Mayureshwar Ganesh Temple Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Mayureshwar Ganesh Temple: सिंधू असुराचा वध, मोरावर आरूढ गणेश अन् 'गणपती बाप्पा मोरया'चा इतिहास! जाणून घ्या मोरगावच्या मयुरेश्वराची अद्भुत कथा

Morgaon Mayureshwar Temple History: सिंधू असुरापासून अष्टविनायकापर्यंतचा अद्भुत प्रवास पुणे जिल्ह्यातील कऱ्हा नदीच्या तीरावर वसलेल्या छोट्याशा मोरगावपासून सुरू होतो.

गोमंतक ऑनलाईन टीम

गजानन चौगले

सिंधू असुरापासून अष्टविनायकापर्यंतचा अद्भुत प्रवास पुणे जिल्ह्यातील कऱ्हा नदीच्या तीरावर वसलेल्या छोट्याशा मोरगावपासून सुरू होतो. नाव साधे; पण इतिहास आणि श्रद्धेची परंपरा मात्र विलक्षण मोठी. याच भूमीत अष्टविनायकांतील प्रथम गणपती म्हणून पूजले जाणारे श्री मयुरेश्वर, अर्थात श्री मोरेश्वर विराजमान आहेत.

मोरगावला जाणारा भाविक केवळ एका मंदिरात दर्शनासाठी जात नाही; तो हजारो वर्षांच्या पौराणिक श्रद्धा, संतपरंपरा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या भूमीत प्रवेश करतो. कथा सुरू होते त्रेतायुगात... मिथिला नगरीचा राजा चक्रपाणी. त्याचा पुत्र सिंधू. सूर्यदेवाच्या वरदानामुळे सिंधूला प्रचंड सामर्थ्य प्राप्त झाले. सामर्थ्य वाढले आणि त्याचबरोबर अहंकारही वाढला. त्याने देव, मानव आणि पृथ्वीवर उत्पात माजवण्यास सुरुवात केली. देवता भयभीत झाल्या. सर्वांनी श्रीगणेशाची आराधना केली.

तेव्हा देवतांच्या रक्षणासाठी गणेशाने एक विलक्षण अवतार धारण केला. या अवतारात श्रीगणेश मोरावर आरूढ झाले. सिंधू असुराशी त्यांचे घनघोर युद्ध झाले. अखेर श्रीगणेशाने सिंधूचा वध केला. त्याचा प्रधान कमलासुर याचाही संहार केला, अशी गणेशपुराण आणि मुद्गलपुराणाशी संबंधित परंपरा सांगते.मोरावर आरूढ होऊन दैत्यांचा संहार केल्यामुळे श्रीगणेशाला नाव मिळाले... मयुरेश्वर!

म्हणजेच मयूरावर आरूढ झालेला ईश्वर. याच नावाचे पुढे मराठी रूप झाले, मोरेश्वर. मग गावाचे नाव मोरगाव कसे पडले? याबाबतही एक सुंदर परंपरा आहे. प्राचीन काळी या परिसरात असंख्य मोरांचे वास्तव्य होते. शिवाय या प्रदेशाचा आकारही मोरासारखा असल्याचे मानले जाते. म्हणून या क्षेत्राला नाव मिळाले, मोरगाव. अशा प्रकारे गावाचे नाव आणि देवाचे नाव दोन्ही एका मोराशी जोडले गेले. मंदिराच्या मूर्तीची कथा.

मयुरेश्वराची मूर्ती प्राचीन असल्याची श्रद्धा आहे. भगवान ब्रह्मदेवांनी येथे मूर्तीची स्थापना केली, अशी पौराणिक परंपरा सांगते. द्वापारयुगात पांडवांनी मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी ती तांब्याच्या पत्र्यात सुरक्षित ठेवली, अशीही आख्यायिका प्रचलित आहे. या गोष्टींचे ऐतिहासिक पुरावे आणि धार्मिक आख्यायिका वेगवेगळ्या पातळ्यांवर पाहणे आवश्यक आहे; पण शतकानुशतके चालत आलेली श्रद्धा मात्र आजही तितकीच जिवंत आहे. आणि मग आले संत मोरया गोसावी... मोरगावच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे संत मोरया गोसावी. ते मयुरेश्वराचे अत्यंत निष्ठावान भक्त होते. त्यांनी मोरगाव येथे कठोर तपसाधना केली. पुढे ते चिंचवड येथे स्थायिक झाले. मोरया गोसावी यांच्या भक्तीमुळे मोरगाव आणि चिंचवड ही गणेशभक्तीची महत्त्वाची केंद्रे बनली.

