राजेंद्र भोबे
ग.दि. माडगुळकरांच्या ‘उद्धवा, अजब तुझे सरकार’ या गाण्यात एक ओळ आहे, ‘वाईट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले’. या विचाराच्या अनुषंगाने बोलायचे झाले तर फक्त स्वातंत्र्यदिन, मुक्तिदिन, संविधानदिन साजरे करून मोठमोठी भाषणे द्यायची, पण आचार आणि विचार विरुद्ध दिशेने गेल्यास जनता व तरुण पिढी काय बोध घेणार? चांगले, सकारात्मक काही घडत नाही, अशी ओरड करताना आपण वाईट पोसत आहोत, याचे भान मात्र आपल्याला नसते. सामान्यांपासून राजकारण्यांपर्यंत, प्रत्येक क्षेत्रात वाईट गोष्टींचे जतन होत आहे.
ग्रामपंचायत व विधानसभा निवडणुका लढविणे हा लाखो कोटींचा धंदा झाला आहे. कष्ट, प्रामाणिकपणा, शालीनता निष्ठा यासारख्या समाजोपयोगी गुणांवरचा जनतेचा विश्वास कमी होत चालला आहे. ऐतखाऊपणा, भ्रष्टाचार, गुंडगिरी व्यसनाधीनता, लाचारी यांसारख्या दुर्गुणावरचा जनतेचा विश्वास वाढत चालला आहे.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या साधी राहणी, उच्च विचारसरणी या सद्गुणांद्वारे जनतेसमोर आदर्श ठेवत आहेत. तर कित्येक राज्यांतील त्यांच्याच पक्षासह सर्वपक्षीय नेते हे ’मेरा क्या और मे क्यूँ?’ या मंत्राचा जप करत आहेत.
अरे जनता व तरुण पिढीवर काय संस्कार करताय? पैसे घेऊन सरकारी नोकऱ्या विकल्या गेल्या तर नोकरशाही जनतेची सेवा करणार की भ्रष्टाचार?
आज कित्येक आमदार, मंत्र्यांना ‘आपापल्या मतदारसंघात संस्कारवर्ग सुरू करा’, असे सुचवले तर पटत नाही. सुसंस्कारित जनता भ्रष्ट, नीती भ्रष्ट, अप्रामाणिक नेत्यांना निवडून देणार नाही ही सुप्त भीती प्रत्येकाला वाटत असावी. कित्येक नेत्यांना आपल्या मतदारसंघातील किमान दहा टक्के तरुण कठोर परिश्रम करायला तयार असतील याचीही खात्री वाटत नाही. प्रोत्साहन व मदत घा म्हणून सुचविले तर नकारात्मक सूर येतो.
ऐंशी टक्के स्थानिक लोकांना नोकरी द्या हा कायदा करून काही उपयोग होईल का? येथील तरुण निर्मिती, निर्यात करू लागेल यासाठी लागणारी संसाधने उभी करणे एवढ्यापुरतेच सरकारचे काम मर्यादित आहे का?
श्रमप्रतिष्ठाच नसेल तर या साधनसुविधा असूनही निरुपयोगी आहेत. कठोर परिश्रम करण्याचा संस्कार व जाणीव तरुणांमध्ये निर्माण करण्याचे दायित्व हे पालक व राज्यकर्त्यांचे आहे. प्रत्येकाला सरकारी नोकरी पाहिजे.
कारण काय तर कामाचे तास कमी, सुट्ट्या भरपूर, उत्तरदायित्व कमी व खासगी क्षेत्रापेक्षा जास्त पगार. परंतु ’यथा राजा तथा प्रजा’ या म्हणीप्रमाणे जो तो वैयक्तिक स्वार्थ साधण्यातच दंग. कित्येक पारंपरिक व सेवा क्षेत्रातील व्यवसायामध्ये स्थानिक लोक काम करायला तयार नसल्यामुळे परप्रांतीय लोक त्या संधीचे सोने करतात.
