मधू य.ना. गावकर
जंगलातील वन्यप्राणी माणसाचा रस्ता गाठेपर्यंत रमत गमत जातात, आणि मानवीय रस्ता जवळ आला म्हणजे तो पार करताना थबकत, बिचकत, अस्वस्थ होत पावले उंचावून माणसाचा कानोसा घेत झाडांच्या आडोशाने रस्ता पार करून लगबगीने पसार होतात आणि सुरक्षित ठिकाण गाठतात, रस्त्यांच्या कडेला हिरवाईचे गवत खाणारे ससे मात्र गोंधळून जात इकडे तिकडे धावतात, कोल्हे रस्ता पार करताना बिचकतात.
सूर्य अस्तास जाऊन सांज झाल्यावर जंगलातील जनावरे पाणी पिण्यास वाहणारी नदी ओहळाच्या काठाकडे आपला मोर्चा वळवतात, संधीचा फायदा घेऊन शिकार करण्यास पट्टेरी वाघ, अगर बिबटा दबा धरून नदी काठच्या परिसरात बसतात. मात्र, हा प्रकार तृणहारी जनावरांना माहीत असतो, म्हणून ते पाणी पिण्यास जाताना सावधपणा बाळगतात. तरीही कधीतरी त्यांचा बळी जातो आणि जंगलाचे रक्षण करणाऱ्यांचे पोट भरत, सशाला भित्रा ही पदवी दिली आहे, तो ढोलीतून बाहेर येऊन दोन पायावर बसून आपले कान खाजवतो.
नंतर दोन, चार उड्या मारून गवत खाण्यास अगर पाणी पिण्यास सावधपणे जातो. गवत खाताना बेडकाने जरी उडी मारली तर तो भिऊन पळतो, सांज निघून काळोख पडताच जंगल शांत होत असले तरी रातकिड्यांचा आवाज कानी घुमतो. रात्री पसरलेल्या चंद्र-चांदण्यांच्या प्रकाशात वाहणाऱ्या नदीचा रूपेरी पट्टा चमकत असतो. काजव्यांच्या दिव्यांनी उजळून निघणारे जंगल त्या प्रकाशाची सुंदरता वाढवते, रात्री जंगलातून प्रवास करताना आकाशाकडे पाहिल्यास चंद्राच्या उजेडात चांदण्या दूर गेल्याचा भास होतो.
झाडाच्या ढोलीत बसलेले घुबड आर्त आवाज देत परिसरातील पक्षी प्राण्यांना जाग आणते. डोळे मिटून झाडावर झोपलेला मोर पंख फडकविल्याने फांदी हलते, झाडाच्या मधून चांदण्यांचा प्रकाश जमिनीवरील सावलीवर पडल्याने पिठोरी उजेडाच्या रांगोळ्या पहावयास मिळतात, रातकिड्यांच्या आवाजाची सवय नसल्याने जंगलात फिरताना भयाण स्मशानात असल्यासारखे वाटते.
झुडपांचा आवाज देत कोल्हा पायवाटेवर येऊन दबकत चालतो, जाताना तो जमीन हुंगून हिंस्र जनावरांच्या ठावठिकाणाचा शोध घेत जाताना पायाखालची काटकी जरी मोडली तरी भेदरून फुलवलेली शेपटी पायात घालून चालत असतो. शांत परिसरात पोचल्यावर आकाशाकडे तोंड करून कुई करीत रडल्याने दूरवर असलेले इतर साथीदारही आपले स्वर काढून त्याला साथ देतात. दिवसभराच्या उष्णतेने सगळी रानटी जनावरे तहानेने व्याकूळ झालेली असतात, नदीचे पाणी हेच त्यांचे जीवन.