आज आपण प्रेमाने म्हणतो... गणपती बाप्पा मोरया! या उद्‍घोषात संत मोरया गोसावी यांच्या नावाची आठवणही जपली गेली आहे. मंदिर आहे की गढी? मोरगावच्या मंदिरात प्रवेश करताना प्रथम जाणवते ती त्याची भक्कम आणि गढीसारखी रचना. उंच तटबंदी, भक्कम दगडी बांधकाम आणि संरक्षणात्मक स्वरूपाच्या वास्तुरचनेमुळे हे मंदिर इतर अनेक मंदिरांपेक्षा वेगळे दिसते. मुस्लिम सुलतानशाहीच्या काळात मंदिराचे संरक्षण व्हावे म्हणून त्याला गढीसदृश स्वरूप देण्यात आले, अशी परंपरा आहे.

मंदिराच्या बांधकामाशी गोळे घराण्याचा संबंध असल्याचेही विविध स्रोतांमध्ये नमूद केले जाते. इतिहासाच्या या टप्प्यावर श्रद्धा, स्थानिक परंपरा आणि उपलब्ध ऐतिहासिक उल्लेख यांचा सुंदर संगम दिसतो. चार दरवाजे अर्थात चार युगे. मंदिराला चार दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत. धार्मिक परंपरेनुसार ही चार द्वारे चार युगांचे प्रतीक मानली जातात; सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. म्हणजे मंदिरात प्रवेश करताना केवळ एका देवस्थानात प्रवेश होत नाही; तर हिंदू कालचक्राच्या संकल्पनेचे प्रतीकात्मक दर्शनही घडते.

मंदिरासमोर नंदी का?

आता एक प्रश्न सहज पडतो... गणपतीच्या मंदिरासमोर नंदी कसा? याचे उत्तर एका रंजक आख्यायिकेत मिळते. एका शिवमंदिरासाठी नेण्यात येत असलेला विशाल दगडी नंदी मोरेश्वर मंदिरासमोर आला आणि तेथून पुढे हललाच नाही. त्यामुळे नंदी तेथेच स्थिरावला, अशी श्रद्धा आहे. इतिहास काहीही सांगो; पण आजही हा नंदी मोरेश्वर मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणून भाविकांचे लक्ष वेधून घेतो. सिंदूराचे गूढ कवच मयुरेश्वराची मूर्ती आकाराने तुलनेने लहान असल्याचे सांगितले जाते. परंतु अनेक वर्षांच्या सिंदूरलेपामुळे तिचे स्वरूप मोठे आणि प्रभावी दिसते. मूर्तीवरील सिंदूराचा थर विशिष्ट कालावधीनंतर गळून पडतो, याला भक्तिभावाने ''चोला सोडणे'' असे म्हटले जाते.

मयुरेश्वर मंदिरातील गुळाची तुला

मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिराशी अनेक प्राचीन श्रद्धा, नवस आणि धार्मिक परंपरा जोडलेल्या आहेत. त्यापैकी भाविकांच्या मनात विशेष स्थान असलेली एक परंपरा म्हणजे गुळाची तुला.एखाद्या मनोकामनेसाठी, नवसपूर्तीसाठी किंवा देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाविक स्वतःची किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तीची गुळाने तुला करतात. दोन्ही पारडी समसमान झाली की तुला पूर्ण होते. त्यानंतर हा गूळ तेथेच प्रसाद म्हणून भाविकांमध्ये वाटला जातो.या साध्या वाटणाऱ्या परंपरेत भक्तीचा एक सुंदर भाव दडलेला आहे; देवाला अर्पण केलेला गोडवा पुन्हा समाजात वाटणे. ‘माझ्या आयुष्यातील कटुता दूर होऊ दे, जीवनात गोडवा येऊ दे आणि श्री मयुरेश्वराची कृपादृष्टी सदैव राहू दे.’ही भावना म्हणजेच या परंपरेचे खरे सौंदर्य!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

SCROLL FOR NEXT