आज गोव्यातील परिस्थिती एका प्रहसनातील भगवान श्रीकृष्णाचा मामा कंस व त्यांचा सल्लागार या दोघांमधील संवादासारखी झाली आहे.
कंसाने अत्याचार व दहशतीच्या बळावर लोकांमध्ये भय निर्माण केले होते, अनाचार, भ्रष्टाचार, माफिया टोळ्या त्याने निर्माण केल्या होत्या. आपली सत्ता निरंकुशपणे पिढ्यान्पिढ्या चालावी म्हणून कंस सल्लागाराचा सल्ला घ्यायचे ठरवतो त्यांच्यातील संवाद असा होतो.
कंस : मी जे काही करतो त्याला लोक अधर्म म्हणतात. मी जे करतो तो धर्म आहे, असे लोकांना वाटण्यासाठी काय करावे?
सल्लागार : समाजात जे त्यागी, विरागी, निःस्वार्थी लोक आहेत ते जनतेला सद्गुणांचे आचरण करण्यास सांगतात पण या लोकांना आपल्या बाजूने वळविणे सोपे नाही कारण ने आपल्या कुटुंबीयांच्या व मित्रमंडळीच्या स्वार्थासाठी सत्तेपुढे झुकत नाहीत.
कंस : मी त्यांना मोठमोठ्या देणग्या देईन. पैशाने त्यांना विकत घेईन.
सल्लागार : महाराज काही जणांना विकत घेता येईल. सर्वांना विकत घेणे शक्य नाही. त्यातही जे विकले जातील ते प्रामाणिक राहतील याची शाश्वती नाही.
कंस : मी त्या त्यागी, विरागी माणसांना ठार मारू शकतो?
सल्लागार : महाराज, तुम्ही तसे करू शकाल, पण त्यामुळे प्रजा खूप संतापेल आणि बंड करेल.
कंस : लोकांची बुद्धी, आचरण भ्रष्ट करण्याचा एखादा उपाय नाही का?
सल्लागार : महाराज, उपाय आहे. तुम्ही लोकांना ’खा, प्या, मजा करा’ असा उपदेश करा. जागोजागी दारूची दुकाने उघडा लोकांना उपभोगाच्या वस्तू (मोबाइल, सायकल, मोटारसायकल, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन इ.) फुकट वाटा.
तरुणांना कौटुंबिक बंधनात अडकून न पडण्याची शिकवण द्या. स्त्रियांनाही शिकवा की उपभोगात सुख आहे. शील, चारित्र्य या सर्व बाता आहेत. घरातील वृद्ध मातापिता हे अडगळ आहेत, अशी शिकवण मुलांना घा. भोगवाद निर्माण करण्याच्या योजना आखा. सरकारी खजिना त्यासाठी खर्च करा.
एकदा का भोगवाद लोकांच्या अंगवळणी पडला की समाजातील नि:स्वार्थी, त्यागी शीलवान माणसांबद्दल आदर कमी होईल. ही माणसे वेडी आहेत असे लोकांना वाटेल आणि महाराज तुमची सत्ता राज्यावर पिढ्यान्पिढ्या चालेल.
प्रहसनातील त्या सल्लागाराचा सल्ला लोकप्रतिनिधींनी तंतोतंत उचलला, राबवला व यशस्वीही केला. आज प्रत्येक ठिकाणी दिसत आहे, ती ही बजबजपुरी आहे. प्रत्येक व्यक्ती एकटी, सुटी, संस्कारहीन, चारित्र्यहीन होत चालली आहे.
प्रत्येकाला अमर्याद स्वातंत्र्य हवे, अधिकार हवेत; मात्र त्यांच्या जबाबदारीचे बंधन कुणालाही नको. पैसा, प्रसिद्धी हवी; त्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट नकोत. सगळीकडे हीच परिस्थिती आहे.
ही परिस्थिती बदलायची असेल तर समाजातील सर्व जबाबदार घटकांना सुसंस्काराच्या मशाली पेटवाव्याच लागतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.