सूर्य अस्तास गेल्यावर दिसणाऱ्या उजेडात आपापल्या ठिकाणाकडून मोडलेले अंग मोकळे करण्यासाठी बाहेर पडून हळूहळू नदीकाठी येतात, उन्हाने तापून गेलेली जमीन पावसाच्या सरींनी फुलून मऊ होते. तिच्या सुगंधाने वेडावलेले सरपटणारे प्राणी फुस्स करून आवाज देत मातीला अंग घाशीत जाताना त्यांचे काळे, पिवळे, तपकीरी अंग चांदण्याच्या प्रकाशाने चकाकते. ते सरपटत जाताना त्यांच्या अंगाची वळणाची हालचाल दिसते, फणा उभारून साप हिरव्या गवतात थंडाव्यासाठी लपलेल्या बेडकांचा मागोवा घेतो आणि त्यावर झडप घालून बेडकाची शिकार करतो.
झाडावर बसणाऱ्या पक्ष्यांची पिल्ले अंडी, वटवाघूळ खाण्यास ते झाडावर चढतात आणि भक्ष्य मिळवण्याचे प्रयत्न करतात, एखाद्या झाडाच्या ढोलीत घुबड बसलेले असते, त्या उंच झाडावर वटवाघळे झाडाच्या फांद्याना झोपाळ्याप्रमाणे लोंबकळत असतात. त्यांना पकडण्यास साप जातो, त्या सापावर हल्ला करण्यास घुबड ढोलीतून बाहेर येऊन पंख फडकावीत सापावर झेप घेते, त्या आवाजाने वटवाघळे सावध होऊन चित्कार करीत चारही दिशांना सैरावैरा उडून जातात.
मात्र, झाडावर शिकारीसाठी चढलेला साप उडालले घुबड पाहून भीतीच्या आकांताने उडी मारून झुडपात सुरक्षित स्थळी बाणाच्या वेगाने पळतो. उंबराची पिकलेली फळे वटवाघळांचे आवडते खाद्य, पिकलेल्या फळावर ते रात्रीचे तुटून पडतात, ती खाताना फळे खाली पडतात, त्या झाडावर माकड आरामात झोपतात, पण वटवाघळांच्या आवाजाने माकडे जागी होऊन चित्कारत भिऊन उड्या मारून दुसऱ्या झाडावर जातात, त्या धावपळीत वटवाघळांचा जमावही दुसऱ्या ठिकाणी पळतो.
पिठूळ चांदण्याची रात्र उलटली तरी त्या मुक्या प्राण्यांची भूक शमत नसते. दोन भेकरे त्या झाडाखाली दबकत आली आणि पडलेली फळे खाऊन भूक भागवू लागली. फळे खाताना त्यांच्या कानी कसला तरी आवाज आला, ती बिथरली, आणि शेपट्या वर करून धूम ठोकली, क्षणात ती दिसेनाशी झाली. काहीवेळाने तिथे वाळलेल्या झाडाच्या आकृतीची शिंगे असलेला नर-मेरू आला, माजलेल्या बैलासारखा त्याचा देह होता, चांदण्यांच्या प्रकाशात त्याची तपकिरी कातडी चकाकत होती.
तो उंबराची फळे वेचून खाऊ लागला आणि काही वेळाने पाच सहा माद्या त्या ठिकाणी येऊन निर्धास्तपणे फळे खाऊ लागल्या. खालेल्ल्या फळांनी त्यांच्या घशाची कोरड वाढत होती, नराचे लक्ष खाण्यात नव्हते, तो एक, एक फळ खात क्षणाक्षणात मान वर करून आजूबाजूला शत्रूचा हल्ला होईल काय, याचा अंदाज घेत तो आपल्या माद्यांकडे पाहत होता. ते सर्वजण त्या ठिकाणी रमत असता अचानक नर वटारून नाकपूड्या रुंदावत मान वर करून तो वास घेऊ लागला.
