Manish Jadhav
रणथंबोर किल्ल्याचे बांधकाम इ.स. 944 च्या सुमारास सपादलक्षच्या चौहान राजपूत शासकांनी केले होते. हा किल्ला विंध्य आणि अरवली पर्वत रांगांच्या मध्यभागी, थक्क करणाऱ्या नैसर्गिक तटबंदीत सुरक्षेच्या दृष्टीने बांधला गेला.
रणथंबोर किल्ला म्हटला की, राजा हम्मीर देव चौहान यांच्या शौर्याची आठवण येते. त्यांच्या काळात हा किल्ला शक्तिशाली बांधला गेला. आपल्या शरणागतांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण शत्रूसमोर मान झुकवली नाही.
इ.स. 1301 मध्ये दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने या किल्ल्याला वेढा घातला होता. या ऐतिहासिक युद्धात राजपूतांनी पराक्रमाची शर्थ केली, तर किल्ल्यातील राजपूत स्त्रियांनी स्वतःचा स्वाभिमान राखण्यासाठी राजस्थानातील पहिले 'जल जौहर' केले.
रणथंबोर किल्ल्याची रचना इतकी विलक्षण आहे की, दुरुन पाहता हा किल्ला डोंगर आणि जंगलामुळे अजिबात दिसत नाही. मात्र, किल्ल्यावरुन सभोवतालच्या मैदानी प्रदेशावर आणि शत्रूच्या हालचालींवर पूर्णपणे नजर ठेवता येत असे.
चौहान राजवंशाच्या अस्तानंतर हा किल्ला मेवाडचे शासक, मुघल सम्राट अकबर आणि नंतर जयपूरच्या कछवाहा राजघराण्याच्या नियंत्रणाखाली होता. प्रत्येकाने या किल्ल्याच्या रचनेत आणि सौंदर्यात भर घातली.
या किल्ल्याच्या आत अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन त्रिनेत्र गणेश मंदिर आहे. हे जगातील एकमेव मंदिर आहे जिथे गणपती बाप्पा त्यांच्या संपूर्ण परिवारासह (रिद्धी-सिद्धी आणि शुभ-लाभ) विराजमान आहेत. येथे दरवर्षी लाखो भाविक येतात.
रणथंबोर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व, अद्वितीय वास्तुशास्त्र आणि त्याच्या सभोवताली असलेले राष्ट्रीय उद्यान (Ranthambore National Park) लक्षात घेऊन 2013 मध्ये UNESCO ने याला 'जागतिक वारसा स्थळ' म्हणून घोषित केले.