रचून त्यांचे समूळ उच्चाटन करून पर्येत आपले बस्तान मांडलेले आहे.

दरवर्षी पर्येत होणार्‍या शिगमा आणि दसरा या उत्सवांच्यावेळी जे विधी केले जातात त्यातून मेशे जमातीच्या हत्याकांडाच्या कटू स्मृती जागृत होतात. दसर्‍याचा सण खरे तर मान्सूनच्या पावसाळ्याच्या समाप्तीनंतर येत असल्याने त्या दिवशी देवतांच्या तरंगांच्या मिरवणुकीत सहभागी होऊन आगामी युद्धाच्या मोहिमांसाठी सीमोल्लंघन करण्यास लढवय्ये सिद्ध व्हायचे.

सत्तरीतल्या कष्टकरी समाजाने पंचवीसपेक्षा जास्त वेळा जी पोर्तुगीज सत्तेच्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध बंडे केली त्यावेळी ही मंडळी पर्येच्या दसर्‍याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आवर्जून यायची आणि भूमिका देवीचे आशीर्वचन धारण करून निर्भयपणे शत्रूविरुद्ध लढण्यास सिद्ध व्हायची.

पर्ये गावचा रवळनाथ मंदिरातला दसरोत्सव वीरश्रीची प्रचिती आणण्याबरोबर विधी, परंपरांचा आविष्कार उत्स्फूर्तपणे घडवत असतो. सण, उत्सवांतल्या इतिहास आणि संस्कृतीच्या अनुबंधांची वीण घट्ट राहिली तरच नव्या पिढीला इथल्या गतवैभवाची प्रचिती येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Government Advisory on Cough Syrup: '2 वर्षांखालील मुलांना 'कफ सिरप' देऊ नका!' मृत्यूतांडवानंतर आरोग्य मंत्रालयाकडून सर्व राज्यांना महत्त्वाची सूचना

Horoscope: धनलाभ, नोकरी आणि यश! शुक्र-केतू युतीचा 'या' 3 राशींना मोठा फायदा; दिवाळीपूर्वीच चमकेल नशीब

मोपावरुन पहिल्यांदाच 'अंटार्क्टिका'कडे झेपावले मालवाहू विमान, वेगाने हाणार रसद पुरवठा

Sindhudurg Shiroda Beach: शिरोडा- वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले, चौघांचा वाचवण्यात यश

"पाकिस्तानचा खात्मा करू, आता संयम दाखवणार नाही" लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकला इशारा Video

SCROLL FOR NEXT