त्याच्या टपोऱ्या डोळ्यांत भीती दिसू लागली त्याने माद्याही भयभीत होऊन सावध झाल्या. काही क्षणात नराने मॅक आवाज काढला आणि साऱ्यांनी धूम ठोकली, थोड्या अंतराचे जंगल कापून त्याची भीती कमी झाली, मेरवाचा जमाव पळताच काही वेळाने एक बिबटा त्या उंबराच्या खाली आला आणि झाडाखाली वर्तुळाने जमीन हुंगू लागला, त्याचे किळसवाणे तोंड उंचावून तो वास घेत होता, त्याच्या अंगावरील केसात काळे ठिबके चांदण्या प्रकाशात बेसूर दिसत होते, पुढचे पाय फाकडे लांब आणि मागचे आखूड दिसत होते, खुरडत, फेंगडत चालीने तो उंबराची फले हुंगू लागला, कारण मेरू माद्यांच्या ताज्या विष्ठेचा वास त्याच्या नाकात जात होता.
त्या विष्ठेचा वास परत घेऊन तो त्या मेरू कळपांच्या दिशेने जंगलात गेला. रात्र संपून पौर्णिमेचा चंद्र क्षितिजाकडे झुकला होता, हळूहळू धुरासारखी धुक्याची चादर हिरव्या जंगलावर फैलाऊ लागली, जंगलातील उताराने चिंचोळ्या वाटेने एक डुक्कर मादी आपल्या आठ दहा पिल्लांना घेऊन खाली येत होती, तिने पावसाच्या ओलाव्याने उगवलेले रान सुरणाचे कोंब खाऊन तहान लागल्याने पाण्यासाठी नदीकडे जात असावी, वाटेत मिळेल ते तोंडाने चाचपडत ती डुलक्या चालीने मार्गक्रमण करीत होती, मागून तिची पिल्ले ओरडत तिला गाठण्याचा प्रयत्न करीत डौलाने पळत होती.
जंगलातील वन्यप्राणी माणसाचा रस्ता गाठेपर्यंत रमत गमत जातात, आणि मानवीय रस्ता जवळ आला म्हणजे तो पार करताना थबकत, बिचकत, अस्वस्थ होत पावले उंचावून माणसाचा कानोसा घेत झाडांच्या आडोशाने रस्ता पार करून लगबगीने पसार होतात आणि सुरक्षित ठिकाण गाठतात, रस्त्यांच्या कडेला हिरवाईचे गवत खाणारे ससे मात्र गोंधळून जात इकडे तिकडे धावतात, कोल्हे रस्ता पार करताना बिचकतात.
चितळे उड्या मारून क्षणात पसार होतात, डुक्करे रस्ता पार करताना बराचवेळ निरखून पाहतात, त्यांची पिल्ले एकामागून एक सरळ रेषेत जातात, काही वन्य प्राणी संध्याकाळी तर काही वन्य प्राणी सकाळच्या प्रहरी पाणी पिण्यास पाणथळाकडे जातात, एखाद्या शिकाऱ्याने बंदुकीची गोळी झाडल्यास मेरू, भेकर, कोल्हे, ससे, डुक्कर मागे पुढे पाहत सैरावैरा पळतात, आणि दाट जंगलाचा आश्रय घेतात, अशा या जनावरांच्या डोळ्यांत पहाटेच्या प्रकाशाची किरणे दिसतात.
पांढऱ्या धुक्याचे दवबिंदू झाडांच्या पानावर विरघळून त्यांचे थेंब बनून या वन्य प्राण्यांच्या शरीरावर पडल्यावर त्यांचे अंग थरथरून जाते, चंद्र मावळून पहाटेचा उजेड पडू लागताच ती सुकी जनावरे दाट जंगलाच्या घळीत विसावतात, झाडाच्या ढोलीत घुबड जाते, ससे मोठ्या बिळात जाऊन डोकेबाहेर काढून बघतात, रान कोंबडा बोडक्या झाडावरून साद घालतो, रातकिड्यांचा आवाज शांत होतो, आणि सकाळ झाल्याने माणसांचा दिवस सुरू होतो, ही आभूषणांची साखळी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.